हिंदुत्वाचा डंका

01 Nov 2024 21:47:38
editorial on us presential election trump promises
 
 
अमेरिकेत हिंदू मते ही निर्णायक असल्यानेच, तेथील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आपले मित्रत्वाचे संबंध असल्याचेही ते नमूद करतात. भारत हा जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. म्हणूनच, भारताला न दुखावण्याचे धोरण अमेरिकेने अवलंबलेले दिसून येते.

अमेरिकेतील कट्टर डाव्या पक्षांच्या धर्मविरोधी अजेंड्यापासून येथील हिंदू अमेरिकी नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याचे वचन देत, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हिंदू अमेरिकी बांधवांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी तसेच, भारताशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा जोर दिला आहे. आपल्या कार्यकाळात अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध चांगले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत, असे ट्रम्प यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे. त्याचवेळी, बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाकी शक्तींनी उलथून टाकल्यानंतर तेथील हिंदू बांधवांवर जे हल्ले झाले, त्याचाही ट्रम्प यांनी निषेध केला आहे. “बांगलादेशातील क्रूर हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो,” असे ट्रम्प थेटपणे सांगतात. ट्रम्प हेही कट्टर विचारसरणीचे असल्याचे मानले जाते. त्यामुळेच अमेरिकेतील डाव्या विचारसरणीला ते नकोसे आहेत. त्यांचा कट्टरवाद हा चीनलाही न मानवणारा असाच. त्यामुळेच, गेल्या वेळच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनने हस्तक्षेप करत, ट्रम्प यांचा पराभव होऊ दिला, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधांचा उच्चार करणे, यातून ते थेट संदेश देऊ इच्छितात. त्या संदेशाचा म्हणूनच अर्थ समजून घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे पंतप्रधान नसून, ते जागतिक नेते झाले आहेत. गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जगभरातील नेते त्यांच्याभोवती गर्दी करताना दिसून आले आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या राष्ट्रांच्या प्रमुखांनाही मोदी यांच्यासमवेत सेल्फी काढण्याचा मोह आवरलेला नाही. म्हणजेच, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारालाही मी मोदींचा मित्र आहे, असे सांगावेसे वाटणे याचा अर्थ मोदींच्या जागतिक नेतृत्वावर त्यांनी दाखवलेला हा विश्वासच होय. तसेच मोदी यांच्या ध्येयधोरणांमुळे विविध देशांमध्ये हिंदूंचे हित साधण्यावर त्यांनी जो भर दिला आहे, त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेतील हिंदू हिताचे आपण संरक्षण करू, हे ट्रम्प यांना सांगणे भाग पडले आहे. भारतीय धर्म, संस्कृती, आणि परंपरांचा प्रचार जगभरात वाढत असून, यामुळे अनेक देशांमध्ये भारतीय समुदायाला सकारात्मक दृष्टीकोन मिळत आहे.

त्याचवेळी, हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचेच आहे, असा स्पष्ट संदेश यातून मिळतो. आधुनिक युगात धार्मिक तणाव आणि संघर्ष वाढत असताना, अमेरिकेत त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे स्पष्ट आश्वासन ट्रम्प देत आहेत. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली असून, त्याची दखल अमेरिकेला घेणे भाग पडले आहे, असेही म्हणता येईल. तेथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या अमेरिकी हिंदू बांधवांची संख्या दुर्लक्षित करता येणारी नाही. तसेच, हिंदू मते ही निर्णायक असल्यानेच, ट्रम्प यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल ग्वाही द्यावी लागली आहे. ‘नोबेल पुरस्कार’ विजेते मोहम्मद युनूस हे बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख असताना, तेथील हिंदू बांधवांवर जे अत्याचार झाले, त्याचा निषेध करत, ट्रम्प हे त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे धोरण काय राहील, हेही अप्रत्यक्षपणे अधोरेखित करत आहेत. जेव्हा अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक, विशेषतः हिंदू, राजकीय प्रक्रियेत अधिक सक्रिय बनत आहेत, अशा वेळी अमेरिकी हिंदू बांधवांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे वचन ट्रम्प देतात.

अमेरिकेतील निवडणुकांमध्ये हिंदू हितांचा प्रश्न एक महत्त्वाचा मुद्दा बनत चालल्याचे यातून ठळकपणे समोर आले आहे. भारतीय अमेरिकन समुदायाचा व्होट बँक म्हणून प्रभाव वाढत असून, त्यांचा राजकारणातील वाढत असलेला सहभाग यामुळे या समुदायाच्या हितांची जपणूक करण्याची गरज यातून दिसून येते. भारतीय अमेरिकन समुदाय नेहमीच राजकीय आवाहनांमध्ये सक्रिय राहिला आहे. आणि म्हणूनच संख्यात्मकदृष्ट्या त्यांच्या मतांचा विचार करणे आवश्यक बनले आहे. धार्मिक असहिष्णुता, सांस्कृतिक भेदभाव आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण या विषयांवर चर्चा घडवून आणत, हिंदू अमेरिकन समुदायाला दिलासा देण्याचा प्रयत्न तेथे होताना दिसतो. भारतीय अमेरिकन समुदायाचे अमेरिका अर्थव्यवस्थेत योगदान महत्त्वाचे आहे. उच्चशिक्षित आणि उद्योजक असलेल्या या समुदायाचे यश प्रस्थापित करताना, त्यांच्या हिताची जपणूक अधिक आवश्यक ठरते. अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये हिंदू हित हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच, त्यांच्या हिताचा विचार होताना दिसून येतो.

न्यूयॉर्कमधील शाळांना यावर्षी पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी दिली गेली आहे. हा निर्णय भारतीय अमेरिकन समुदायाच्या वाढत्या प्रभावामुळे घेतला गेला, असे नक्कीच म्हणता येते. अमेरिकी हिंदूंना त्यांची संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करण्यात त्याची मदत होत आहे. व्हाईट हाऊस या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या अधिकृत निवासस्थानी दिवाळीचा फराळ गेल्या वर्षी ठेवला गेला होता, हेही विसरून चालणार नाही. हिंदू अमेरिकन समुदायाची संख्या सुमारे 3.5 ते 4 दशलक्ष इतकी असल्याचे ढोबळमानाने मानले जाते. प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा जास्त असू शकतो. मात्र, ही मते निर्णायक आहेत. सत्या नडेला, शांतनु नारायण, इंद्रा नुयी, अर्चीत मिश्रा, पराग अग्रवाल हे काही भारतीय तेथे दिग्गज टेक कंपन्यांच्या प्रमुखपदी आहेत.

कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच, ट्रम्प यांनी केलेले हे विधान म्हणूनच महत्त्वाचे ठरते. एकीकडे कॅनडा उघडपणे भारतविरोधी भूमिका घेत असून, दररोज वादग्रस्त व्यक्तव्य करत आहे. त्याचवेळी, अमेरिकेसारखी महासत्ता असा आततायीपणा करण्याचे टाळत आहे, हे लक्षणीय. कॅनडात अधिकृतपणे दिवाळी साजरी केली जात नाही, आणि अमेरिका ती साजरू करू देते. म्हणजेच, तेथील राजकीय पक्ष हिंदूंच्या हिताची भूमिका घेते आणि तेथील सरकार उघडपणे भारतविरोधी भूमिका घेत नाही. ही परिस्थिती अतिशय बोलकी आहे. भारत ही निर्विवादपणे महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. अशावेळी हिंदूंविरोधात जाण्याचे धाडस अमेरिकाही दाखवत नाही. हिंदूंची वाढती ताकद यातून अधोरेखित झाली आहे. अमेरिकेसारख्या देशातही हिंदूंची मते निर्णायक आहे, हेच यातून सिद्ध होते. ट्रम्प यांच्या विधानाने देशातील तमाम पुरोगाम्यांना उचकी लागणार हे नक्की असले तरी जगभरातील कोट्यवधी हिंदू बांधवांना ही सुखावणारी बाब आहे. हा हिंदुत्वाचा डंका आहे




Powered By Sangraha 9.0