कालचा बुधवार हा इंग्लंडच्या चर्चसाठी काळा वार ठरला. कँटरबरी चर्चचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांच्या राजीनाम्याच्या ठळक मथळ्यांनी ब्रिटनमधील सर्व प्रमुख दैनिकांचे पहिले पान व्यापले होते. पण, वेल्बींना पायउतार होण्याची वेळ आली, ती त्यांनी केलेल्या कुठल्या जघन्य अपराधामुळे नाही, तर चर्चशी संबंधित बाललैंगिक शोषणाच्या प्रकरणात ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेतल्यामुळे. ते इंग्रजीत म्हणतात ना, ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड’, तसेच आता जस्टिन यांची गच्छंती करुन, त्या पीडितांना ‘जस्टिस’ मिळाला का, हाच खरा प्रश्न.
जगाच्या कानाकोपर्यातील चर्चमध्ये बाललैंगिक शोषणाच्या मन विषण्ण करणार्या हजारो घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश घटना या तत्काळ समोर आलेल्या नसून, अशा अत्याचारातील पीडितांनी त्यांच्या प्रौढपणी त्यांच्यावरील आपबितीला वाचा फोडली. काही प्रकरणांमध्ये तर बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे चर्चमधील पेस्टर, फादर हे मृत पावले होते, तर काही प्रकरणांमध्ये असे प्रकार समोर आल्यानंतरही अपराध्यांना कोणतीही शिक्षा न सुनावता, त्यांना चर्चच्या सेवेतून केवळ मुक्त करण्यात आले. 2010 साली बेल्जियमच्या चर्चचे सर्वाधिक काळ बिशपपद भूषविलेल्या रॉजर यांनीही 13 वर्षे आपल्या पुतण्याचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्यानंतर, त्यांना फक्त राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. कोणतीही शिक्षा या प्रकरणी ना स्थानिक न्यायालयाने त्यांना सुनावली ना चर्चने. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्येही घडला असून, धक्कादायक म्हणजे शेकडो बालकांवर अत्याचार करणारा तो नराधम शिक्षा भोगण्यासाठी आज हयात नाही.
70-80च्या दशकातली ही घटना. जॉन स्मिथ नावाचा बॅरिस्टर गृहस्थ हा ‘चर्च ऑफ इंग्लंड’तर्फे शालेय विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्मतत्त्वांची रुजवणूक करणार्या विशेष शिबिरांसाठी सहलीला घेऊन जायचा. तिथे या स्मिथने कित्येक कोवळ्या मुलांचे केवळ लैंगिक शोषणच केले नाही, तर त्यांना अमानुष मारहाणही केली. खरं तर 1982 सालीच एका अंतर्गत-गुप्त चौकशीत हा घृणास्पद प्रकार समोर आला होता. पण, स्मिथ हा ज्या ‘आयर्विन ट्रस्ट’चा अध्यक्ष होता, त्यामार्फत या धार्मिक शिबिरांना फंडिंग केली जात असे. त्यामुळे साहजिकच या प्रकरणाची कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. तरीही ज्या विंचेस्टर कॉलेजची मुले या शिबिरांना हजेरी लावत होती, त्या कॉलेजला याबाबत सूचित करण्यात आले. पण, कॉलेज किंवा ट्रस्टने या तक्रारींना गांभीर्याने घेतले नाही की, पोलिसांकडे तक्रारही केली नाही.
उलट तेथील मुख्य शिक्षकाने स्मिथला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क न ठेवण्याची तंबी देत प्रकरण रफादफा केले. या सगळ्या घटनाक्रमानंतर स्मिथ झिम्बाव्बेमध्ये परागंदा झाला. पण, तिथेही त्याच्या एका धार्मिक शिबिरात एका 16 वर्षीय मुलाचा मृतदेह जलतरण तलावात तरंगताना आढळून आला. पण, तेही प्रकरण पुढे तहकूब झाले आणि स्मिथ दक्षिण आफ्रिकेत पळून गेला. पुढे 2013 साली काही पीडितांनी त्यांच्याबरोबर 40 वर्षांपूर्वी स्मिथकडून झालेल्या अत्याचारांच्या प्रकरणांना वाचा फोडली. ‘चर्च ऑफ इंग्लंड’शीही पीडितांनी संपर्क साधला. कारवाईसाठी पत्रव्यवहार केला. पीडितांच्या नातेवाईकांनीही स्मिथवर कारवाई व्हावी, म्हणून चर्चचे उंबरठेही झिजवले. पण, कँटरबरी चर्चचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी असतील किंवा चर्चमधील अन्य ज्येष्ठ मंडळी मूक गिळून बसले. विशेष म्हणजे, वेल्बी यांनी 1970 साली अशा धार्मिक शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले होते. त्यामुळे स्मिथच्या दृष्कृत्यांची वेल्बी यांना सूतराम कल्पना नसण्याची शक्यता ही तशी धुसरच!
2018 साली जॉन स्मिथ मरण पावला. 2019 साली केथ मॅकिन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अखेरीस या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि त्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतरही राजीनामा न देण्यावर आधी ठाम असलेल्या वेल्बी यांनी प्रचंड दबावाखातर दु:ख आणि पीडितांप्रती सहानुभूती व्यक्त करत अखेर राजीनामा दिला. पण, प्रश्न हाच की ‘जस्टिन’ वेल्बींच्या राजीनाम्याने पीडितांना ‘जस्टिस’ मिळाला का? पोपनेही अशा प्रकरणांवर यापूर्वी दिलगिरी वगैरे व्यक्त केली. पण, चर्चमध्येच खुलेआम वावरणार्या अशा नराधमांवर कारवाईचा बडगा कोण उगारणार? तेव्हा आता गुपचूप ‘कन्फेशन्स’ नको, थेट ‘अॅक्शन्स’ हव्यात! कारण, न्यायास विलंब हा अन्यायच!