पवार इंदापूरच्या जनतेला भावनिक साद घालत होते. पण, दुसरा गणंग मराठी माणसाच्या लाडक्या गणपती बाप्पाबद्दल जे बोलला, ते तर या इसमाचा पायातले खेटर काढून समाचार घेण्यासारखे होते.
आयुष्यभर इतरांचे पक्ष फोडून आज स्वत:चा पक्ष फुटल्यानंतर गावभरचे गणंग गोळा करुन मोटा आणि मोळ्या बांधायचा उद्योग शरद पवारांनी चालविला आहे. बदलत्या काळानुसार पवार आपली धोरणे बदलतात; राजकीय अमिबाच जणू! मधल्या काळात पवारांनी मंदिरात वगैरे जाण्याचे जादूचे प्रयोग लोकांना करुन दाखविले खरे; पण लोकसभेत त्याचा फायदा, काही उपयोग झालेला दिसला नाही. जे मोदींविरोधी वातावरण महाराष्ट्रात लोकसभेच्या निमित्ताने निर्माण केले गेले, ते किती खोटे होते, हे आता सूज्ञ मतदारांनाही कळून चुकले आहे. गंमत म्हणजे, संविधान बदलण्याचा कांगावा किती खोटा होता, हे राहुल गांधींच्या परदेश दौर्यादरम्यान केलेल्या आरक्षण बदलण्याच्या विधानावरुन लक्षात आले आणि सारा डावच पलटला. एका बाजूने मोदींनी संविधान जागरापासून ते संविधान मंदिरे बांधण्यापर्यंतच्या उपक्रमांना हात घातला, तर दुसर्या बाजूला विरोधक हरियाणा भाजपला मिळणार्या संभाव्य पराजयाच्या बिरबली खिचडीच्या आनंदात हरवून गेले. पक्ष गेले, आमदार गेले, मंत्री गेले. कुटुंबातला सगळ्यात कर्तबगार माणूसही सोडून गेला. घरातल्यांचा बाकी वकूब पवारांना चांगलाच माहीत आहे. त्यामुळे मुलीला किंवा हल्ली बळेबळे पांढरे केस ठेवून प्रौढ होण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहित पवारांची सत्तेत कुठेही वर्णी पवारांना लावता आलेली नाही.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे, पवारांची सगळी नवीन शस्त्रास्त्र आता गळून पडली आहेत. पर्यायाने श्रद्धा, अस्मिता, भावना यांना धक्का लावणार्या आपल्या विषारी मंडळींना पुन्हा कुरवाळायला आणि संदर्भात आणायला, शरद पवारांनी सुरुवात केली आहे. ज्ञानेश महाराव हे त्यांपैकी एक. त्यांनी परवा असेच अकलेचे तारे तोडले. स्वामी समर्थ हे मध्यमवर्गीय मराठी माणसाचे श्रद्धास्थान. आयुष्यभर अंगावरच्या कपड्यांचीही लालसा न बाळगता परमार्थाचे बोध स्वामींनी भक्तांना दिले. त्यावर हा महाराव ‘घरात असे कोणी वावरले तर चालेल काय,’ असा प्रश्न विचारु लागला. याला ताजा कलम म्हणजे, भाजपचा एक साधा कार्यकर्ता असलेल्या राजेश शिरवडकर यांनी त्याच्या घरी धडक दिली असता, हा महागणंग चक्क माफी मागून मोकळा झाला. म्हणजे, यांच्या भूमिकाही किती लेच्यापेच्या असतात, हे लक्षात येईल. दुसरा असाच प्रकार इंदापूरचा. कितीही मिळाले तरी समाधान न बाळगणारा एक मोठा वर्ग आहे, तो सतत या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत असतो. अशांचा बाजार बसवूनच पवारांनी आजतागायत सत्तेची पायरी चढली आहे. बरं, हा प्रकार पायरीवर चढण्याइतकाच, कारण ते प्रमुख पदावर कधीच पोहोचले नाही. पवार इंदापूरच्या जनतेला भावनिक साद घालत होते. पण, दुसरा गणंग मराठी माणसाच्या लाडक्या गणपती बाप्पाबद्दल जे बोलला, ते तर या इसमाचा पायातले खेटर काढून समाचार घेण्यासारखे होते. ‘गणपती दूध प्यायला,’ अशी एक दंतकथा नव्वदीच्या दशकात पसरली होती. गणेशभक्त तो प्रकार विसरुनही गेले. अश्रद्ध, धर्मद्वेष्टे मात्र सारखा तो प्रकार उगळून हिंदूंच्या श्रद्धांची टवाळी करतच असतात. हा महाभाग ‘गणपती दूधाऐवजी दारु पिऊ लागला, म्हणून पवार साहेबांनी त्याला विसर्जित केला,’ असे काही बरळून गेला. पवार साहेब त्यांनी बसवलेल्या गणपतीपेक्षा किती पॉवरफुल्ल आहेत, हे सांगण्याचा हा सगळा ओंगळवाणा प्रकार होता. कोणी आपल्या नेत्याला काय संबोधावे, हा ज्या-त्या कार्यकर्त्याचा आणि नेत्याचा प्रश्न. मात्र, हे करीत असताना त्याने हिंदूंच्या श्रद्धांना धक्का लावू नये. पवार साहेब पंतप्रधान होणार, हे स्वप्न पूर्वीचे आणि आजचे अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तहहयात पाहत आले. त्यांचे भाट त्यांचे हे पद कसे हुकले, त्याच्या रंजककथा सांगत असतात. मनोरंजनासाठी मराठी जनता ते ऐकते व वाचतेही. मात्र, त्यापेक्षा कोणीही ते गांभीर्याने घेत नाही. इथे मात्र जे चालू आहे, ते संतापजनक आहे.
असाच एक युट्यूब इतिहासकार महाराष्ट्रात वाघनखे येणार म्हटल्यावर जागा झाला होता. खरं तर ही वाघनखे आल्यावर त्याचा राजकीय लाभ भाजपला होईल, या भीतीतून हे भूत बाहेर काढून, त्याचे ताबूत नाचवले गेले. आता हा इतिहासकार काय संशोधन करतो, याची कुणालाच कल्पना नाही. मात्र, एकदा संभ्रम निर्माण केला की तेवढा काळ धुरळा निर्माण करता येतो. अंतुलेंपासून डझनभर काँग्रेसवाल्यांनी भवानी तलवार आणि वाघनखे आणण्याचे स्वप्न महाराष्ट्राला दाखवून गंडवले. सुधीर मुनगंटीवारांनी ते धाडस केले आणि वाघनखे राजधानी सातार्याला पोहोचली. खरं तर कोणताही इतिहासकार मानणार नाही, असे चमत्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी करुन दाखविले. हिंदूंना आत्मभान दिले. हा मुद्दा नखे किंवा धातूच्या तलवारीचा नव्हता, तर हिंदूंना जागृत करुन हिंदूंचे स्वायत्त, सार्वभौम व स्वयंभू सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा यशस्वी प्रयोग महाराजांनी केला आणि त्याची यशसंपदा महाराष्ट्राच्या अठरापगड जातींनी आणि बारा बलुतेदारांनी सांभाळली. स्वत:ला ‘आलम दुनियेचा बादशाह’ म्हणून बिरुदावली लावणार्या औरंगजेबाला महाराष्ट्रातच कायमचे निजवले. महाराष्ट्राची राजकन्या अपहरण करणार्या अल्लाउद्दीन खिल्जीचा आणि महाराष्ट्राचा राजपुत्र सुंता करुन घेत नाही, हे कळल्यावर त्याची धिंड काढून, हाल हाल करुन ठार मारणार्या औरंगजेबाचा हा मराठ्यांनी उगवलेला सूड होता. मात्र, हे बुणगे त्या औरंगजेबाच्या कबरीवर माथी रगडायला जातात आणि छत्रपती संभाजीनगर असे म्हणायला नकार देत औरंगाबादच म्हणतात. मुद्दा वाघनखाचा किंवा तलवारीचा नाही, मुद्दा त्या जाज्वल्य हिंदू इतिहासाचा आहे. शरद पवारांना हे सगळे कळत नाही, असे अजिबात नाही.
श्रद्धा आणि स्वाभिमान दुबळा केला की एक बुजरी, मेंगळट मतपेढी तयार होते, जी क्षणिक स्वार्थासाठी दीर्घकालीन राष्ट्रहित विसरते आणि अशा बुणग्यांच्या पदरात मतांचे दान टाकते. हे भोंगळ संन्याशापेक्षा सोंड्यांनाच प्रमाण मानायला लागतात. हरियाणात जाटांना असेच खोटे सांगून भाजपच्या विरोधात उभे करण्यात आले. हा खोटा नॅरेटिव्ह संविधान बदलण्याच्या खोट्या नॅरेटिव्हइतकाच अस्सल होता. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबतही असेच पसरविले गेले आहे. खरे तर फडणवीसांनी महाराष्ट्रात मराठा समाजासाठी इतके केले की, सग्यासोयर्यांची मागणी मानली गेली, तर सख्खा सगा-सोयरा म्हणून मराठा समाज देवेंद्र फडणवीसांचेच नाव लिहील. मात्र, अशाच एकाच्या तोंडून खोटा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे.
हरियाणाचा निकाल अनेकांची काळजी वाढवणारा आहे. इथे तर संजय राऊत काँग्रेसला सल्ला देण्याच्या नादात उद्धव ठाकरेंनाच अधिक गर्तेत ढकलत आहेत. हा काळ आला ते बरेच झाले. महाराष्ट्र वाचविण्याचे, मराठी माणसाला वाचविण्याचे, मराठी माणसाचे हित साधण्याचे, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याच्या नावाखाली स्वत:चे आणि स्वत:च्या पोरा-पोरींचे पानं लावणार्यांचे फाटके बुरखे इथे उघडे पडून चेहरे समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने हे सारे बेगड समजून घ्यावे व भविष्यातील महाराष्ट्रासाठी भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार महाराष्ट्रात पुन्हा विराजमान करावे.