सीआयएसएफच्या महिला बटालियनला केंद्र सरकारची मंजुरी

13 Nov 2024 18:07:09
Women Battalion

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) पहिल्या महिला तुकडीचे गठन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ५३ व्या सीआयएसएफ दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दलात महिला बटालियन ( CISF Women Battalion ) तयार करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू करण्यात आले होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, सरकारने केंद्रीय सीआयएसएफच्या पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये ते म्हणाले, राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत मोदी सरकारने सीआयएसएफची पहिली महिला बटालियन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. महिला बटालियन विशेष दल म्हणून उभारली जाणार आहे, ती देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, जसे की विमानतळ आणि मेट्रो रेल्वे सुरक्षित करण्याची आणि कमांडोजच्या रूपात व्हिआयपी सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी घेईल. या निर्णयामुळे अधिकाधिक महिलांच्या राष्ट्ररक्षणाच्या महत्त्वाच्या कार्यात सहभागी होण्याची आकांक्षा पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सीआयएसएफ हे पसंतीचे दल आहे.सध्या दलात महिलांची संख्या ७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महिला बटालियनची भर पडल्याने देशातील अधिक महत्त्वाकांक्षी तरुणींना सीआयएसएफ मध्ये सामील होण्यासाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

Powered By Sangraha 9.0