महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला कौल द्या : खासदार मुरलीधर मोहोळ

15 Nov 2024 13:28:29
Murlidhar Mohol

ठाणे : “महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकांचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे. तेव्हा, महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या,” असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांनी केले. तसेच, “लाडकी बहीण योजने’वर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत,” अशी टीकाही खासदार मोहोळ यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील ‘भाजप मीडिया सेंटर’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार मुरलीधर मोहोळ बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे, माजी नगरसेविका किरण मणेरा, प्रवक्ते सागर भदे, जयेंद्र कोळी, विलास साठे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. खासदार मोहोळ यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील २५ कलमी विकास कार्यक्रमांचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचे नमूद केले. केंद्रात मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामामुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली. किंबहुना, जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त झाले. तसेच, २०४७ सालच्या विकसित भारताचा पाया याच दहा वर्षांत रचला गेला. तेव्हा, महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल देण्याचे आवाहन मोहोळ यांनी केले.

Powered By Sangraha 9.0