वीणा देव नावाचा कार्य-सेतू

01 Nov 2024 21:25:43
veena dev
 

महाराष्ट्रातील असंख्य सरस्वतीपुत्रांनी माय मराठीची निस्वार्थ सेवा केली. त्यांच्या सेवेचे मोल अगणितच! त्यापैकी एक म्हणजे, गो.नी. दांडेकर होय. त्यांच्या वारसा त्यांच्या कन्या वीणा देव यांनी समर्थपणे जतन केला. ‘गोनीदां’आणि पुढील दोन पिढ्यांमधील ’बंध-अनुबंध’ गुंफणार्‍या विदुषी डॉ. वीणादेव आज आपल्यात नाहीत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा शोध..

1967-68 साली मी एस. पी. महाविद्यालयात, प्री डिग्री आर्ट्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. हॉस्टेलवर राहूनच हा अभ्यासक्रम पूर्णही केला. एस. पी. कॉलेजमध्ये, आमचे आवडीचे लेखक, मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक गो.नी.दांडेकर यांची मुलगी-वीणा याच महाविद्यालयात शिकत आहे, असे मला समजले. महाविद्यालयासाठी ही किती अभिमानाची गोष्ट आहे, हेही लक्षात आले. त्या वर्षभरात क्वचित तिला पाहिल्याचे आठवते आहे. पण, बोलणे कधी झाले नाही.

मी शाळेत असताना गो.नी.दांडेकर ‘दुर्गभ्रमंती’ या त्यांच्या आवडत्या विषयावर, व्याख्यान देण्यासाठी आले होते. त्यांच्या सहज, ओघवत्या शैलीने, शिक्षक, विद्यार्थी आम्ही सगळेच प्रभावित झालो होतो. ही काही पाच एक वर्षांपूर्वीची गोष्ट मला आठवली. आपण शिकत असलेल्या महाविद्यालयाचे नाव एका ज्येष्ठ मराठी साहित्यिकाशी जोडले गेले आहे, याचे समाधान वाटले. त्यानंतर महाविद्यालयाच्या दैनंदिन क्रमात गो.नी.दांडेकर हा विषय अर्थातच मागे पडला. मात्र, आवडते लेखक असल्याने, त्यांचे साहित्य वाचत होतो. पुढे महाविद्यालयात अध्यापन करायला लागल्यानंतर, गो.नी.दांडेकर यांचे साहित्य शिकवण्याचीही संधी मिळाली. 1972 साली मी कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि त्यानंतर पुढील काही वर्षात, हळूहळू वीणा देव हे नाव सूत्रसंचालक, लेखिका असे पुढे येऊ लागले. ‘भाषा साहित्य विश्वा’चे भान येता-येता, हळूहळू त्यात वीणा देव हे नाव प्रसिद्ध होत असल्याचे चित्र दिसू लागले
 
त्या पुण्याच्या शाहू महाविद्यालयात मराठी अध्यापनाचे काम करतात हेही समजले. तरीही त्यांच्याशी प्रत्यक्ष अशी भेट कधी झाली नाही. कीर्ती महाविद्यालयात मी, 1972 ते 2009 सालच्या या काळात अध्यापन केले आहे. 1982 ते 1987 सालच्या या कालावधीत, मुंबई ग्राहक पंचायत संचालित ‘ग्रंथमित्र’ ‘वाजवी दर पुस्तक योजने’च्या मानद संचालक पदावर काम करीत असताना, अनेक लेखकांच्या भेटीगाठी होत असत. त्या काळात 1986 साली पुण्याचे आनंद पाळंदे यांचे ‘गिरीदुर्गांच्या पहार्‍यातून’ हे ‘दुर्गभ्रमंती’ विषयक पुस्तक, ग्रंथमित्रने छापण्याचे ठरवले. त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी म्हणून, आनंद पाळंदे यांच्यासह मी तळेगावला गो.नी.दांडेकरांना भेटलो होतो. त्यावेळीही वीणा देव यांच्या भेटीचा काही योग आला नव्हता. अध्यापन काळाच्या पूर्वार्धात म्हणजे साधारण 1999-2000 सालच्या आसपास, प्राध्यापकांनी पूर्ण करावयाचे दोन रिफ्रेशर कोर्स मी केले होते. त्यापैकी पहिल्या रिफ्रेशर कोर्सच्या वेळी, प्रा. वीणा देव सहभागी झाल्या होत्या. मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठात हा कोर्स संपन्न झाला. आणखी सहभागी प्राध्यापकांमध्ये, महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठातील प्राध्यापक होते. डॉ.अनंत देशमुख, प्रा. सु.प्र.कुलकर्णी, प्रा. प्रमोद लोहोकरे अशी काही नावे त्यात होती असे आठवते. रिफ्रेशर कोर्सच्या महिनाभराच्या कालावधीत, वीणा देव यांच्याशी नियमित भेटीगाठी होत असत. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, गौर वर्ण, कपाळावर ठळक कुंकू, चेहरेपट्टी ‘गोनीं’ची आठवण करून देणारी आणि मुद्रेवर सौजन्य, असे त्यांचे रूप आजही डोळ्यासमोर येते आहे!
 
त्यांच्या मृदु, सौजन्यशील, संयत व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून येत असे. त्यानंतर वीणा देव यांचे दर्शन सूत्रसंचालन, गो.नी.दांडेकरांच्या कादंबर्‍यांचे सादरीकरण, विचक्षण समीक्षा लेखन, संमेलनाध्यक्ष पद, ललित लेखन, मराठी विषयाचे अध्यापन अशा विविध रूपात घडले. गो.नी.दांडेकरांचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला, इतकेच नव्हे तर पुढील दोन पिढ्यांपर्यंत तो वारसा पुढे चालू राहिला आहे. हा सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला विश्व वारसा महाराष्ट्राचा अनमोल ठरावा असा ठेवा आहे.

रिफ्रेशर कोर्समध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येक प्राध्यापकाला, एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण निबंध सादर करावा लागे. मी सादर केलेल्या निबंधावरील वीणा देव यांचा संयत प्रतिसाद महत्त्वाचा होता. ‘मराठी साहित्य सांस्कृतिक विश्वा’तील एका मोठ्या ज्येष्ठ लेखकाची मी मुलगी आहे, असा आविर्भाव त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीही दिसला नाही. हे त्यांचे सहज सौजन्य मला प्रभावित करून गेले.

रिफ्रेशर कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही आता रिफ्रेश होऊन शिकवायला आला आहात अशा खेळीमेळीच्या वाक्याने स्टाफ रूममध्ये स्वागत होत असे. प्राध्यापकांना पदोन्नती देताना, रिफ्रेशर कोर्सची अट यूजीसी ने घातलेली आहे ही गोष्ट प्राध्यापकांच्या करिअरच्या दृष्टीने उपयुक्त आहे. अन्य विद्यापीठातील प्राध्यापकांशी विचार विनिमय झाल्याने, शिक्षकाच्या अध्यापनात आणि अनुभवात फरक पडतो आणि गुणवत्ताही वाढते. अध्यापन विषयातील नव्या येणार्‍या विचार प्रवाहांची अशा कोर्समुळे ओळख होते. अशा सकारात्मक दृष्टीने रिफ्रेशर कोर्सकडे पाहिले पाहिजे.
 
रिफ्रेशर कोर्स समारोपाच्या समारंभात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात, प्रत्येक प्राध्यापकाने सहभाग घेतला. एखादे गीत सादर करावे असा सहप्राध्यापकांनी आग्रह केला आणि म्हणून मी ‘मोगरा फुलला’ हे गीत सादर केले. त्यावेळी या गीतातील शब्द अचूक गायले जावेत, या हेतूने मी या गीताच्या दुसर्‍या कडव्यातील मला त्यावेळी सहज न आठवणारा शब्द वीणा देव यांना विचारून खात्री करून घेतला. गीताला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘फुले वेचिता बहरु कळीयाशी आला’ असा ध्वनिमुद्रित गीतात उल्लेख आहे. पण, मूळ अभंगात ‘अतिभारु’ असा शब्द असल्याचे, एका सहप्राध्यापिकेने अत्यंत आस्थेने सांगितले होते, अशीही त्यावेळची आठवण आहे.
 
कोणालाही भाग्याचा हेवा वाटावा अशा संस्कारसंपन्न, संस्कारक्षम कुटुंबात वीणा देव यांचा जन्म झाला. ज्येष्ठ तपस्वी साहित्यिक गो.नी.दांडेकर यांच्या कन्या! पुण्याच्या शाहू महाविद्यालयात मराठी विषयाचे प्रदीर्घ काळ अध्यापन केले. मराठी कथा कादंबर्‍यांची नाट्यरूपे, या त्यांच्या प्रबंधाला ‘पीएचडी’ ही पदवी प्रदान करण्यात आली. ‘स्मरणे गोनीदांची’हा ग्रंथ त्यांनी संपादित केला. यशवंत देव आणि ह.वि.सरदेसाई यांच्या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या सदस्य राहिल्या आहेत. गो.नी.दांडेकरांच्या साहित्याचे, विशेषतः ग्रंथरूपाने अप्रसिद्ध अशा साहित्याचे, प्रकाशन करण्यासाठी ‘मृण्मयी प्रकाशन’तर्फे त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गोनीदांच्या स्मरणार्थ त्यांनी, ‘मृण्मयी पुरस्कार’, ‘दुर्ग साहित्य संमेलन’ असे उपक्रम केले. ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना मिळाला होता.

‘कहाणी मागची कहाणी’,’त्रिपदी’अशा लेख संग्रहातून, डॉ.वीणा देव यांचे संकलन संपादन कौशल्य तर दिसतेच. पण, एक व्यासंगी संशोधक आणि समीक्षक, असे त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे दर्शन घडते. या पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतूनच, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या गुणविशेषणाचे दर्शन घडते. गोनीदांच्या साहित्यप्रेमी वाचकांना गो.नी. दांडेकरांचे दुर्मिळ साहित्य उपलब्ध करून, अगणित वाचक आणि ज्येष्ठ लोकप्रिय साहित्यिक या दोघांमध्ये सेतू बांधण्याचे मौलिक कार्य, त्यांच्या कन्येने केले. संकलक आणि संपादक म्हणून असलेले स्वतःचे मनोगत त्यांनी प्रस्तावनेत व्यक्त केले आहे.

“1945 सालापासून लिहिलेले लेख जमवताना, मला पुष्कळच कष्ट घ्यावे लागले आणि अनेक ठिकाणी शोध घ्यावा लागला” असे नमूद करून, त्यांनी श्री. मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ.सु. रा. चुनेकर अशा मान्यवरांच्या साहाय्याचा उल्लेख केला आहे. “1945 सालापासून 1988 सालापर्यंत लिहिलेले हे लेख मिळवणे जिकिरीचे काम होते. शोध पुष्कळच घ्यावा लागला,” असे नोंदवून त्यांनी पुन्हा मान्यवरांच्या साहाय्याचा निर्देश केला आहे.“आप्पांच्या लेखांचे संकलन करण्याचे काम गेली दोन वर्ष सुरू होते. त्यांची माझी पुन्हा-पुन्हा वाड्मयीन भेट होत राहिली.” असे अत्यंत प्रांजळ, उत्कट मनोगत वीणा देव यांनी व्यक्त केले आहे. ‘त्रिपदी’च्या प्रस्तावनेत त्यांनी तीन विभागात लेखांचे वर्गीकरण करून, स्वतःच्या समीक्षादृष्टीचा प्रत्यय आणून दिला आहे
 
वीणा देव यांच्या जाण्याने, आमच्या पिढीतील एक अनमोल सांस्कृतिक वारसा हरपला आहे. पण, त्यांच्या आठवणी आणि त्यांचे विविधांगी कार्य या रूपाने हा वारसा निश्चितच टिकून राहील.

डॉ. वीणा देव यांचे निवडक लेखन-उपक्रम


* मराठी कथा कादंबर्‍यांची नाट्य रूपे-‘पीएचडी’ चा प्रबंध
* ’आशक मस्त फकीर’-राज्य सरकार तर्फे ‘उत्कृष्ट ललित साहित्य पुरस्कार’
* लेखसंग्रह-कधी कधी, परतोनी पाहे, स्त्रीरंग, विभ्रम, स्वान्सीचे दिवस
* ’स्मरणे गोनीदां’ची
* यशवंत देव आणि ह.वि. सरदेसाई यांच्या चरित्रांचे संपादन
* आकाशवाणी, दूरदर्शन, मॅजेस्टिक गप्पा अशा विविध व्यासपीठांवरून कार्यक्रमांचे सूत्रसंचालन
* साहित्य विषयक व्याख्यानांचे अनेक कार्यक्रम
* गो.नी.दांडेकर यांच्या साहित्याच्या सादरीकरणाचे असंख्य कार्यक्रम (डॉ. विजय देव आणि कुटुंबीयांसह)
प्रा. विजय आपटे
Powered By Sangraha 9.0