खलिस्तानी आणि कॅनडाच्या ट्रुडो सरकारचे लागेबांधे हे तसे सर्वश्रूत आहेत. कॅनडामध्ये जे खलिस्तानी उघडपणे भारतविरोधी भूमिका घेऊन आक्रमक आंदोलने करीत आहेत, त्यांच्याविरुद्ध कॅनडाकडून काही कारवाई केली जात नाही. कारण, कॅनडाच्या विद्यमान पंतप्रधानांना आपली शीख मतपेढी सुरक्षित ठेवायची आहे, हेच यातून स्पष्ट होते. खलिस्तान चळवळ भारतात संपली असली, तरी अजूनही देशाच्या अनेक भागात खलिस्तानचे समर्थक आहेत.
ब्रिटन आणि कॅनडात अजूनही खलिस्तानची मागणी करणारे अनेक आंदोलक आहेत. परंतु, मूळ शीख बांधव हे खलिस्तानींना कधीच समर्थन करत नाहीत. शीख आणि खलिस्तानी यांच्यातील मुख्य फरक हा आहे की, ’शीख’ बांधवांचे विचार हे धर्मरक्षणार्थ तसेच, राष्ट्रप्रथम या बाजूचे आहेत, तर खलिस्तानींचे विचार हे कायम अधर्माकडे वळणारेच आहेत. शीख हा प्रत्येक हिंदूची, भारतीयांची कायम काळजी करतो. त्यामुळे हे समजणे आवश्यक आहे की, सर्व शीख हे खलिस्तान चळवळीला समर्थन देत नाहीत.
पंजाबमध्ये खलिस्तानी संघटनेची सक्रियता पुन्हा एकदा तेव्हा समोर आली. जेव्हा सिद्धू मूसेवालाची हत्या झाली. वास्तविक भारतातील इतर राज्यांत राहणार्या कोणत्याही पंजाबी किंवा सामान्य शीखांना खलिस्तान नको आहे. खलिस्तानी अशा राष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थन करतो ज्यांना राजकीय आधारावर लोकांमध्ये फूट पाडायची आहे. शीखांचे फक्त अल्पसंख्याक खलिस्तानी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही खलिस्तानी हे शीख नसून केवळ त्यांच्या स्वार्थासाठी खलिस्तानचे समर्थन करतात. बर्याचदा असे म्हटले जाते की, सामान्य शीख बांधवातील काही तरूण मंडळी खलिस्तानी प्रवृत्तीच्या जाळ्यात अडकतात.
मग, त्यांचे ब्रेनवॉशिंग केले जाते. त्यानंतर हे तरूण हिंसक कृत्य करण्यास प्रवृत्त होतात. त्यांना मूळ शीख धर्म काय सांगतो, त्यांच्या धर्मगुरु-क्रांतिकारकांचा इतिहास काय आहे, हे कधी शिकवलेच जात नाही. शीख धर्माला स्वतः जाती-आधारित भेदभावाचा प्रतिकार करण्याचा इतिहास आहे. शीख गुरूंच्या शिकवणी समानतेवर भर देतात आणि जातिव्यवस्था नाकारतात. शीख समुदायामध्ये काही व्यक्ती किंवा गट असू शकतात, ज्यांनी जाती-आधारित प्रथा किंवा विभागांचा अवलंब केला असेल. परंतु, एक धर्म म्हणून शीख धर्म सामान्यतः अशा प्रथांना विरोध करतो.
काही समीक्षकांनी असा युक्तिवाद केला आहे की, ब्रिटिशांनी शीख समाजातील फूट आणि मतभेदांना प्रोत्साहन देऊन शीख धर्माला कमजोर करण्याचा कायम प्रयत्न केला. हे बर्याचदा ब्रिटिशांच्या ’फोडा आणि राज्य करा’ या धोरणाशी जोडले गेले आहे. समीक्षकांचा असा दावा आहे की, ब्रिटिशांनी अशा पंथांना आणि नेत्यांना पाठिंबा दिला, ज्यांना विभाजनवादी म्हणून पाहिले जात होते आणि ज्यांनी मुख्य प्रवाहातील शीख धर्माच्या विरोधातील पद्धतींचा प्रचार केला होता. नुकताच कॅनडाच्या ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर जेव्हा खलिस्तानी हल्ला झाला, तेव्हा जगभरातून त्या घटनेचा निषेध करण्यात आला. कॅनडाच्या ’ओन्टारियो शीख अॅण्ड गुरूद्वारा काऊन्सिल’ने हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे.
खलिस्तानींना फटकारत त्यांना शिष्टाचारात राहण्यासंदर्भात काऊन्सिलने सांगितले आहे. कॅनडाच्या सरकारने हिंसक खलिस्तानी फुटीरतावादी घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आरोपींवर कोणतीही कारवाई करण्याऐवजी कॅनडाच्या पोलिसांनी हिंदूंना दोषी असल्यासारखे वागवले. त्यामुळे सरकारने गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी काऊन्सिलने पत्रकाद्वारे केली आहे. पत्रात म्हटल्याप्रमाणे, ’शीख समुदायात हिंसा आणि धमक्या यासारख्या गोष्टींना स्थान नाही. सर्वांमध्ये शांतता, एकता असावी आणि प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. श्रद्धेचे ठिकाण हे हिंसाचाराचे आणि अशांततेचे ठिकाण नाही. ते एक पवित्र स्थान आहे.
अध्यात्म आणि सर्वांच्या समान चिंतनासाठी ते बाजूला ठेवले पाहिजे.’ हिंदू बांधवांवर, हिंदू मंदिरांवर हल्ला करणार्या खलिस्तानींविरोधात शीख बांधव एक झाल्याचेच यातून दिसते आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे, स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथील पूरग्रस्तांची सेवा करण्यासाठी हिंदू आणि शीख स्वयंसेवक एकत्र आले आल्याचे पाहायला मिळाले. ’हिंदू स्वयंसेवक संघा’च्या अंतर्गत त्यांनी अन्न आणि आपत्कालीन गोष्टींचे वितरण केले. ही एकजूट म्हणजे कॅनडाच्या खलिस्तानी अतिरेक्यांचा अंत जवळ आला आहे, हे निश्चित!