अशाश्वतला शाश्वत करणारा सामाजिक जाणिवेचे भान असलेला एक अवलिया रांगोळीचा जादूगार...वेद उर्फ वेदव्यास कट्टी या सर्जनशील व्यक्तिमत्वाविषयी...
वेद उर्फ वेदव्यास कट्टी यांचा जन्म दि. 30 मार्च 1964 रोजी सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथील राजेश्वर गावी झाले. मराठीतून शिक्षण पूर्ण करणारे वेद कट्टी कर्नाटकातील असले तरी, त्यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे आहे. वेद यांचे वडील मराठीचे शिक्षक तर, आई गृहिणी असूनही त्यांना समाजसेवेची मोठी आवड. कट्टी यांचे संपूर्ण कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असून स्वतः वेद हे बसवकल्याण येथे संघ शाखा प्रमुख होते.
तल्लख बुद्धीमत्ता असलेले वेद मुळात विज्ञान शाखेत पदवीधर असून, काही वर्ष त्यांनी केमिकल कंपनीत कामही केले. पण, कलेची आवड असल्यामुळे त्यांनी जाहिरात क्षेत्रात काम करण्याला पसंती दर्शवली. नंतर स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू करुन वेद यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. ’ग्राफिक डिझाइनिंग’, ’डिजिटल पेन्टिंग’, ’व्हिडिओ एडिटिंग’, ’चित्रकला’, ’इंटिरीअर आर्टस’, ’कॅलिग्राफी’, ’बासरी वादन’ ’काव्य’ अशा नानाविध कला अवगत असताना सर्जनशील वेद यांना रांगोळी काढण्याचे वेध लागले. भारतीय परंपरेत रांगोळीला गहन सांस्कृतिक महत्त्व आहे. रांगोळी अशी कला आहे, जी काढली गेल्यानंतर अल्पकाळ सादर होते, कायमस्वरूपी ती टिकून राहू शकत नाही, असे असताना देखील कलाकार आपला जीव ओतून रांगोळी साकारत असतात. भले ती रांगोळी कालांतराने नाहिशी होणार याची तमाही ते बाळगत नाहीत. वेद कट्टी हे देखील त्याला अपवाद नाहीत.
वेद यांच्या रांगोळी कलेची सुरूवात घरातूनच झाली. आपल्या संस्कृतीमध्ये परंपरेप्रमाणे घरात रांगोळी काढण्याची प्रथा आहे. त्यांची आई किंवा बहिण दररोज अंगणात आणि उंबरठ्याबाहेर दिसणारी सुबक कलाकृती साकारायची. आई आणि बहिणीचे हे कौशल्य पाहून वेद रांगोळीकडे आकर्षित झाले होते. नंतर 1995 सालापासून मोठ्या प्रमाणात त्यांनी रांगोळी प्रसार-प्रचाराचे काम हाती घेतले. कुणाकडूनही रांगोळी कलेचे पारंपरिक शिक्षण वेद यांनी घेतलेले नाही. स्वतःच्या अनुभवातूनच ही कला आत्मसात केली असून, या कलेला मोठे स्वरुप देण्यासाठी ते सतत झटत आहेत. पारंपरिक चिन्हांचा योग्य तो वापर करुन रांगोळी कला सादर करणे, चिन्ह, बोधचिन्ह यांचा रांगोळी कलेत विशिष्ट पध्दतीने कलाविष्कार करणे ही वेद यांची खासियत आहे. काही चिन्हांचा अभ्यास आणि शोध लावून त्यांचाही त्यांनी रांगोळीत समावेश केला आहे. यामुळेच ते रांगोळी क्षेत्रात रांगोळी सम्राट म्हणून ओळखले जातात.
वेद यांनी दोन विश्वस्त ‘रंगवल्ली परिवार’ व ‘रंगरसिक ट्रस्ट’ संस्था स्थापन केल्या असून या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. या कार्यकाळात रांगोळी विषयावर त्यांनी पाच पुस्तके प्रकाशित केली आहेत. रांगोळी कार्यशाळेतून जवळपास 60 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना रांगोळीचे प्रशिक्षण देऊन उत्तम रांगोळी कलाकार तयार केले आहेत. असे मोठे सामाजिक दायित्वाचे हे कार्य आपल्या मार्फत घडले असून यापुढेही घडत राहणार असल्याचे वेद अभिमानाने सांगतात. या क्षेत्रात प्रगती करत असताना वेद यांनी रांगोळी सुलेखन (powder form calligraphy) हा नवा प्रकार या जगासमोर आणला, यातील ते पायोनियर आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. रांगोळी सुलेखन ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रा, नाट्य संमेलने, कार्यक्रम, अनेक प्रात्यक्षिके, नुकतेच पार पडलेल्या ‘विश्व मराठी संमेलना’च्या प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाची सुरूवात वेद यांच्याच रांगोळी सुलेखनाने होत असते.त्यानिमित्त जगाच्या कानाकोपर्यात ही कला पोहोचवण्याचे श्रेय वेद यांना नक्कीच जाते.
हिंदू सणासुदीनिमित्त तसेच विविध कार्यक्रमांच्या औचित्याने अगदी चार इंचापासून ते 25 हजार चौरस फूट इतक्या भव्य महारांगोळ्या वेद यांनी घरापासून ते मोठ्या मैदानात साकारल्या आहेत. भविष्यात एक लाख चौ. फुटाची भव्य रांगोळी काढून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ स्थापित करण्याचा त्याचबरोबर परदेशात रांगोळी कलेचा प्रचार-प्रसार करण्याचा मानस असल्याचे ते सांगतात.
चित्र रांगोळी विभाग तसेच, रांगोळी सुलेखन वा कॅलिग्राफीसाठी अनेक इच्छुक कलाकारांना प्रगत करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. आदिवासी विभागात तसेच विद्यार्थांना, गरजूंना रांगोळी कलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यातून स्वयंरोजगार कसा मिळेल, याचेही मार्गदर्शन ते करीत आहेत. त्यांच्या या समाजभिमुख उपक्रमाबद्दल बर्याच सामाजिक संस्था तसेच, सन्माननीय व्यक्तींनी त्यांना सत्कार व पुरस्काराने सन्मानित केले आहे.
“सद्कार्य करण्यास तुम्ही जेव्हा सज्ज होता. तेव्हा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करुन ध्येय साध्य करण्याकडे लक्ष ठेवावे.” असा संदेश ते युवा पिढीला देतात. अशा या रांगोळीच्या सर्जनशील जादूगाराला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
9820414823