जेव्हा झाकीरला फुटतो घाम...

08 Oct 2024 21:46:24
pakistan guest zakir naik


भारतातून फरार घोषित झालेला इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक सध्या पाकिस्तान दौर्‍यावर आहे. त्याचा हा दौरा अशा वेळी होत आहे की, जेव्हा सप्टेंबर महिन्यात त्याने आपल्या सोशल मिडियावरून वक्फ बोर्डाच्या मुद्द्याबाबत, भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता दि. 5 ऑक्टोबरला कराचीपासून सुरू झालेला हा दौरा, 20 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये संपणार आहे. विशेष म्हणजे या दौर्‍यावेळी त्याच्यासोबत अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे त्याचा तिळपापडही झाल्याचे दिसले, आणि तो घामाघूम झाल्याचेही पाहायला मिळाले.

भारतातून फरार झालेला झाकीर नाईक सध्या मलेशियात आश्रय घेत आहे. त्याच्यामते, पाकिस्तान ऐवजी मलेशिया हा खरा इस्लामिक देश आहे. पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यापूर्वी झाकीरने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये त्याने भारतातील मुस्लिमांना वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यास सांगितले होते. त्यास इस्लामविरोधी म्हणत 50 लाख मुस्लिमांनी यास विरोध केला तरच, हे विधेयक थांबवता येईल असे भडकाऊ विधान केले होते. तेव्हा चर्चेत आलेला झाकीर, पाकिस्तान दौर्‍यावर असताना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानात राजकीय पाहुणा म्हणून झाकीर आला असून, रेड कार्पेट घालत त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. असे असतानाही येथील सरकारी विमान कंपन्यांनी त्याच्या सामानाचे पैसे वसूल केल्यामुळे त्याचा तिळपापड झाल्याचे सुरुवातीला दिसले.

झाकीर नाईक पाकिस्तानातील निरनिराळ्या शहरात फिरत असून, लोकांना संबोधित करत आहे. या कार्यक्रमांमध्ये लोक झाकीरला प्रश्न विचारतात, ज्याला तो उत्तर देतो. झाकीर नाईकची अनेक उत्तरे ही चर्चेचा विषय ठरली आहेत. अलीकडेच त्याने एका पश्तून मुलीच्या लैंगिक शोषण आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित प्रश्नाला उत्तर दिले होते. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यात खैबर पख्तुनख्वामधील एक मुलगी झाकीरला पेडोफिलियाबद्दल प्रश्न करत आहे. मात्र, तरुणीला उत्तर देण्याऐवजी झाकीर नाईक तिच्यावरच चिडताना दिसत आहे. त्यात त्या मुलीने तिच्या परिसरातील इस्लामिक समाजाची सद्यस्थिती मांडली असून, याठिकाणी अंमली पदार्थांचे व्यसन, मुलांचे लैंगिक शोषण आणि व्यभिचार वाढल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी कोणताही उलेमा काहीही बोलत नाही? असा खडा सवाल जेव्हा त्याला पश्तून मुलीने विचारला, तेव्हा त्याची उत्तर देताना अक्षरशः फाफू झाली होती.

इतकेच नाही, तर हिंदू धर्मगुरू प्राध्यापक मनोज चौहान यांनी झाकीरला कट्टर इस्लामचा आरसा दाखवला आहे. पाकिस्तानी हिंदू विद्वानान झाकीर नाईकसमोर संस्कृत श्लोक वाचून आपल्या भाषणाची सुरुवात केली. यानंतर श्रीमद्भगवद्गीतेचा उल्लेख करत त्यांनी इस्लाम धर्मोपदेशकाला कट्टरतावादावर प्रश्न विचारला. ते म्हणाले ’जगभरात, भूमध्यसागरीय देशांमध्येही धर्माच्या नावाखाली लोकांची हत्या केली जात आहे. त्यामुळे धर्माची बदनामी होत आहे. पाकिस्तानसह जगात असे अनेक देश आहेत, जे धर्माच्या नावावर फुटीरता पसरवत आहेत, मग ते थांबवण्यासाठी आपण काय करावे?’ प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी झाकीर नाईक जेव्हा पुढे आला, तेव्हा त्याला प्रश्नावर समर्पक उत्तर देताच आले नाही.

झाकीर जरी आज पाकिस्तानात जाऊन येथील लोकांना संबोधत असला, तरी येथील नेटकरी सुद्धा त्याच्यावर संतापल्याचे दिसत आहे. ’सातत्याने आक्षेपार्ह विधान करणार्‍याला कोणी बोलवले? कृपया पुढच्या वेळी अशा लोकांना बोलवू नका.’ ’भारताने त्याला फरार घोषित का केले आणि त्याच्या प्रवेशावर बंदी का घातली असावी? असे प्रश्न आता पडणार नाहीत.’ किंवा ’त्याला व्हीआयपी वागणूक दिल्याबद्दल आणि त्याला असहिष्णुता आणि कट्टरता पसरवण्याची परवानगी दिल्याबद्दल, आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे.’, अशा स्वरूपातील मजकूर पोस्ट करत नेटकरी झाकीरच्या पाकिस्तान दौर्‍यावर द्वेष व्यक्त करत आहेत. झाकीर जरी पाकिस्तानातील लोकांची मने जिंकून घेण्यासाठी, इथल्या लोकांमध्ये इस्लामिक कट्टरता जागृत करण्यासाठी गेला असला, तरी त्याच्यासोबत घडलेल्या अशा घटनांमुळे त्याचा हा पाकिस्तान दौरा त्याच्या कायम आठवणीत राहिल हे मात्र निश्चित.


Powered By Sangraha 9.0