हिंदूहिताच्या रक्षणाची डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ!

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात उठवला आवाज

    01-Nov-2024
Total Views |

Donald Trump

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Donald Trump Hindu interest)
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक तोंडावर आली असताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकन हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याची आणि कट्टरपंथींच्या अजेंड्यापासून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे. त्यासोबतच ते भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याबाबतही बोलले आहेत.

हे वाचलंत का? : ऐन दिवाळीत केली भावनिक पोस्ट; शेअर केला पाकिस्तानी हिंदू मुलाचा 'तो' व्हिडिओ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहित बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक गटांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. त्यांनी लिहिले की, मी हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. बांगलादेशात कट्टरपंथींच्या जमावाकडून त्यांच्यावर हल्ले करून त्यांना लुटले जात आहे. अशाने याठिकाणी संपूर्ण अराजकतेची स्थिती तयार झाली आहे.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उपराष्ट्रपती कमला हॅरिस हिंदूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “माझ्या कार्यकाळात असे कधीच घडले नाही. कमला आणि जो बायडन यांनी जगभरातील आणि विशेषतः अमेरिकेतील हिंदूंकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी इस्रायलपासून युक्रेनपर्यंत आणि आपल्या दक्षिणेकडील सीमेपर्यंत कहर केला आहे. आम्ही अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू आणि सामर्थ्याने शांतता प्रस्थापित करू” असे म्हणत शेवटी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.