मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट, स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट, मराठीतील एक ‘बिग बजेट’ चित्रपटांपैकी चित्रपट, अशा अनेक वैशिष्ट्यांसह पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘एक राधा एक मीरा’ या म्युझिकल लव्ह स्टोरीबद्दल रसिकांमध्ये उत्कंठा लागून राहिली असताना निर्मात्यांनी चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित केला आहे. अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अशा या चित्रपटाची निर्मिती अविनाशकुमार प्रभाकर आहाले यांनी केली असून त्यात गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर आदींच्या भूमिका आहेत.
‘एक राधा एक मीरा’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. सोनू निगम, शाल्मली खोलगाडे, सुखविंदर सिंग यांसारख्या दिग्गज गायकांच्या फौजेने चित्रपटाचे पार्श्वगायन केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे.
‘प्रेम म्हणजे आतल्या आत गुंगुंलेले गाणे..’ ‘प्रेम म्हणजे स्वतःतच स्वतःला हरवत जाणे...’ ‘प्रेम म्हणजे कुणालातरी हवेहवेसे वाटणे...’ ‘प्रेम म्हणजे कुणीतरी आभाळ होवून दाटणे...’ ‘...फक्त जेव्हा ती आभाळ होवून दाटेल तेव्हा इतकेच व्हावे...धरती होवून मी स्वतःला अंथरलेले असावे...’अशा आशयाचे भिडणारे शब्द या टीझरमध्ये ऐकू येतात.
आहालेज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट स्लॉव्हेनीया येथे चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे. अत्यंत नैसर्गिक व अभूतपूर्व अशी दृश्ये चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवतात. त्यात छान छान, सुंदर व भावणारे चेहरे हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, हे त्या टीझरवरून ध्यानात येते.