कंगुवा

15 Nov 2024 23:37:06

 kanguva Film
 
 
पीरीयॉडिक चित्रपट सादरीकरणाचा बरा प्रयत्न!
 
भव्य चित्रपट म्हणजे नेमके काय? त्याची व्याख्या नेमकी काय असते? याचे उत्तर दाक्षिणात्य चित्रपटांकडून नक्कीच मिळते. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम तर आहेच, पण त्यातूनही आपली संस्कृती, मूल्ये, कुटुंबसंस्थेविषयी आस्था, थोरामोठ्यांनी आपल्यावर केलेले संस्कार आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याची परंपरा अशा अनेक गोष्टी दाक्षिणात्य चित्रपट त्यांच्या कथांमधून मांडताना दिसतात. अशीच एका आईने मागितलेल्या वचनाची गोष्ट सिवा दिग्दर्शित ‘कंगुवा’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
 
चित्रपटाच्या कथानकाविषयी सांगायचे झाल्यास, 2024 मध्ये फ्रान्सिस (सुर्या) हा पोलिसांचा खबरी असतो आणि तो पोलिसांना गुन्हेगाराला पकडून देण्यास मदत करत असतो. एकेदिवशी कामानिमित्त एका जागी त्याची गाठ एका लहान मुलाशी पडते आणि त्याला भेटल्यापासून त्याच्याशी आपले काहीतरी ऋणानुबंध असल्याचे त्याला जाणवते. एकीकडे आजच्या 21व्या शतकात ही गोष्ट सुरू असताना काळ फार मागे जातो, तो थेट 1070 सालच्या काळात. जिथे कंगा (सुर्या) एक योद्धा असतो. आपल्या गावाला वाचवण्यासाठी शत्रूंशी तो कसा लढतो, त्याचे त्या लहान मुलाशी काय नाते असते, हे सारे काही ‘कंगुवा’ चित्रपट पाहिल्यावरच लक्षात येईल.
 
दिग्दर्शक सिवा यांचे वैशिष्ट्य असे की, ते अ‍ॅक्शनपट फार उत्तम तयार करतात आणि त्यासोबतच भावनिक कथेचा संगम प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतो. ‘कंगुवा’ या चित्रपटाच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, कंगा याचे गाव पेरुमाची आणि अर्थी हे चित्रपटाचा खलनायक उधीरण (बॉबी देओल) याचे गाव असते. गेल्या अनेक शतकांपासून या दोन्ही गावांमध्ये वैर असल्यामुळे त्यांच्या मानसिकता दिग्दर्शकाने फार प्रतिकात्मकरित्या सादर केल्या आहेत. म्हणजे काय, तर पेरुमाची या गावातील लोकांना भय काय असते, हे ठावूकच नसल्यामुळे केवळ आपल्या कुटुंबाची, गावाची रक्षा करणे आणि निसर्ग, अग्नी यांची पूजा करत आपले जीवन जगणे, हाच त्यांचा उद्देश असतो. ही बाब प्रतिकात्मकपणे दाखवण्यासाठी चित्रपटाची रंगसंगती ही शांत निळ्या रंगाची दिली असल्यामुळे त्यांच्याकडे फार सकारात्मकता आहे, हे जाणवते. याउलट, अर्थी गावातील लोक हे फार हिंस्र, क्रूर असल्यामुळे त्यांच्या गावाची कथा सांगताना रंगसंगती लाल भडक होते; ज्यातून त्यांची क्रूर आणि नकारात्मक मानसिकता दिसून येते.
‘कंगुवा’मध्ये बारीकसारिक गोष्टींमध्ये त्यांनी सन 1070 आणि सन 2024 हा काळ समांरतररित्या दाखवत प्रेक्षकांच्या मनात प्रश्न न उद्भवता केवळ पुढे काय होईल, ही उत्सुकता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. चित्रपटाची सुरुवात थोडी रटाळवाळी वाटते खरी, पण जसे कथानक पुढे जाते, तसे फ्रान्सिस म्हणजेच कंगुवा याचा भूतकाळाशी असलेला संबंध, त्याचे अस्तित्व आणि जगण्याचा उद्देश नेमका काय होता, हे प्रेक्षकांना कळावे म्हणून घातलेला तो घाट होता, हे लक्षात यावे. संपूर्ण चित्रपटात हाणामारी, रक्तपात दिसून येतो. पण, तो नेमका का दाखवला आहे, याचे कारण नक्कीच चित्रपटाच्या अगदी शेवटी कळते आणि ते समजल्यावर ती ‘अ‍ॅक्शन’ गरजेची होती, असे प्रेक्षकांना नक्कीच वाटेल.
 
याशिवाय, प्रत्येक युद्धात पुरुष आपले शौर्य दाखवून लोकांची रक्षा करतात, या विचाराला छेद देत 1070 सालच्या काळात महिलादेखील स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी किती सक्षम होत्या आणि युद्धासाठी तयार झालेल्या शौर्या आणि वीरांगना होत्या, ही बाब मनाला विशेष भावते. ‘कंगुवा’ चित्रपटाबाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, आपल्या संस्कृतीशी प्रामाणिक कसे राहावे, हे यातून दाखवण्यात आल्यामुळे तो चित्रपट आपलासा वाटतो. एका आईला दिलेले वचन राजा अतिशय कठीण प्रसंगातही कसे पाळतो, हे दाखवून देत एखाद्या व्यक्तीशी एकनिष्ठता कशी पाळावी, याचा धडाही ही कथा देऊन जाते.
 
चित्रपटाची कथा मांडणी, कलाकारांची निवड, सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत उत्तम आहे. पार्श्वसंगीत आणि प्रत्येक गाण्यांच्या अर्थपूर्ण ओळी कथेला साजेशा असल्यामुळे रंजकता अधिकच वाढते. मात्र, चित्रपटात नायक आणि नायिकेचा सीक्वेन्स काही अंशी रटाळवाणा वाटतो, हेदेखील तितकेच खरे. अभिनयाच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, सुर्याला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने का सन्मानित आले, हे सिद्ध करून दाखवले आहे. काळानुरुप त्याची दोन रुपे दाखवल्यामुळे दोन्ही पात्रांतील समान धागे ओळखून त्याने साकारलेला ‘कंगुवा’ आणि फ्रान्सिस नक्कीच भावता, तर ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात बॉबी देओलने साकारलेले क्रूर आणि खलनायक पात्र पुन्हा एकदा ‘कंगुवा’मध्ये पाहताना फारसे नावीन्य तसे दिसत नाही. पण, थोडी अजून क्रूरता नक्कीच जाणवते. एकूणच काय, तर त्याने त्याच्या पात्राला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच दिसतो.
 
इतके नक्कीच सांगावेसे वाटते की, ‘पीरीयॉडिक’ चित्रपट पाहण्याची ज्यांना विशेष आवड आहे, त्यांनी ‘कंगुवा’ चित्रपट नक्कीच पाहायला हवा. दिग्दर्शक, लेखकांनी उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र, चित्रपट सुरू झाल्यानंतर नेमकी कथा काय आहे, हे कळण्यास जरा वेळ लागतो, हेदेखील तितकेच खरे. असा हा तामिळ चित्रपटसृष्टीतील आणखी एक ‘पावर पॅक’ चित्रपट आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणखीन एक विशेष बाब म्हणजे, अभिनेता कर्थी याचा कॅमिओ लक्षवेधी होता आणि ज्याप्रमाणे त्यांनी दुसर्‍या भागाची म्हणजेच ‘कंगुवा 2’ची चित्रपटात घोषणा केली आहे, ती कौतुकास्पद आहे.
चित्रपट : कंगुवा, दिग्दर्शक : सिवा, कलाकार : सुर्या, दिशा पटानी,
बॉबी देओल, कर्थी, रेटिंग :
Powered By Sangraha 9.0