मुंबई : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन ६ ऑक्टोबर २०२४ रोजी अवघ्या ७० दिवसांत संपला. सूरज चव्हाणचा गुलीगलत पॅटर्न यंदाच्या सीझनमध्ये गाजला आणि अखेर ट्रॉफी सूरजने बारामतीला नेलीच. तसेच, हे पर्व गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे रितेश देशमुख याचं होस्टिंग. पहिल्यांदाच त्याने बिग बॉसचं होस्टिंग केलं होतं. आणि रितेशने 'भाऊचा धक्का' त्याच्या स्टाईलमध्ये नक्कीच उत्तम केला. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या पुढच्या पर्वाचंही सूत्रसंचालन करणार का? याचं उत्तर रितेशने दिलं आहे.
बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले झाल्यावर रितेश देशमुखने विजेता सूरज चव्हाणसोबत फोटो शेअर केला. त्यानंतर 'मुंटा'ला दिलेल्या मुलाखतील बिग बॉसच्या पुढच्या पर्वात भाऊ दिसणार का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, "माझे लहान भाऊ मला दादा म्हणतात तर मी माझ्या मोठ्या भावांना भैय्या म्हणतो. घरात कोणीच एकमेकांना भाऊ अशी हाक मारत नाही. मला पहिल्यांदा भाऊ हाक मारणारा सलमान खान आहे. आम्ही दोघंही मग एकमेकांना भाऊ म्हणतो. अख्खी दुनिया सलमानला भाई म्हणते पण मी त्याला भाऊ म्हणतो. आमचं नातंही भावासारखंच आहे. हे प्रेमळ नाव त्यांनीच मला दिलं आहे."
रितेश पुढे म्हणाला की, "प्रेक्षकही आता मला भाऊ म्हणतात. याचा अर्थ मी त्यांना त्यांच्यातलाच वाटतो. एकमेकांचा आदर करणं हीच तर आपली संस्कृती आहे. त्यामुळे मला सगळे भाऊ म्हणतात हे ऐकून मला आनंदच होतो. तसंच यासोबत जबाबदारीही येते. पुढच्या बिग बॉसमध्ये दिसणार की नाही हा निर्णय तर चॅनलचाच असेल."
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात शेवटची लढत अभिजित सावंत आणि सूरज चव्हाणमध्ये झाली होती. आणि प्रेक्षकांनी भरघोस मतांचा वर्षाव करत सूरज चव्हाणला विजेतेपद मिळवून दिलं. आता रितेशच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात दिसणार की पुन्हा महेश मांजरेकरांची एन्ट्री होणार हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.