भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये कर्मयोग सांगितला. अर्थात एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हा कर्मयोग सांप्रत काळापर्यंत चालत आला आहेच. मात्र, आज त्यावर प्रत्यक्षात कार्य होणे गरजेचे आहे. अन्यथा नुसते आमच्या संस्कृतीत सारे काही आहे, असे म्हणून प्रगतीची कवाडे उघडणार नाहीत. तर आधुनिकता आणि अध्यात्माची सांगड घालत कर्मयोग साधावा लागेल...
माझे एक ज्येष्ठ स्नेही होते. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय अगदी आधुनिक होता. पण, त्यांची नाथपंथी उपासना-साधना होती. त्या मार्गातील गुरुंच्या आदेशानुसार त्यांनी आयुर्वेदाचा त्यातही ज्यांना झाडपाल्याची औषधे म्हणतात, त्यांचा खूप अभ्यास केला. त्यांना फार अप्रतिम अशी नाडीपरीक्षा अवगत होती. मानवी शरीरात कफ, वात आणि पित्त अशा तीन मुख्य नाड्या असतात. त्यातली एखादी जरी बिघडली, तरी शरीर रोगी बनते. निष्णात नाडीपरिक्षक रोग्याच्या मनगटावर हात ठेवून, नाडीपरीक्षा करतो आणि रोगनिदान करून पुढे औषधयोजना करतो.
एक दिवस मी या स्नेह्यांच्या घरी गेलो असताना ,त्यांच्या टेबलावर एक जाडजूड ग्रंथ दिसला. एका नामवंत प्रकाशन संस्थेने, इंग्रजी भाषेत छापलेला तो नाडीपरीक्षा शास्त्रावरचा ग्रंथ होता. मी उत्सुकतेने तो पाहू लागलो. लेखकाने खूपच परिश्रमाने माहिती गोळा करून, एक उत्कृष्ट ग्रंथ सिद्ध केला आहे आणि तोदेखील इंग्रजीत, यामुळे ‘आयुर्वेद आणि नाडीपरीक्षा’ इत्यादी विषयांना, भारतीयांचे जुनाट विषय किंवा स्यूडो सायन्स म्हणून नाके मुरडणार्या, अॅलोपॅथीवाल्यांच्या नाकाला चांगल्या मिरच्या झोंबतील, असे मला वाटले. मी माझा विचार स्नेह्यांना बोलून दाखवला. ते म्हणाले, होय. तू म्हणतोस ते राजकीय-सामाजिकदृष्ट्या (सोशोपॉलिटिकली) खरे आहे. भारतीयांचे (म्हणजे हिंदूंचे) ते सगळे जुनाट नि पाश्चिमात्यांचे ते सगळे आधुनिक असा पवित्रा घेऊन हिंदूंचा सतत मानभंग करणार्या, हिंदूंच्या मनात सतत न्यूनगंड पेरून राहाणार्या लोकांसाठी, हा ग्रंथ चांगले उत्तर आहे. पण, अगदी खरे बोलायचे, तर हे सगळे अॅकेडेमिक संशोधन आहे. खरे नाडीपरीक्षाशास्त्र वेगळेच आहे. ते गुरुमुखाने मिळते नि प्रत्यक्ष अनुभवाने समजत जाते. माझ्या गुरुंनी मला कफ-वात-पित्त या नाड्यांच्या बिघाडांमधले, सूक्ष्म असे 33 प्रकार किंवा कॉम्बिनेशन्स सांगितली आणि म्हणाले की, “सध्या तुला ऐवढे पुरेसे आहे. आता या सर्व गोष्टी ग्रंथबद्ध करणे शक्य नाही. म्हणून हा ग्रंथ चांगलाच आहे. पण, खरे ज्ञान वेगळेच आहे. फार व्यापक, सूक्ष्म आणि खोल आहे.” हा माझा स्वतःचा अनुभव अगदी या वर्तमान 21व्या शतकातला आहे.
आता 19व्या शतकातला एक किस्सा पाहूया. विष्णू मोरेश्वर छत्रे हा माणूस, 1840 साली पटवर्धन संस्थानिकांच्या ’जमखिंडी’ या संस्थानात जन्मला. साधारण 1860 सालच्या सुमारास, विष्णू जमखिंडीहून प्रथम मुंबईला आणि मग इंदूरमार्गे ग्वाल्हेरला गेला. यातला बराचसा प्रवास, विष्णू आणि त्याचा मित्र धोंडू यांनी पायी चालत केला. कशासाठी? ग्वाल्हेरचे संस्थानिक जयाजीराव शिंदे यांच्या पदरी श्रीमंत बाबासाहेब आपटे नावाचे सरदार होते. ते अश्वविद्येत इतके निष्णात होते की, त्यांना ’अश्वहदयज्ञ’ म्हणून ओळखले जात असे. महान गायक उस्ताद हद्दूखाँ हे देखील शिंदे सरकारांचे राजगायक म्हणून, ग्वाल्हेरलाच राहात होते. तेव्हा आपट्यांकडून अश्वविद्या आणि हद्दूखाँ कडून गानविद्या शिकून घ्यायची, असा विष्णूचा बेत होता. विष्णूची तडफड पाहून, श्रीमंत बाबासाहेब आपटे त्याच्यावर प्रसन्न झाले. प्राचीन हिंदू अश्वशास्त्रज्ञ शालिहोत्र याचा अश्वशास्त्रावरील ग्रंथ ‘शाल्यहोत्र’ हा, विष्णूला वाचून समजावून देणे आणि शिंदे सरकारांच्या घोडदळातील विविध घोडे प्रत्यक्ष दाखवून ते ज्ञान पक्के करणे, अशा पद्धतीने त्यांनी विष्णूला अश्वविद्या दिली. अशाच रीतीने उस्ताद हद्दूखाँकडून, गानविद्या मिळवून विष्णू आता विष्णुपंत बनून महाराष्ट्रात घरी परतला. लवकरच त्याच्या जमखिंडी, कुरुंदवाड, बुधगाव, तासगाव इत्यादी पटवर्धनी भाऊबंदांची संस्थाने आणि विंचूर, कागल, जव्हार इत्यादी अन्य संस्थानांच्या प्रमुखांशी ओळखी झाल्या. अश्वविद्येतील त्यांच्या निपुणतेमुळे हे संस्थानिक, विष्णुपंतांना मान देऊ लागले. स्वत:बरोबर प्रवासाला नेऊ लागले. साधारण 1880 सालच्या सुमारास, काही संस्थानिक विष्णुपंतांसह मुंबईला आले होते. त्यावेळी मुंबईत विल्सन नावाच्या माणसाची सर्कस चालू होती. त्या सर्कशीतले माकडांचे, कुत्र्यांचे आणि विशेषतः घोड्यांचे कसरतींचे खेळ फारच सुंदर होत असत. ते पाहून कुणा एका संस्थानिकाने विष्णुपंतांना म्हटले, “काय हो, तुमच्या अश्वविद्येत अशा कसरतींचे खेळ असतात का?” विष्णुपंत उत्तरले, “अहो, हा तर निव्वळ खेळ आहे. खरी अश्वविद्या वेगळीच आहे, तुम्ही प्रत्येकाने मला दोन-चार चांगले घोडे द्या. मी तुम्हाला सहा ते आठ महिन्यांत यापेक्षा उत्तम खेळ बसवून दाखवतो!
विष्णुपंत आता जमखिंडीहून कुरुंदवाड या दुसर्या एका पटवर्धनी संस्थानात मुक्कामाला होते. दोघा-तिघा संस्थानिकांकडून एकंदर दहा-बारा उत्तम घोडे कुरुंदवाडला पोचते झाले. विष्णुपंतांनी त्या घोड्यांबरोबरच माकडे, कुत्रे आणि गावातली मुले यांनाही, विविध खेळांचे प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. सुमारे आठ-नऊ महिन्यांनंतर, मुंबई प्रांताचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर जेम्स फर्गसन, बॅरोनेट यांनी कुरुंदवाड संस्थानला भेट दिली. तेव्हा त्यांच्यासमोर विष्णुपंतांनी या सर्कशीचा पहिला खेळ सादर केला. गव्हर्नर भलतेच खूष झाले. मग प्रथम पुण्यात आणि नंतर मुंबईत सर्कस पोचली. बहुधा तो 1882 सालचा डिसेंबर महिना होता. बोरीबंदर रेल्वे स्टेशनसमोरच्या आझाद मैदानात तेव्हा त्याला ’कांपाचे मैदान’ म्हणजे , इंग्रज सैनिकांच्या कॅम्पचे मैदान म्हणत असत. विल्सन साहेबाच्या सर्कशीचा शोभिवंत तंबू आणि विष्णुपंत छत्र्यांच्या सर्कशीचा साधासा, ओबडधोबड तंबू यांचा मुक्काम समोरासमोर पडला. लवकरच इंग्रज प्रेक्षकांसकट मुंबईकर पब्लिक छत्रे सर्कसवर इतकी फिदा झाली की, विल्सन सर्कस डबघाईला आली. शेवटी विल्सन साहेबाने, आपली सर्कस विष्णुपंतांनाच विकली. हीच ती भारताची आधुनिक काळातली पहिली सुप्रसिद्ध ’छत्रे सर्कस!’ विष्णुपंतांनी भारतभर दौरे केले नि पुढे त्यांचे बंधू काशिनाथपंत हे तर जगभर फिरून आले. भौतिक भरभराटीची ही कथा समजून घेतानाच, विष्णुपंतांच्या संस्थानिकांना दिलेल्या उत्तरातले महत्त्वाचे वाक्य लक्षात ठेवायचे. हा तर सगळा खेळ आहे. खरी अश्वविद्या वेगळीच आहे.
इ. स. 1025 साली गझनीच्या महंमदाने सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त केले. पण, भारतात थांबण्याची त्याची हिंमत झाली नाही. कारण, हिंदू राजे बर्यापैकी एकजुटीने उभे राहिले. पण, मुसलमान हळूहळू पुढे सरकत राहिले आणि जागृत झालेले हिंदू पुन्हा झोपी गेले. 1191 साली महंमद घोरीने पृथ्वीराज चौहानाचा निर्णायक पराभव केला. तेव्हापासून थेट 1947 सालापर्यंत, दिल्लीच्या राजसिंहासनावर कधीही हिंदू शासक येऊ शकला नाही. तर महंमद घोरीचा एक सरदार बखत्यार खिलजी हा दिल्लीपासून पूर्वेकडे गंगेच्या खोर्यात घुसला आणि त्याने बिहार-बंगाल प्रांत जिंकले. बिहारची राजधानी पटना शहरापासून आग्नेयेला सुमारे 90 कि.मी. अंतरावर, नालंदा हे अतिशय प्रख्यात विद्यापीठ होते. आधीच्या सहाशे वर्षांपासून हे विद्यापीठ कार्यरत असल्यामुळे, तिथे विविध विषयांवरचे अक्षरश: लक्षावधी ग्रंथ होते. खिलजीने आपल्या सैनिकांना ते सगळे ग्रंथ जाळून टाकण्याचा हुकुम सोडला, नालंदा विद्यापीठाचे प्रमुख भिक्षू खिलजीला असे न करण्याची विनंती करू लागले. तेव्हा त्याने विचारले, “आमच्या धर्मग्रंथात जगातले सगळे ज्ञान आहे, त्यापेक्षा वेगळे या ग्रंथांमध्ये काय आहे?” “बरेच काही आहे,” मुख्य भिक्षू म्हणाले, “असंख्य विषयांचे अतिशय सखोल आणि सूक्ष्म ज्ञान यांत शब्दबद्ध केलेले आहे. असे असेल तर ते जाळलेच पाहिजे. कारण, आमच्या धर्मग्रंथाबाहेरचे ज्ञान हे सैतानी ज्ञान आहे,” खिलजी म्हणाला. “नाही म्हणजे, कदाचित तुमच्या धर्मग्रंथात ते ज्ञान बीजरूपाने आहे, ते या ग्रंथांमध्ये विस्ताराने मांडले आहे,” मुख्य भिक्षू बचाव करत म्हणाले. “होय ना? मग एका ग्रंथात जे बीजरूपाने आहे, ते पुरेसे आहे. एवढे लाखो ग्रंथ कशाला सांभाळत बसायचे?” खो,खो हसत खिलजी म्हणाला, “पुढचे सहा महिने नालंदा ग्रंथालय जळत होते. बहुसंख्य भिक्षूंची कत्तल झाली. जे बचावले, ते तिबेटमध्ये पळून गेले. ही इसवी सन 1200 सालामधली गोष्ट आहे.”
स्वामी विवेकानंद 31 मे 1893 सालच्या या दिवशी, मुंबईहून जहाजातून निघाले ते चीन, जपान मार्गे पॅसिफिक महासागर ओलांडून, 25 जुलै 1893 रोजी कॅनडामध्ये व्हँकूव्हरला पोचले. तिथून दुसर्या दिवशी रेल्वेने, शिकागोला पोचले. शिकागो शहरात 5 मे 1893 सालापासून, ’वर्ल्ड कोलंबियन एक्स्पोझिशन’ नावाचे अतिभव्य प्रदर्शन सुरू झालेले होते. ज्या सर्वधर्मपरिषदेमध्ये स्वामीजींना हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून भाषण करायचे होते, ती परिषद म्हणजे या भव्य प्रदर्शनामधला एक विषय होता. परिषदपुढे सप्टेंबरमध्ये होती. तेव्हा स्वामीजी प्रदर्शनात सर्वत्र फिरले. पाश्चिमात्य जगाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर भौतिक क्षेत्रांमध्ये केवढी प्रचंड झेप घेतली आहे, याचे दिपवून सोडणारे प्रत्यंतर प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉल मधून येत होते. प्रत्येक स्टॉल म्हणजे एक अख्खी इमारतच होती. त्यांत शेती, बागायती, खनिजे आणि खाण उद्योग, वीज निर्मिती, यंत्र निर्मिती, मत्स्य व्यवसाय, जंगले आणि वने संबंधित उद्योग, रेल्वे उद्योग, कला, मानववंशशास्त्र आणि वाहतूक उद्योग, इत्यादी प्रमुख क्षेत्रांसह, इतर असंख्य आनुषंगिक क्षेत्रांमधली पश्चिमेची म्हणजे अर्थातच मुख्यत: अमेरिकेची प्रगती ठळकपणे मांडलेली होती. स्वामीजी ते प्रदर्शन बघून कमालीचे प्रभावित झाले. किमान आठ दिवस ते पुनःपुन्हा जाऊन, प्रदर्शनातले विविध स्टॉल्स बारकाईने पाहात होते.
नंतर याबद्दल विचार व्यक्त करताना स्वामीजी म्हणतात, पश्चिमेचे हे विज्ञान आणि भारताचे अध्यात्म एकत्र आले पाहिजे, तरच भारताची प्रगती होईल. भारताकडे पूर्वी हे ज्ञान होते. आपल्या सततोद्योगाने त्याने कर्मयोगाचे हे ज्ञान प्राप्त करून घेतलेले होते. पण, काळाच्या ओघात कर्मयोग मागे पडला. ’स कालेनेह महता योगो नष्टः परंतप’ प्रिय वाचक, मी एका पाठोपाठ एक चार सत्य घटना तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. आमची वृत्ती बखत्यार खिलजीची नक्कीच नाही. आमचा आदर्श विनेकानंद आहे. पण, म्हणजे अध्यात्माबरोबर भौतिक विज्ञानाची सांगड घालण्याचे श्रम, आपल्याला करणे आवश्यक आहे. हे ज्ञान प्राचीन काळी आमच्याकडे होतेच अशी डिंग मारून भागणार नाही. काळाच्या ओघात मागे पडलेला तो कर्मयोग, आपल्याला सततोद्योगाने पुन्हा जीवित करावा लागेल. अन्यथा आमचे तरुण भौतिक सुखाच्या शोधात, असेच पश्चिमेकडे पळत राहातील आणि इथे राहातील ते नाईलाज म्हणून राहातील. पश्चिम अशीच विज्ञान-तंत्रज्ञानात कायम आमच्या पन्नास वर्षे पुढे राहील आणि आम्ही तोंडाने अध्यात्माचे गोडवे गाण्याचे ढोंग करीत, प्रत्यक्षात अर्धवट बाटगे जीवन जगत राहू. तेव्हा हे अर्जुना, उठ, निश्चय कर आणि कृती करायला सज्ज हो. मग खरे ज्ञान तुला आपोआप मिळेल.
तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चय: