आज नवरात्रोत्सवाची सहावी माळ! आज आपण पाहणार आहोत, नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तश्रृंगीची कथा. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असे या देवस्थानाचे महत्त्व आहे. देवी भागवत आणि श्री सप्तशती या ग्रंथांमध्येही या देवस्थानाचा उल्लेख केला गेला आहे. नवरात्र म्हणजे महिषासुराबरोबर नऊ दिवस केलेल्या अहोरात्र युद्ध आणि आई जगदंबेचा पराक्रमाचा हा उत्सव होय!
तिन्ही लोकांवर अधिपत्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या करून स्त्रीशिवाय कोणाकडूनही मरण येणार नाही, असे वरदान महिषासुराने मिळवले. स्वतःच्या शक्तीवर गर्व असल्याने महिषासुर मदोन्मत्त झाला होता. असा हा मदोन्मत्त झालेला महिषासुर असुरी प्रवृत्तीला साजेसे वर्तन करु लागला. तिन्ही लोकांत त्याने छळ मांडला. त्याच्या या असीमित अत्याचाराने त्रस्त झालेले सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले. तेव्हा भगवान शंकर आणि भगवान विष्णू तिथेच होते. त्यावेळी तिन्ही लोकांची दयनीय अवस्था ऐकून भृकुटी चढलेल्या तिन्ही देवांच्या मनात एकाचवेळी या महिषासुराचा अंत करण्याचा विचार आला. एकाचवेळी आलेल्या या विचारातून निर्माण झालेल्या ऊर्जेने महामाया दुर्गेचे रूप घेतले.
महिषासुराबरोबर लढण्यास तयार झालेल्या जगदंबेला, शंकरांनी त्रिशूळ, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने दाहकत्व, वायुने धनुष्यबाण, इंद्राने वज्र व घंटा, यमाने दंड, वरुणाने पाश, दक्षप्रजापतीने स्फटिकक्षमाला, ब्रम्हदेवाने कमंडलू, सूर्याने तेजस्वी किरणे, कालस्वरूपी देवाने खड्ग व ढाल, क्षीरसागराने उज्ज्वल हार व वस्त्र, कुंडले, कंगण आदि आभुषणे दिली. विश्वकर्म्याने तीक्ष्ण परशु व चिलखत, समुद्राने कमळाचा हार, हिमालयाने सिंहवाहन, कुबेराने मधुपिरस देऊन देवीचा सन्मान केला. सिंहावर बसून महिषासुराशी युद्ध करण्यासाठी गेलेल्या जगदंबेने महाभयंकर रणभेदी गर्जना केली. त्यावेळीच्या आवाजाने सर्वांगाचा थरकाप उडालेल्या महिषासुराने आपल्या दूतांना या आवाजाचा शोध घेण्यास पाठवले. मात्र, प्रत्यक्षात बाहेर येऊन देवीस बघितल्यावर तिच्या अनुपमेय सौंदर्याने मोहित झालेल्या सैनिकांनी देवीच्या रुपाची स्तुतीचे पठणच महिषासुरासमोर केले. देवीच्या अमाप सौंदर्याची मोहिनी महिषासुरालादेखील पडली. त्याने देवीशी लग्न करण्याचा प्रस्ताव दूतांकरवी देवीकडे पाठवला. मात्र, देवीने तो धुडकावून लावला. त्यानंतर कृद्ध झालेल्या महिषासुराने देवीला प्राप्त करण्याच्या उद्देशाने तिच्यावर आक्रमण केले. यावेळी महिषासुराच्या सैन्यातील चिक्षूर, चामर, उदग्र, महाहनू, असिलोमा बाष्कळ, परिवारित, विडाल इत्यादी राक्षस सेनापती, हजारो हत्ती-घोडे आणि असंख्य राक्षस सैन्य देवीशी लढण्यात गुंतले. देवी अंबिका त्या दैत्यांशी लढता लढता जे सुस्कारे सोडत होती, त्यांमुळे अनेक गण निर्माण होऊन तेही देवीला युद्धात मदत करून राक्षससैन्याचा संहार करू लागले. त्यानंतर देवीने केलेल्या प्रचंड घंटानादामुळे अनेक राक्षस मूर्छना येऊनच पडले. त्रिशुळ, गदा, शक्ती, तलवार, मुसळ, बाण यांचा शत्रूसैन्यावर मारा केल्याने राक्षसांची अंगे छिन्नविच्छिन्न झाली. देवी एकीकडे पराक्रम गाजवत होती, तेव्हा देवीचे वाहन असलेला सिंह हा राक्षससैन्यात गर्जना करीत संचार करू लागला. या दोघांच्या पराक्रमानेच राक्षससैन्यात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या.
राक्षससैन्याचा प्रचंड संहार पाहून चिक्षूर हा दैत्य सेनापती जगदंबेशी युद्धासाठी सरसावला. परंतु, जगदंबेने स्वतःच्या शुलाने त्या चिक्षुराचे तुकडे केले. त्यानंतर देवीने उग्र, उग्रवीर्य, महाहून, उग्रमुर्ख, विडाल, दुर्धर, दुर्मुख या राक्षसांना ठार मारले. तेव्हा चिडलेल्या महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व तो देवीवर चालून आला. तेव्हा त्याने सिंह, खड्गधारी पुरुष व त्यानंतर हत्ती ही रूपे घेतली. शेवटी रेड्याचे रूप घेऊन धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. तो गर्जना करू लागला. त्यावेळी “मी मधुपिपान करेपर्यंत हवी तेवढी गर्जना करून घे, त्यानंतर तुझा वध निश्चित आहे,” असे देवीने महिषासुरास निक्षून सांगितले. त्यामुळे पुन्हा महिषासुर त्वेषाने लढू लागला. अखेर महामायेने त्याचे शीर धडावेगळे करून सर्वांना त्याच्या जाचातून सोडवले. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी जे स्थान निवडले, तोच हा सप्तश्रृंग गड!
या डोंगरावरच्या कपारीत आठ फुट उंचीची शेंदूर चर्चित रक्तवर्णीय अशा महामाया श्री सप्तशृंग आईची भव्य मूर्ती भक्तांना अभयदान देत आजही उभी आहे. श्री भगवतीला 18 हात असून तिला ‘अष्टादश देवी’ असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तिने तीन आयुधे धारण केलेली आहेत. अनेक संत मंडळींनीदेखील या ठिकाणी येऊन महिषासुरमर्दिनी त्रिपुरसुंदरी आई जगदंबेची करूणा भाकली आहे. त्यामुळे भक्ताच्या हाकेला धावणारी आणि स्वतःच्या मायासागरातून भक्तांची जीवननौका पार करण्यासाठी ज्ञान, वैराग्य आणि सिद्धी यांचे दान भक्ताला देण्यासाठी आतूर असणारी विश्वमोहिनी परमेश्वरी आपणा सर्वांनाही मार्गदर्शन करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना.
कौस्तुभ वीरकर