मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात आले होते. अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात सभांच्या निमित्ताने आलेल्या पंतप्रधानांची मराठी अभिनेत्याने भेट घेतली आहे. तसेच, त्याने फोटो शेअर करत एक अविस्मरणीय क्षण असं कॅप्शन देखील या फोटोला दिलं आहे.
अभिनेता सुशांत शेलार हा गेली अनेक वर्ष नाट्य, मालिका आणि चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून काम करत आहे. पण अलिकडच्या काळात अभिनयासोबतच त्याने राजकीय क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. सुशांत हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचा कार्यकर्ता आहे. शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेना अध्यक्ष ही दोन पदं सध्या तो सांभाळत आहे. सुशांत शेलारनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून त्याने सोशल मिडियावर फोटो शेअर करत या भेटीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. सुशांतने ‘एक अविस्मरणीय क्षण’ असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे ही भेट झाल्याचंही सुशांतने म्हटलं आहे. पुढे त्याने लिहिले आहे की, "भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट. एक अविस्मरणीय क्षण! हे सर्व आपले मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे शक्य झाले आहे. मा.शिंदे साहेबांनी सामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचे काम नेहमीच केले आहे. आणि यामुळेच आम्हाला सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते!".
सुशांत शेलारच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहे. विशेष म्हणजे गेले अनेक दिवस सुशांतची तब्येत ठिक नसल्यामुळे तो फार बारीक झाला आहे किंवा त्याला कोणता आजार झाला आहे का? अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, रानटी या चित्रपटातील विशेष भूमिकेसाठी त्याने वजन कमी केलं होतं हे त्याने घोषित केलं आहे. ‘रानटी’ या चित्रपटात शरद केळकर प्रमुख भूमिकेत असून २२ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.