सर्वकाही सज्जनाचेनि योगे ।

13 Nov 2024 21:22:34
sarvkahi sajjanacheni yoge
 
सत्याच्या ज्ञानाला अध्यात्मात फार महत्व आहे. पण, सत्य ही अनुभवयाची बाब असून, ती फक्त आकलनाने समजणार नाही. अनेकांना आकलनाने सत्य समजल्याचा भास होतो. त्यातून फक्त शब्दज्ञान आणि वृथा अहंकारच वाढीस लागतो. सत्याच्या शोधासाठी प्रयत्नपूर्वक कष्ट करावे लागतात. हेच सत्य अनेक संतांनी आत्मसाक्षात्कारांनी आपल्या पुढे ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास हवा.

मागील काही श्लोकांतून स्वामींनी सद्वस्तूचे, परब्रह्माचे वर्णन सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत केले आहे. संतांनी सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून साधना चालू ठेवल्यास, अखंड समाधानाची स्थिती अर्थात मुक्ती अनुभवता येते. असा निष्कर्ष स्वामींनी काढला आहे. स्वामींनी स्वतः अत्यंत चिकाटीने परिश्रमपूर्वक, शास्त्राध्ययन, रामोपासना, कठोर साधना करून ब्रह्मसाक्षात्कार करून घेतला. स्वामींनी योगशास्त्र, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, उपासनामार्ग अभ्यासून, त्यांचा समन्वय साधून विवेकाधिष्ठित मार्गाने, ब्रह्मानुभूती घेतली. तथापि ती अनुभूती स्वतःपुरती न ठेवता, ‘मनोबोधा’च्या निमित्ताने, आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिकांसाठी मुक्तीचा मार्ग सुलभ करून सांगितला-

 
खरें शोधितां शोधितां शोधताहे।
मना बोधितां बोधितां बोधताहे।
परी सर्व ही सज्जनाचेनि योगें।
बरा निश्चयो पाविजो सानुरागें॥151॥
बहुतां परी कूसरी तत्वझाडा।
परी पाहिजे अंतरीं तो निवाडा ।
मना सार साचार ते वेगळे रें।
समस्तांमध्ये येक तें आगळे रे॥152॥
स्वामी सांगतात की, सत्याचा शोध अत्यंत चिकाटीने घेतला पाहिजे. शोध घेत घेतच सत्यापर्यंत पोहोचता येते. सृष्टीतील दृश्य वस्तूतील सत्य जाणण्यासाठी, शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राआधारे प्रयोग करतात. पदार्थविज्ञानाच्या या अभ्यासात निरीक्षण, पृथक्करण, संकलन, मूलतत्वशोधन, सिद्धांतमांडणी, त्याची उपयोजिता अजमावण्यासाठी प्रयोग, अशा विविध मार्गांनी सत्य शोधण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. परमार्थविषयक ज्ञानात याहीपेक्षा अधिक चिकाटी लागते. कारण आत्मज्ञानाची अनुभूती ही सूक्ष्मातिसूक्ष्म असल्याने, चंचल मनाला अतिसूक्ष्म करावे लागते. पारमार्थिक सत्य जाणण्यासाठी साधनेची चिकाटी लागते. मनाला सतत शिकवण देत, उन्मनी अवस्था साधता येते. परब्रह्मतत्वाची अनुभूती येण्यासाठी ज्ञानचक्षू लागतात, असे स्वामी म्हणाले होते. तथापि ज्ञानचक्षूंनी पाहू गेल्यावर, एका परब्रह्माशिवाय काही उरत नाही अशी प्रचिती आल्यावर, पाहणारा आणि पाहणे विलय पावतात. ही विलक्षण अवस्था समजून घेण्यासाठी, ज्यांना ब्रह्मानुभूती झाली आहे त्या सज्जनांच्या सहवासात राहिल्याने, त्यांच्याकडून प्रेमपूर्वक निश्चयाने सद्वस्तूचे ज्ञान करून घ्यावे लागते. सज्जनांद्वारा केलेले परमात्मतत्व, परब्रह्म विवरण समजून घेण्यासाठी, बुद्धीच्या ठिकाणी अपार कौशल्य (कुसरी), विलक्षण चातुर्य असावे लागते. पारमार्थिक तत्वांचे सार, सत्य हे आपण समजतो त्यापेक्षा वेगळे आहे. कारण, तेथे फक्त सद्वस्तू परब्रह्म याशिवाय दुसरे काही नाही. म्हणून हे मना, तू ही नीट समजून सज्जनांच्या सहवासात राहून त्याची अनुभूती घे, त्याचा शोध घे. या साधनेत समर्थांनी सत्संगतीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. परमार्थ साधनेत सत्य समजून घेण्यासाठी अनेक साधने सांगितली आहेत. परंतु, इतर साधनांनी जे ज्ञान मिळत नाही, ते सज्जनांच्या संगतीने सहजपणे प्राप्त होते. सर्व सृष्टीचा आधार असून, ऊर्जा प्रदान करणारे हे परब्रह्मतत्त्व फार वेगळे आहे. या विश्वाच्या पसार्‍यात ते आगळेवगळे व एकमेव आहे. (समस्तामधें येक तें आगळें रे). ते जाणल्यावर अखंड समाधानाची अवस्था प्राप्त करून घेता येते. त्यासाठी हे समजून घ्यायला हवे की,

नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्वज्ञानें।
समाधान कांहीं नव्हे तानमानें।
नव्हे, योगयागे नव्हे भोगत्यागें।
समाधान तें सज्जनाचेनि योगें॥153॥
महावाक्य तत्वादिकें पंचीकर्णे।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णें।
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥154॥
परमार्थ क्षेत्रातील परब्रह्म साक्षात्कारानंतर म्हणजे सद्वस्तूची अनुभूती आल्यानंतर, साधकाला अखंड समाधानाची स्थिती प्राप्त होते. सर्वसामान्य माणसांचा आनंद ऐन्द्रिक असतो. तो बाह्य परिस्थितीवर, इंद्रियांवर अवलंबून असतो. त्यामुळे आनंद मिळवण्यासाठी जीवाला स्वातंत्र्य नसते. बाह्यपरिस्थिती प्रतिकूल झाली अथवा त्यात काही बदल झाला, तर आनंद उरत नाही. शिवाय, त्यातील अप्रत्यक्ष परिणामांनी दुःख पदरात पडते, तो भाग वेगळा.

सत्याचा शोध घेत असताना सर्वप्रथम माणूस शरीराकडे लक्ष देतो व त्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मानवी शरीर, त्यातील अंतर्गत रचना, हालचाली, त्या घडवून आणणारी अत्यंत बुद्धिमान शक्ती हा सर्व भाग खूप गुंतागुंतीचा आहे. जरी हे ‘पिंडज्ञान’ करुन घेतले तरी, त्यातून समाधान मिळत नाही, सत्याचा शोध लागत नाही. पिंडज्ञान, योगज्ञान तेथे उपयोगाचे नाही. पुढे बौद्धिक मार्गाने तत्वज्ञानातील सिद्धांताचे आकलन करून घेतले, तरी ते उपयोगी पडत नाही. तत्वज्ञानातील सिद्धान्त जाणून घेतल्याने शब्दज्ञानात भर पडून आपण इतरांपेक्षा विद्वान आहोत, असा सूक्ष्म अहंकार निर्माण होईल, त्याने सत्याचे ज्ञान होणार नाही. उलट त्यात अहंकाराने अडथळा निर्माण होईल. काही लोक उत्साही विचार करतील की, कलेद्वारा कलाकाराला आनंद मिळवता व इतरांना देता येतो. संगीतासारख्या कलेत गायन, वादन, ताल, मृदुंग, तबला यांद्वारा मिळणारा ठेका, यांतून स्वर्गीय आनंद मिळतो. पण येथेही सर्व बाह्य साधनांवर अवलंबून असल्याने, सत्याचे ज्ञान होत नाही. मिळणारा आनंद गायकाला व श्रोत्याला स्वतःला विसरायला लावणारा असला, तरी तो कायमस्वरूपी नसतो. काही साधक धारणा, ध्यान, समाधी असा योगाचा अवलंब करून, समाधी साधतात. परंतु समाधीतून ते खाली उतरल्यावर मूळ स्थितीला येतात, हे सत्यदर्शन नव्हे. पूर्वीच्या काळी यज्ञ-याग करून लोक देवतांना प्रसन्न करून घेत. अशावेळी मन अत्यंत शुद्ध व पवित्र असेपर्यंतच, देवतांशी संपर्क राहतो. पण मनाची शुद्धता फार काळ टिकत नाही व देवतांशी संपर्क तुटतो. काही लोक शारीरिक भोग टाकून, समाधान मिळवू पाहतात. पण या प्रकारात लोकांची टीका, जननिंदा या सोसाव्या लागतात, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. माणसाला समाजात, कुटुंबात राहायचे असते. त्यामुळे या त्यागाला मर्यादा पडतात. पण, सज्जनांच्या योगे हे समाधान प्राप्त होते. सज्जनांचे अंतःकरण स्वानंदाने ओतप्रोत भरलेले असल्याने व ते समदृष्टी असल्याने, त्यांच्या सहवासात अखंड समाधान प्राप्त होऊन सत्याचे दर्शन घडते, त्या ज्ञानाच समाधानाला मर्यादा नसते.

‘अहं ब्रह्मास्मि।’, ‘तत्वमसि।’ इत्यादी वेदोक्त वाक्यांना ‘महावाक्य’ म्हणतात. वेदान्त हा गहन विषय समजायला कठीण आहे. परंतु, संतांनी आत्मसाक्षात्कार करून घेतला असल्याने, त्यांच्या तोंडून महावाक्यांचे, वेदान्ताचे विवरण ऐकावे. संतांचा महिमा अगाध आहे. संत वेदान व पंचमहाभूतांचा पंचीकरण विषय सोपा करून सांगतात. विश्वातील दृश्य वस्तू, पंचमहाभूतांच्या मिश्रणातून तयार होतात. या वस्तू घडविणारी विश्वचालक शक्ती यांचा शोध सहजपणे घेता येत नाही. अशावेळी संतसज्जन ‘शाखा-चंद्र’ न्यायाने ते समजावतात. आकाशात द्वितीयेची चंद्रकोर पटकन दिसत नाही. त्यावेळी सामान्यपणे दिसणार्‍या झाडाच्या फांदीच्या खुणेवरून योग्य दिशेला नजर वळवून, ती चंद्रकोर दाखवता येते. एकदा चंद्रकोर दिसली, की मग झाडाच्या फांदीची खूण पुन्हा सांगावी लागत नाही. संतसज्जन आपल्या स्वानुभवातून सामान्य माणसाला समजेल अशा खुणांचा आधार घेऊन, त्याद्वारा आपल्याला सद्वस्तूची अनुभूती देऊ शकतात. एकदा सद्वस्तूचा आनंद मनाला मिळाला की, माध्यमासाठी वापरलेल्या खुणा आपोआप मावळतात. त्यांची गरज उरत नाही.

7738778322
Powered By Sangraha 9.0