मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगामाला सुरुवात झाली आहे (kokan sea turtle). यंदाच्या हंगामातील पहिले घरटे शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी गुहागर किनाऱ्यावर मिळाले (kokan sea turtle). महत्त्वाचे म्हणजे यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी कांदळवन कक्षाच्या खाद्यावर असणार आहे. (kokan sea turtle)
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत. हिवाळ्याच्या तोंडावर सागरी कासवांच्या विणीला सुरुवात होते. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.
गुहागरचा किनारा हा महाराष्ट्रात सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी ही गुहागरच्या किनाऱ्यावर आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी २९८ घरटी आढळून आली होती. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामातील पहिले घरटे शुक्रवारी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आल्याची माहिती रत्नागिरी कांदळवन कक्षाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. यामध्ये आढळलेल्या ११७ अंड्यांना कासवमित्रांनी हॅचरीमध्ये सुरक्षित हलविल्याचे त्यांनी सांगितले. गुहागर किनाऱ्यावर सहा कासवमित्रांच्या मदतीने कासव संवर्धनाचे काम होते. यासाठी दोन हॅचरी तयार करण्यात येतात. मात्र, गुहागर किनाऱ्यावर कासवांची घरटी सापडण्याची वर्षागणिक वाढणारी संख्या लक्षात घेता, तीन हॅचरी बांधून कासव संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी कासव संवर्धनाच्या कामातून कोकण किनारपट्टीवरुन समुद्री कासवांची १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २ हजार ५६६ घरटी आढळली होती आणि पिल्लांच्या जन्म होण्याचा दर ६४ टक्के होता.