जलसंवर्धिनी शालूताई!

08 Oct 2024 11:10:25
 
Shalu Kolhe
 
नागपूर जिल्ह्यातील एका गावात एकुलती एक आणि अतिशय लाडात वाढलेली शालू कोल्हे. लग्नानंतर सामान्य ग्रामीण स्त्रियांसारखंच केवळ चूल आणि मूल एवढंच तिचं विश्व. एक दिवस FEED संस्थेच्या माध्यमातून तिच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. आपला पारंपारिक मासेमारी व्यवसाय करून कितीतरी महिलांना तिने रोजगार मिळवून दिला. आजही तिचं हे काम अविरतपणे सुरु आहे. शालू कोल्हे या जलकन्येच्या कामाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
नवेगाव या छोट्या गावात शालू कोल्हे यांचा जन्म झाला. लग्नानंतर सामान्य गृहिणींप्रमाणेच त्यासुद्धा आयुष्य जगत होत्या. गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोरगाव तालुक्यात असलेल्या निमगावमध्ये त्या राहतात. एकदा FEED (फाऊंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेट) या संस्थेशी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. या संस्थेच्या सहकार्याने २०१३-१४ मध्ये शालूताईंना कोरो इंडियाची फेलोशिप मिळाली आणि इथूनच त्यांच्या कामाला सुरुवात झाली. पारंपारिक मासेमारी व्यवसाय सोडून इतरांकडे राबणाऱ्या आपल्या समाजातील महिलांना कसं पुढे नेता येईल? यासाठीची त्यांची धडपड सुरु झाली. मासेमार समाजाचा जीवनस्तर उंचवण्यासाठी आणि आपल्या समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी गावातीलच महिलांची मोट बांधली. सुरुवातीला त्यांना समाजातून प्रचंड विरोध झाला. परंतू, त्यांचे पती जगदीश कोल्हे यांच्या खंबीर साथीमुळे त्या आपली पावलं पुढे टाकत गेल्या.
 
खरंतर बऱ्याच ठिकाणी मासेमारी करण्याचं काम हे पुरुषांचं असतं तर, स्त्रिया त्या माशांची बाजारात विक्री करतात. पण स्वत: तलावांवर जाऊन मासेमारी करणाऱ्या स्त्रिया तशा फारच कमी. शालूताईंनी आपल्या समाजातील काही जुन्या मंडळींकडून माहिती घेतल्यावर त्यांना कळलं की, आधी महिलादेखील पुरुषांसोबत पारंपारिक मासेमारी करायच्या. पण आता महिला मासेमारी करताना दिसत नाहीत. जर महिला सगळी कामं करू शकतात तर मासेमारीच का नाही? असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या गावात मासेमार समाजातील १६ महिलांचा एक गट तयार केला. या महिलांनी स्वत: मासे पकडणं, त्यांची विक्री करणं, जिऱ्याची बोटुकली तयार करणं सुरु केलं. जिऱ्याची बोटुकली म्हणजे जिऱ्याच्या आकाराचं माशाचं बीज. त्या बीजाचं संगोपन करुन ते हाताच्या बोटाच्या आकाराएवढं वाढवायचं आणि नंतर त्यांची विक्री करायची.
 
भंडारा, गोंदिया जिल्हे हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. परंतू, इथले तलाव संपत असल्याचं शालूतांईंच्या लक्षात आलं. त्यांनी यामागची कारणं शोधली. तलावांमध्ये गाळ साचल्याने तलाव संपत आहेत आणि पर्यायाने तलावातील मासेही संपत असल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी तलावांचं खोलीकरण करण्याचं त्यांनी ठरवलं. साधारणपणे जेसीबी किंवा अन्य तांत्रिक पद्धतीने तलावांचं खोलीकरण केलं जातं. परंतू, तलावाची जैवविविधता टिकून राहावी आणि आपल्या समाजाला रोजगार मिळावा, या उद्देशाने त्यांनी रोजगार हमीच्या माध्यमातून मानवीय पद्धतीने तलावांचं खोलीकरण केलं. आता शालूताईंसह इतर महिला दरवर्षी उन्हाळ्यात या तलावांचं खोलीकरण करून पहिला पाऊस पडल्यावर तिथली नांगरणी करतात. त्यानंतर पुन्हा एक पाऊस पडल्यावर तिथे माशांचं खाद्य असलेल्या पाणवनस्पतींची लागवड करतात.
 
हे काम सुरु असताना बंगाली मासे तलावासाठी घातक आहेत. हे मासे वर्षातून एकदाच उत्पन्न देतात आणि त्यांच्यात कोणतेही जीवनसत्व नाहीत. याव्यतिरिक्त मुलकी मासे हे वर्षातून अनेकदा उत्पन्न देतात, हे शालूताईंच्या लक्षात आलं. शालूताईंनी कामाची सुरुवात केल्यावर तलावांमध्ये मुलकी माशांच्या तुलनेत बंगाली माशांची संख्या खूप वाढली होती. परंतू, त्यांच्या प्रयत्नांमुळे आता बंगाली माशांचे प्रमाण कमी झाले आहे.
 
शालूताईंच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारी समाजातील महिला आता प्रामाणिकपणे आपला पारंपारिक व्यवसाय करत आहेत. तलावातून मासे पकडून आणल्यावर त्यापासून माशांचं लोणचं, चकल्या, पापड असे विविध पदार्थ बनवण्याचा उपक्रमही त्यांनी सुरु केला. तलावांमधील अतिक्रमण वाढल्याने तलाव संपत आहेत. त्यामुळे या तलावांचं मोजमाप करून हे अतिक्रमण हटवावं, ही त्यांची शासनाकडून अपेक्षा आहे. शिवाय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये महिलांना ५० टक्के भागिदारी मिळावी जेणेकरून त्यांना मदत होईल, ही सुद्धा त्यांची अपेक्षा आहे.
 
फीड संस्थेचे प्रमुख मनीष राजनकर यांना शालूताई आपल्या या कामाचं श्रेय देतात. शालूताईंच्या कामाची व्याप्ती आता बरीच वाढली असून सध्या प्रत्येकी १६ महिलांचे पाच महिला गट त्यांनी तयार केलेत. या सर्व महिला तलावांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन करून स्थानिक मासे, वनस्पती आणि पक्षांच्या अनेक जातींचं संवर्धन आणि संरक्षण करत आहेत. त्यांच्या या कष्टामुळे तलावांतील माशांच्या एकूण संख्येत आणि गुणवत्तेत अनेक पटींनी वाढ झाली. सध्या फीड, वॉटर अशा अनेक नामांकित संस्थांसोबत त्यांचं काम सुरु असून शालू कोल्हे या अनेक संस्थामध्ये मार्गदर्शक म्हणूनही जातात. तलावांमध्ये जैवविविधता असेल तर उत्पन्न वाढतं. त्यामुळे प्रत्येक तलाव जिवंत व्हावेत आणि मासेमार समाजाला रोजगार मिळावा हीच त्यांची ईच्छा आहे. या जलकन्येला दै. मुंबई तरुण भारततर्फे खूप खूप शुभेच्छा.
 
 
 
Powered By Sangraha 9.0