नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र ( Narendra Modi ) मोदी शनिवारी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
परदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून नायजेरियाला पहिली भेट असेल. पश्चिम आफ्रिकन प्रदेशात हा भारताचा जवळचा भागीदार आहे. लोकशाही आणि बहुलवादावरील आमचा सामायिक विश्वास यावर आधारित आमची धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी ही भेट एक संधी असेल.
पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये ट्रोइका सदस्य म्हणून १९ व्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या वर्षी, भारताच्या यशस्वी अध्यक्षपदाने जी२० मध्ये ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना मुख्य प्रवाहात आणले. यंदा ब्राझीलने भारताचा वारसा पुढे नेला आहे. “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या आमच्या दृष्टीला अनुसरून आपण फलदायी चर्चेची अपेक्षा करतो. अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबाबत विचारांची देवाणघेवाण करण्याच्या संधीचा रचनात्मकपणे उपयोग करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्या निमंत्रणावरून तब्बल ५० वर्षांनी भारतीय पंतप्रधान गयानास भेट देणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी कॅरिबियन भागीदार देशांच्या नेत्यांसोबत दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेतही सहभागी होणार आहे.