मुंबई : (MNS Manifesto) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील पक्ष प्रचारसभा, दौरे, जाहीरनामे प्रसिध्दी या सगळ्यांमध्ये व्यस्त आहेत. आजमितीस महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या शीर्षकाने हा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.
जाहीरनाम्यात काय?
मनसेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टींचा समावेश आहे. तसेच महिलांविषयक अनेक बाबी, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार याही गोष्टी आहेत. तर दुसऱ्या भागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. तिसरा विभागात प्रगतीच्या संधी, राज्याचे औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी, पर्यटन हे विषय आहेत. चौथ्या भागात मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डिजिटल युगात मराठी, गड-किल्ले संवर्धन आदी विषयांना हात लावला आहे.
दरम्यान जाहीरनाम्याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेने आपण जाहीरनामा समोर ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीच्या लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ते म्हणाले.