दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर तेलंगणा सरकारने लावली बंदी!

    15-Nov-2024
Total Views |
 
diljit
 
मुंबई : गेले काही दिवस पंजाबी गायक दिलजीत दोसांझ त्याच्या गाण्यांच्या कॉन्सर्टमुळे विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये आलेल्या लोकांनी केलेली घाण आणि मैदानाचे केलेले नुकसान दिलजीतला भोवले आहे. दरम्यान, दिलजीत दोसांझचा 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट शुक्रवारी हैदराबादमध्ये होणार आहे. त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला असून तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट आयोजकाला कायदेशीर नोटीस पाठवत अटी घातल्या आहेत. या नोटीसनुसार, दिलजीत दोसांझला दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे कोणतेही गाणे न गाण्याची सूचना देण्यात आली आहे. चंदीगडचे प्राध्यापक पंडितराव धर्नेवार यांनी दोसांझ यांना लाईव्ह शोमध्ये अशी गाणी गाण्यापासून रोखण्यासाठी तक्रार केल्यानंतर, ही नोटीस बजावण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रंगारेड्डी जिल्ह्यातील महिला आणि बालकल्याण, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाच्या जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नोटीसनुसार, तक्रारदाराने व्हिडिओचे पुरावे देखील सादर केले होते. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये २६ आणि २७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या कॉन्सर्ट दारू, ड्रग्स आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी वाजताना दाखवण्यात आली होती. या नोटीसमध्ये असेही लिहिले आहे की, ‘तुम्हाला तुमच्या लाईव्ह शोमध्ये याचा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही ही नोटीस आगाऊ जारी करत आहोत.’
 
याशिवाय, या नोटीसमध्ये दिलजीतला त्याच्या कॉन्सर्टदरम्यान मुलांना स्टेजवर न बोलवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून लिहिले आहे की, ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रौढांनी १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकू नये. तर, लहान मुलांसाठी ही पातळी १२० डेसिबलपर्यंत कमी केली जाते. त्यामुळे लहान मुलांनी १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या दाबाच्या संपर्कात येऊ नये. त्यामुळे मुलांनी १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात येऊ नये.’ दिलजीतचा 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता जीएमआर अरेना, एअरपोर्ट ऍप्रोच रोड, हैदराबाद येथे होणार आहे.