मराठवाड्यातील हिंदूंचे अंतरंग...

16 Nov 2024 20:44:04
maratha reservation crisis political situation
 

गेवराई, बीड, औसा, अंबेजोगाई, लातूर ते जालना, अंबड, बदनापूर, राळा, भोकरदन, परतूर, परभणी सेलू ते नांदेड अशा मराठवाड्यातल्या जवळ-जवळ सर्वच प्रातिनिधीक तालुका, शहर भागातील मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय समाजाशी संवाद साधण्याचा नुकताच योग आला. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणांतर्गत समाजमनाचा ठाव घेतला. आरक्षणाबाबत अत्यंत संवेदनशील असलेला समाज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही प्रखर आहे. समाजाच्या पूर्वजांवर रझाकरांनी केलेले अत्याचार आजही त्यांच्यासाठी भळभळती जखम आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ समाजासाठी महत्त्वाच्या गंभीर समस्या आहेतच. ‘एक मराठा, लाख मराठा’ हा समाजाचा जयघोष आहे. पण, त्यासोबतच ‘एक हिंदू, लाख हिंदू’चा बाणाही याच समाजामध्ये आजही कायम आहे, हे जाणवले. त्या सगळ्यांचा मागोवा या लेखात घेतला आहे.

"दीदी, उतरू नका. त्यांनी विचारले काय काम आहे, तर काय सांगणार? मागे सगळ्या घटना घडल्या त्याचे आम्ही साक्षी आहोत. उगाच वाद होईल.” अंबड तालुक्यात माझ्या सोबत प्रवास सहकार्याला असलेल्या त्या भगिनीने आणि वाहनचालकाने सांगितले. कारण, आम्ही होतो जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये. नाव ऐकताच डोळ्यासमोरून तरळून जातात त्या गेल्या वर्षभरातल्या घडामोडी. मुंबई-पुणे शहरी भागात काही वर्षांपूर्वी नावही ऐकले नसलेल्या मनोज जरांगे- पाटलांचा मराठा आरक्षणासंदर्भातला एकूणच सगळा घटनाक्रम-उपोषण, आंदोलन, सलाईन, माघार निवडणुका लढणार ते निवडणूक लढणार नाही पर्यंतचा सगळा प्रवास... त्या गावात गेले असता ‘माझे गाव, सुंदर गाव’ असा निबंध लिहायचा झाला, तर याच गावावर लिहिता येईल, असे हेे गाव. जिथे नजर जाईल तिथे हिरवळ आणि त्यासोबत आल्हाददायक वातावरण. वेळ थांबून जावा आणि निवांतपणा व्यापून राहावा, अशी शांतता त्या गावात पसरलेली. मराठी चित्रपटांमध्ये गावाचे सुंदर मंगल चित्रण करायचे असल्यास जे दाखवले जाते, अगदी तसेच चित्रातले गाव. त्यामुळे गावात प्रवेश करताना उत्साह, आनंद वाटला.

गावात प्रवेश केल्या-केल्या काही वेळानेच मांडव घातलेला दिसला. तिथे मराठा आरक्षणसंदर्भातील ‘आमरण उपोषणा’चा बॅनर लावलेला होता. समोर गादी, उशा वगैरे व्यवस्था केलेली होतीच आणि पुढे पलंगसदृश्य बाकडेही टाकलेले होते. त्या ठिकाणी मध्यम वयाची पुरूषमंडळी बसलेली, लवंडलेली होती. बाजूला एक टुमदार घर होते. ओसरीवर डोईवर पदर घेतलेल्या दोन आया-बाया निवांत गप्पा-टप्पा करत होत्या. अच्छा म्हणजे, आम्ही मराठा आरक्षणाच्या नावाने उपोषण जिथे केले गेले, त्या स्थळावर होतो तर.

आम्हाला पाहताच त्या मांडवात उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्या. सुदृढ देहयष्टीचे आणि गंभीर चेहर्‍याचे ते सगळे लोक प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहत होते. त्यावेळी आमच्यासोबत असलेल्या वाहनचालकाने आणि आमच्यासोबत असलेल्या भगिनीने खरेच सांशक होत सल्ला दिला होता की, “नका भेटू त्यांना.” पण, तोपर्यंत त्यातले एक-दोन जण आमच्याकडे येत होते. ते येत आहेत पाहून परत गाडीत बसणे आणि गाडी दामटवणे तर अजिबात चांगले नव्हते. त्यामुळे त्यांना म्हणाले, “तुम्ही जरा थांबा, मी जाऊन येते.”

तिथे गेले, तर त्यांनी सगळी चौकशी केली, कोण? कुठून, कशाला, कशासाठी आलात इथून दादांना भेटायचे आहे का? इथपर्यंत.(दादा म्हणजे मनोज जरांगे-पाटील बरं) त्यांना विचारले, इथे उपोषणाचा बॅनर आहे, दादा तर दिसत नाहीत, मग आता इथे काय आहे? यावर त्यांचे म्हणणे, “तुम्ही गावाबाहेरचे आहात ना? गावात काय काम काढले, कुणाकडे आलात? दादांना भेटूनच जा. दादा तिथे मळ्यातल्या घरात असत्याल.” एक जण म्हणाला, “नाय दौरा पण, चाललाय आपला आरक्षणाचा.” एकमेकांशी बोलताना ते परत म्हणाले, “तुमचे गावात काय काम आहे? आमचे गाव प्रसिद्ध आहे, लोक गाव बघायला आणि दादांचे उपोषण स्थळ बघायला येतात.” तोच धागा पकडत मी म्हणाले, “हो. हो. तुमचे गाव खूप प्रसिद्ध आहे, अगदी अण्णा हजारेंच्या गावासारखेच.”(अर्थात, त्यांना बोलते करण्यासाठी असे काहीसे म्हणणे गरजेचे होते.) यावर सगळ्यांची कळी खुलली. कठोर डोळ्यांत खुशी आणि अत्यंत निरागस चमक आली. ओठांवर हसू आले. अत्यंत अभिमानाने, उत्साहाने त्यातली जरा वयस्कर व्यक्ती म्हणाली, “हा मग खरंच हाय ते. बसा, बसा, दीदी. तुम्हाला आमचा संघर्ष सांगतो.” मग त्या व्यक्तीने उपोषण, मराठा आरक्षण वगैरेबद्दल जे जरांगे म्हणत असतात, तोच सगळा पाढा वाचला. साधी भोळी माणसे. आरक्षण वगैरेची माहिती दिल्यानंतर ती व्यक्ती भक्तिभावाने हात जोडून म्हणाली, “आता आमच्या इथं ‘भागवत सप्ताह’ या मंडपात होणार हाय. त्याची तयारी सुरू हाय. महाराज येणार हायेत. देवाधर्माची शक्ती हाय करावंच लागतं ते.”

त्यांच्याशी बोलताना आजूबाजूला पाहत होते, तर उपोषणाच्या बॅनरसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तिथे, त्याच्या पाठी शक्तिपीठ म्हणजे देवीमातेचे मंदिर, समोर भव्य हनुमानाचे मंदिर होते. देवीमातेला, हनुमानजींना आणि छत्रपतींना नमस्कार केला. उपोषणाला जिथे जरांगे बसायचे तिथे गेले, तर उपस्थित लोकांपैकी एक जण म्हणाला, “अहो दीदी, हात जोडा, हात जोडा, इथच दादा उपोषणाला बसायचे. तुम्ही उभ्या राहा. द्या आम्ही तुमचे पोटो काढतो.” समोरून दोन-तीन वेळा ते लोक सुचवत होते. देवाधर्माला मानणारी गोड शब्द आणि आश्वासनाला भुलणारी ती माणसे... कोण कुठली मी. माझ्याशी सहजपणे स्नेहसंवाद साधत होते. त्यांचे मन मोडायचे जिवावर आले. शेवटी छत्रपतींच्या पुतळ्याला हात जोडले. त्या पुतळ्याखालीच जरांगे उपोषणाला बसत. मी छत्रपतींना हात जोडले. पण, समोरच्या त्या भाबड्या लोकांच्या मते, मी उपोषण स्थळाला हात जोडले. अर्थात, हे सगळे करण्याचे कारण होते ते म्हणजे मला त्यांच्याशी संवाद साधायचा होता.

त्यांना विचारले, आता दादांचे उपोषण नाही मग पुढे काय? त्यांचे मत होते, “आरक्षण मिळावे यासाठी सगळ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. उपोषण थोडी सोडतील. आरक्षण मिळाल्यावरच उपोषणाचे सत्र थांबेल.” एकंदर त्या मांडवात उपस्थित असलेले ते सात-आठ जण जरांगेंचे अगदी कट्टर समर्थक होते. हे काही अर्थातच नवीन नव्हते. कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय नेत्याचे जिथे बस्तान असेल, तिथे त्या नेत्याने स्वत:चे सात-आठ समर्थक कमावलेले असतातच. पण, तरीही हे जे लोक होते, ते खरेच स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजचे भले होणार, या आशेत असलेले सद्गृहस्थच होते. त्यांना संविधानात, आरक्षणाबाबत काय सांगितले आहे किंवा कायद्याच्या रचनेत आरक्षण काय आहे, याची माहिती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यांना वाटत होते, दूरदर्शनवर दादा दिसतात. त्यांच्यासोबत आजूबाजूला आम्ही दिसतो. तसेच उपेाषणामुळे गाव चर्चेत आले. गावाला मोठ्या नेत्यांचे पाय लागले. दूरदूरचे मराठा नातेवाईक कौतुक करू लागले की, “अरे तुम्ही त्या गावचे ना जिथे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे.” या सगळ्याबद्दल त्यांना अभिमान होता.

त्यांना विचारले, “उपोषणाने आरक्षण मिळाले तर सगळ्यांना नोकर्‍या लागतील का?” तर ते म्हणाले “हो, सगळ्यांना नोकर्‍या लागतील. सरकारी मोठ्या पदाच्या, हुद्द्याच्या आणि पगाराच्या. त्यामुळेच तर आम्ही लढतोय ना.” मी म्हणाले, “आता गावात खूप गरिबी आहे का? मला तर गाव श्रीमंत वाटले.” तर यावरही सगळे खूश झाले. म्हणू लागले, “मग सगळे जण खाऊन, पिऊन सुखी हाय. शेतीभाती हाय. मराठवाड्यात दुसरीकडं पाणी-पाणी करून शेतकरी त्रासलेला हाय. पण, आमच्या इथं पाणी हाय, त्याच्या जीवावर शेती चांगली हाय. गावात कुणी रिकाम न्हायं. शेती तरी करत्यात किंवा नोकरी-चाकरी तरी करत्यात. पण, असं झालयं ना सगळीकडं, 80च्या दशकापर्यंत सगळे घर एकत्र नांदायचं. पुढे भावाभावात वाटण्या झाल्या. भावाच्या लेकरांनी पण आपसात वाटण्या केल्या. मग काय जमीन उरली सांगा? त्यामुळं आरक्षण पायजे म्हणजे पायजे!” अंबड तालुक्यातल्या या सुंदर शांत गावात आरक्षणाची अशी आग पेटलेली की पेटवलेली?

त्यांना म्हटले, “तुम्ही पण या फोटो काढायला सोबत.” तर कुणीही सोबत फोटो काढायला तयार नव्हते. कदाचित त्यांच्या दादांच्या समंतीशिवाय ते तसे करू इच्छित नसतील. पण, तरीही पूर्वीपेक्षा गावातले वातावरण निवळलेले. पण, ते निवळू नये यासाठीही कुणीतरी विशेष प्रयत्नात असेल, असे वाटत होते. कारण, त्या मांडवामध्ये मराठा समाजाच्या महिलांवर लाठीहल्ला झाला, हे सरकार मराठा समाजाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात आहे, हे इथल्या लोकांच्या मनावर जबरदस्तपणे ठसवले गेले होते.

अर्थात, त्या घटनेबद्दलही जालना जिल्ह्यात अनेक मतमतांतरे होती. काही जणांचे म्हणणे होते की, या विधायक आणि शांततेने चालणार्‍या आंदोलनामध्ये समाजविघातक शक्ती घुसली असणार! ज्यांना राज्यातील मराठा समाजाला चिथवायचे होते. त्यामुळे जेव्हा प्रशासनाने इथे पोलीस बळ धाडले, तेव्हा ते जे कोणी आहेत, त्यांनी या दुर्दैवी घटनेला खतपाणी घालण्याचे काम केले, नाहीतर जरांगे दादा आणि त्यांचे उपोषण शांततेचे होते. आजपर्यंत गावगाड्याची जी रीतभात होती, ती सांभाळणारेच होते. मराठा समाज म्हणून इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय समाजाशी असलेले संबंध सांभाळूनच होती. गावात सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते. मात्र, ही दुर्दैवी घटना घडली आणि गावाची नाही, तर जालना आणि मराठवाड्याची ही परिस्थिती पालटली. त्यानंतर पुढे काय घडले याची उजळणी करण्यात अर्थ नाही. कारण, ते जे काही घडले, त्यात मराठा समाजाच्या युवा वर्गाला काही लोकांनी भ्रमित केले होते, असेच दृश्य होते.

यावर मराठा समाजाच्या काही लोकांचे म्हणणे होते की, “आम्ही आमचे नाव सांगणार नाही. पण, आजही मराठा समाज घरातल्या मोठ्याधाकट्यांच्या विरोधात, पैपाहुण्यांच्या विरोधात जात नाही. या सगळ्या मोठ्या ज्येष्ठांना वाटते की, सगेसोयरे आरक्षण हे कायदेशीर आरक्षण आहे. त्यांचे मन तसे वळवण्यात काही लोक यशस्वी झालेत. ते कोण आहेत, ते माहिती पडत नाही. पण, कुटुंबातल्या, समाजातल्या ज्येष्ठांचा मान राखावा म्हणून आम्ही सगेसोयरे या आंदोलनात असतो. आम्हाला पटतयं की, जे चालले ते ठीक नाही. पण, उघड कसे बोलणार? कारण, अशी ही बोंब उठवलेली की, जे या आरक्षणाच्या समर्थनार्थ बोलणार नाहीत, त्यांनी पैसे खाल्लेत आणि ते गद्दार आहेत. मराठा मरेल पण, इभ्रत आणि भावकी गावकीच्या विरोधात जाणार नाही, तर असे कुणी बोलू नये म्हणून पण, आम्हाला त्या सगळ्यामध्ये शरीराने तरी उपस्थित राहावे लागते.”

एकाने सांगितले, “आमच्या घरी सांगण्यात आले की, आरक्षण पायजे असेल, तर काँग्रेसला मत देल पायजे. आमच्या घरच्या आयाबाया म्हणल्या का राम मंदिराच्या अक्षता वाटयले तेंनी. त्यांना व्होट नाय करायचं का? तर तेनला पण, समजावलं का लेकरांना आरक्षण पायजे तर खासदार काँग्रेसचा झाला पायजे. आम्ही साधीभोळी, शेतात राबणारी माणसं. आम्ही तेंचं ऐकलं. आमच्या मतांनी काँग्रेसचा खासदार जिंकला.” मी विचारले, मग आता ते खासदार आरक्षण देणार का? तर त्यांचे म्हणणे, “कसलं काय, ते जितून आल्यावर तर गावातले मुसलमान पोरटोर आनंदली. आमच्यासमोर तें उभं राहायच न्हायत, आता खासदारांचे ते खास झालेत. खासदारांना आम्ही सगळे जण जाऊन भेटलो म्हणालो, आता काँग्रेसला आम्ही इथून जितून देल आता आरक्षण कुठंय? तर ते आम्हाला भेटायला तयार न्हाई. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे लोक पण काय बोलत न्हायत. बरं, हे सगळे जण इथं भेटत न्हायत, बोलत न्हायत, तर दिल्लीत तरी काय आरक्षणाबद्दल बोलतील. तर ते पण करत नाय. आता तर ते म्हणताय, मला काय विचारू नका, मी काय पुकटात जितलो नाय. त्यावेळी कुणी पण पुकटात माझ काम केलं न्हवत.” अतिशय दुखात ते सगळे सांगत होते.

इतक्यात एक जण म्हणाला “वकप बोर्ड का काय, आमच्या गावात पण मदरसावाल्यांनी एका जागेवर हक्क सांगितलाय. खासदारांना ते सांगितलं तर त्यावर पण तो गप्प. आता वाईट वाटत. चटू झाली आमच्याकडून.” असेही काही जण भेटले ज्यांना वाटत होते की, जरांगे पाटील या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवारांना उभे करतील. त्यात आपल्यालाही संधी मिळेल. आपण जिंकू. पण. निवडणूक लढवायची जाहीर केल्यानंतर जरांगे पाटलांनी माघार घेतली. याबद्दलही अनेक जण संभ्रमात आहेत. काही रागात आहेत, तर काहींच्या मते दादांचे गणित असते ते. काही लोकांशी बोलले की, सगेसोयरे आरक्षण कसे काय शक्य आहे? तर त्यांचे म्हणणे, “शरद पवार आमच्या मराठा समाजाचे. ते म्हणतात का, मराठ्यांना आरक्षण नको? ते तर म्हणतात, आरक्षणाची मर्यादा 75 टक्के वाढवा. मग आताच सरकार का वाढवत नाही.” यावर मी काही बोलायच्या आतच एक व्यक्ती म्हणाली, “मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर दोन्ही पवार(म्हणजे शरद पवार आणि अजित पवार) शिंदे, फडणवीस यांनी एकत्र येऊन आरक्षणाचे नक्की काय आहे, ते फोडून सांगाव.” एक जण म्हणतो, “सगेसोयरे आरक्षण मिळेल. एक म्हणतो ते शक्य नाही. एकत्र येऊन उघड उघड जनतेसमोर त्यांनी चर्चा करावी, कोण खरं, कोण खोटं बोलत, कोण आमच्या हक्काच आरक्षण देत, हे आम्हाला कळेल.” अतिशय पोटतिडकीने ती व्यक्ती बोलत होती.

असो. मग बाजूच्या वडू बुद्रुक गावात लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात उपोषण केलेले. त्या ठिकाणी आता बॅनर वगैरे काही नाही. मात्र, इथे ज्यांच्याशी बोलले त्यांच्या भावनाही ऐकण्यासारख्या. त्यांचे म्हणणे, “आम्ही इतर मागासवर्गीय लोक म्हणजे गावगाड्याचा कणा. चाली, रीतीभाती, धर्म, जात आम्ही जगतो. समाजाच्या सर्वच जात भाईंशी आमची नाळ जुळलेली. सवर्ण असू देत का, मागासवर्गीय आमचा पूर्वांपार संबंध सगळ्यांशीच. नाय तो संबंध ठेवल्याशिवाय गावात कोणी पण एकटा कसा जगेल? पूर्वी त्यांच्याकडे मालकीची शेतजमीन होती, ती आजही आहे. राजकारण, समाजकारण यात ते भारीच आहेत. आता त्यांची पण परिस्थिती आमच्यासाखीच झाली, हे सत्य जरी असलं तरी मन मानत नाय. गावात आज पण, त्यांना मान आहे. विचारा की त्यांना. आम्ही कधी त्यांच्या विरोधात होतो? गावात राहायचं. एक दुसर्‍याचं तोंड दररोज बघायचं, मग वाद कशाला? जे काय होईल ते सरकार दरबारात होईलच. पण, आमच्या वाट्याचं आरक्षण गेलं, तर आम्ही काय करायचं?” मी विचारले, मराठ्यांना आरक्षण मिळाले तर तुमचे काय मत असेल? तर त्यांचे म्हणणे, “मराठ्यांना आरक्षण मिळालं, तर आमच्या पोटात का दुखणार? पण, आम्हालाच आरक्षण पुरत नाय, तर त्यात अजून त्यातून मराठ्यांना आरक्षण कुठून देणार?”

तर मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला वाटते की, समाजाचे जे काही चांगभलं होणार आहे, ते आरक्षणानेच. पण, या दोन समाजाचेच काय, आज परिस्थिती अशी आहे की, जवळ-जवळ सगळ्याच समाजगटांना वाटत असते की, आरक्षणाशिवाय समाज जगू शकत नाही. समाजामध्ये आरक्षणासंदर्भात इतकी भीती का वाढीस लागली? संविधानात आरक्षणकर्त्यांनी आरक्षणासंदर्भात काय लिहिले, याबद्दल जनजागृती गावोगावी होणे गरजेचे आहे हेच खरे. दुसरीकडे मराठवाड्यातला मागासवर्गीय समाज या मराठा किंवा इतर मागासवर्गीय समाजाच्या या भूमिकेकडे अलिप्तपणे, तटस्थपणे बघत आहे.


मराठवाड्यातील ‘लव्ह जिहाद’

असो. मराठा समाजाशी आणि इतर मागासवर्गीय समाजाशी बोलत असताना जाणवले की, दोन्ही समाज ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’विरोधात प्रचंड आक्रमक आहेत. हिंदू म्हणून त्यांच्या पूर्वजांना रझाकाराने जे छळले, त्या आठवणींनी आजही ते संतप्त होतात. प्रत्येक तालुक्यात ‘लव्ह जिहाद’चा राक्षस घुसलेला. तशा अनेक घटना घडलेल्या आहे. कारण, गावखेड्यांत हिंदू आणि मुसलमान हा फरक केवळ वेशभूषेवरूनच कळतो. बाकी मुसलामानांचीं भाषा गावातल्या इतर हिंदूंसारखीच असते. (उद्धव ठाकरे यांच्या भाषेत ते ‘मराठी- मुसलमान’ असतात) एक घटना तर लक्षणीय. गावात नवीन सुनबाई आली. देखणी सुलक्षणी. संसार सुखाचा. पण, तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या म्हणजे 17-18 वर्षांच्या मुसलमान मुलांच्या जाळ्यात फसली. तो मुलगा त्यांच्या घरी मजुरी सदृश्य काम करायला आलेला. घरातल्यांनी आणि समाजाने दोघांनाही समज दिली. तेव्हा त्या मुलाचे अम्मी- अब्बा म्हणाले, “आमच्या लेकराची चूक लहान आहे.” पण, नंतर हाच लहान लेकरू त्या भल्या घरच्या सुनेला घेऊन पळून गेला. यानंतर त्या सुनेला आणि त्या मुलाला शोधण्यात आले. सुनबाईला समुपदेशन करण्यासाठी एका घरात ठेवण्यात आले. पण, ‘मी जीव देईन, मला जाऊ द्या’ असे म्हणत सुनबाई तिथून पळून गेली, तर त्या मुसलमान मुलाच्या अम्मी-अब्बा आणि एकंदर कौमचे म्हणणे, ’तुमची बहु, तुम्ही बघा काय ते. आमचा मुलगा होता का, त्या घरात तिला पळवून न्यायला.’ या घटनेनंतर या मुलीच्या सासर-माहेरच्यांनी माघार घेतली की, स्वत:हून पळून गेलेल्या मुलीला परत घरात घ्यायचे नाही. अनेक वर्षे झाली. त्या मुलीची खबरबात नाही. मात्र, मुलगा गावातच आहे. त्याचे लग्न झाले. मुलेबाळे झाली. गावातल्यांना संशय आहे की, त्या मुलीला याने कुठेतरी ठेवले असेल. पण, तो आजही ताकास तूर लागू देत नाही. आता तर काही वर्षांत त्यांच्या कौमची एकी वाढली आहे. आपण कशाला वादात पडायचे म्हणून गावातले ही घटना विसरूनही गेले.

दुसरी एक घटना. गावात खूप वर्षांपूर्वी एक उत्तर भारतीय राहायला आला. त्याने पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या घरातली मुलगी गावातल्या एका मुसलमानाबरोबर पळून गेली. त्याचा आधीच निकाह झालेला. गावातल्यांनी त्याच्या बायकोला याबाबत सांगितले, तर तिचे म्हणणे ऐकून गाववाले अवाक झाले. ती म्हणाली, “आमच्यात चालतं. माझ्या नवर्‍याचा दुसरा काय, चौथा पण निकाह मला कबुल हाय. तुम्हाला काय करायचे. मर्द हाय तो. एक काय चार बाया आणेल घरात. निघा इथून.” तर एका गावात एक प्रौढ वयाची मुसलमान व्यक्ती पंक्चर काढायचे काम करायचा. घरचे खायचे वांदे. कामाच्या शोधात तो गावाबाहेर गेला आणि परत गावात येताच सोबत घेऊन आला त्याच्या लेकीच्या वयाच्या इंजिनिअर असलेल्या हिंदू मुलीला. त्या मुलीच्या आईबापाने तिला शोधून काढले, तोपर्यंत गावाला हे माहिती नव्हते. कारण, त्याने तिला घरात न ठेवता गावच्या मोठ्या मशिदीच्या परिसरात ठेवले होते. बुरखा परिधान केलेली आणि शुद्धीत नसलेल्या त्या मुलीला गावातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शोधून बाहेर काढले. तिच्या आईबाबांच्या हवाली केले. त्या मुलीने परत जाऊ नये, यासाठीही त्या प्रौढ मुस्लीम व्यक्तीच्या मदतीला त्याचे अनेक भाईबंद आले होते. ती मुलगी तुझ्यासोबत कशी आली? यावर त्याचे म्हणणे, “ती सज्ञान आहे. मी काय तिला जबरदस्ती केली नव्हती.” प्रकरण वाढले असतेच. पण, त्या मुलीच्या आईबाबांनी या प्रकरणाचा गवागवा होऊ नये, अजून इज्जत जाऊ नये म्हणून, या घटनेला तिथेच पूर्णविराम दिला.

मराठवाड्यातल्या एका गावात तर मराठा कुटुंबाच्या एका मुलीने आत्महत्या केली. कारण, काय तर मुस्लीम मुलगा तिला त्रास द्यायचा. घरी कसे सांगायचे याची भीती वाटली. पण, त्रास सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली. या घटनेची वाच्यता करत उद्विग्न होऊन एका मराठा व्यक्तीने मला विचारले, “आरक्षणासाठी एकवटलेले आमचे ‘एक मराठा, लाख मराठा’ तेव्हा एकत्र आले असते तर?” मी म्हणाले, “पण, त्या बिचार्‍या मुलीने कुणाला सांगितलेच नाही ना. तिच्या त्रासाबद्दल.” तर त्या व्यक्तीचे म्हणणे, “नाही, आम्हाला गुंगी चढलीय आरक्षण मिळवण्याची. काय होतो आम्ही, काय झालो आम्ही? कोपर्डी प्रकरणात जे गुन्हेगार होते, त्यांच्यावर हल्ला करणार्‍या मराठा समाजाच्या तरूणांना जरांगे-पाटलांनी मदत केली असे म्हणतात. मग या प्रकरणात काय झाले?” यावर दुसरी व्यक्ती म्हणाली, “अहो पण, ज्या आपल्या पोरांनी त्या कोपर्डीच्या ताईवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना हाणल होत, ते म्हणाले का की, जरांगे-पाटलांनी त्यांना मदत केली?” दोघेही जण मत मांडत होती.

विषयांतर होत आहे असे वाटत असेल पण, मराठवाड्यात आहे ते असे आहे. साधाभोळा, देवधर्म, जात पात आणि रीतीरिवाज पाळणारा गावखेड्यातला समाज आजही अंतरंगात तसाच निर्मळ आहे. ‘साल्यांनो, मी तुमच्या देवाचा बाप आहे.’ म्हणणारे शरद पवार आणि ‘जय श्री राम म्हणणार्‍यांना मी हरामखोर म्हणतो’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे किंवा ‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’च्या त्या 17 मागण्या काँग्रेसच्या लेटरहेडवर मान्य करणारे काँग्रसचे महाराष्ट्राचे नेते नाना पटोले, यांच्याबद्दल मराठवाड्याच्या या मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाची मत अत्यंत तिखटजाळ आहेत. ती मते मराठवाड्यातल्या बंधू-भगिनींच्या शब्दात मी लिहूच शकत नाही. (वाचकांनी कृपया समजून घ्यावे.) पण, हे सगळे जरी असले तरीसुद्धा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती समाजात भ्रमजाल निर्माण झाला आहे, हे सुद्धा खरे. खोटी स्वप्नं, आपलाच समाज काय तो श्रेष्ठ, असे लोकांच्या मनात भरवायचा प्रयत्न कुणी तरी करत आहे हे खरे. ती व्यक्ती तीच आहे, जी अनेक वर्षे जातीपातीचा खेळ करत आहे. तीच व्यक्ती आजही समाजाला आरक्षणाच्या खेळात झुंजवते. पण, समाजातल्या अनेक लोकांना हे का समजत नाही, यावरूनही समाजातला मोठा गट निराश आहे, तर मराठवाड्यातल्या या समस्त हिंदूंचे हे अंतरंग आपण समजून घेतलेच पाहिजे.

मराठा समाज आणि नोमानी

काही मराठा समाजाचे लोकांनी मत व्यक्त केले की, “आम्ही जरांगे दादांसोबतच होतो. जातीसाठी माती खाईल ही मराठ्याची अवलाद. छत्रपती संभाजीनगरात आमचे सोयरे पावणेरावळे राहतात. इम्तियाज जलील खासदार असताना तिथे काय काय घडले हे ते सांगायचे. जलील पण, दादांना येऊन भेटला होता. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले, कुणी भेटायला आले, तर हुसकून कसे लावायचे? दारी आलेल्या प्रत्येकाचा सन्मान करण्याची मराठ्याची दानत असती. तो आला तर त्याच्याशी बोलावे लागले. त्यावेळी आम्ही ते मान्य केले. पण, दादांसोबत जेव्हा त्या नोमानीला पाहिले, तेव्हा अंतकरण तीळतीळ तुटले. आमच्यासारख्या अनेक मराठ्यांना ते आवडले नाही. यापूर्वी दादांना म्हणायचो, “दादा, तुम्ही म्हणाल तसे!” पण, नोमानीच्या सोबत जायचे तर आम्ही विचार करू. त्यामुळे नोमानी प्रकरण आणि निवडणूक प्रकरण थांबले.”

काही समाजबांधवांकडून संशय व्यक्त

मराठा समाजातील काही लोकांचे म्हणणे, ”आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात काम करत नाही. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला, ‘कलम 370’ असू दे की, ‘सीएए’ असू दे की, गावात गोरगरिबांना शौचालय असू दे की, घर असू दे की, आयाबायांसाठी ‘उज्जवला गॅस योजना’ असू दे की, समृद्धी महामार्ग जवळच झाल्यामुळे गावाच झालेला आर्थिक विकास असू दे, आम्ही डोळयाने पाहिला आणि अनुभवला. गावे समृद्ध झाली. शहरांशी जोडली गेली. विकास का काय म्हणतात, तो आम्ही या दहा वर्षांत पहिला. पण, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला लेकरांच्या भवितव्याबद्दल सांगून आम्हाला सांगितलं गेले की, भाजपला मतदान करू नका. आम्हाला तर दुसर्‍या कुणाला मतदान करायचे नव्हते. त्यामुळे आमच्यातले कितीतरी लोक मतदानाला गेले नाहीत. निवडणुकीच्या निकालात आम्ही बघितले महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. आता वाटते की, यासाठीच तर हे सगळे घडले असेल का? पण, आम्ही हे उघड बोलू शकत नाही.”

 
मराठवाड्यातील मातृशक्ती

महिलांना ‘लव्ह जिहाद’संदर्भात विचारले असता, त्यातल्या 80 टक्के महिलांनी हा शब्दही ऐकलेला नव्हता. मात्र, जेव्हा त्यांना ‘लव्ह जिहाद’संदर्भातल्या घटना सांगितल्या तेव्हा, त्यांचा संताप पाहण्यासारखा होता. याला ‘लव्ह जिहाद’ म्हणतात का? हे तर आमच्या गावात घडत असतं, असे त्या सांगू लागल्या. ‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’च्या 17 मागण्यांची माहिती मिळाल्यावर महिलांनी शपथच घेतली की, या असल्या मागण्या करणारे आणि त्या मागण्या मान्य करणारे आमचे देव-धर्म आणि आमच्या लेकीबाळींना कसे शाबूत ठेवतील? भेटलेल्या सर्वच महिलांनी मत मांडले की, “मालक म्हणजे (पती) जे म्हणतील ते करणे आमचा धर्म आहे. त्यामुळे ते जे म्हणतील ते आम्ही करतो. पण, आमच्या पतीच्या आम्ही पत्नी असलो, बापाच्या लेकी असलो, तरी या सरकारच्या आम्ही ‘लाडक्या बहिणी’ आहोत. त्यामुळे बाप आणि पतीसोबतच आमच्या लाडक्या भावांचेही चांगले व्हावे, असे आम्हाला वाटते.”
9594969638
Powered By Sangraha 9.0