मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे चित्रपट जितके लोकप्रिय आहेत आणि आवर्जून पाहिले जातात तितकाच ते होस्ट करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो देखील घराघरांत पाहिला जातो. लवकरच या आता त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन पाहुणा म्हणून येणार आहे. अभिषेकचा ‘आय वाँट टू टॉक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये येणार आहे. या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन अभिषेकला उगाच तुला बोलावलं असं बोलताना दिसत आहे.
या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिषेकने अमिताभ यांची नक्कल केली आहे. त्याने सर्वांना सांगतले की, “आमच्या घरी संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण करतं. यात कोणीही काही प्रश्न विचारला की, सर्व मुलं एकत्र ओरडून बोलतात ७ करोड.” ७ करोड बोलताना अभिषेकने अगदी हुबेहुब अमिताभ बच्चन यांची नक्कल केली आहे. हे पाहून शोमध्ये सर्व जण हसू लागतात.
दरम्यान, पुढे त्याने अमिताभ बच्चन यांना अट घातली. अभिषेक म्हणाला, “माझ्यासाठी येथे वाजत असलेला भोंगा बंद करा. म्हणजे मी शांतपणे प्रत्येक प्रश्नाचा विचार करत योग्य उत्तरे देईन.” तसेच प्रोमोमध्ये अभिषेक पुढे म्हणतो की, “मी सात करोड रुपये जिंकल्याशिवाय येथून जाणारच नाही.” त्याचं हे वक्तव्य ऐकून अमिताभ बच्चन हसू लागले. तसेत ते म्हणाले की, “याला शोमध्ये बोलवून मी मोठी चूक केली.”
लवकरच, अभिषेक सुजित सरकार दिग्दर्शित ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटात झळकणार असून एक वेगळीच भूमिका तो साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.