मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केलेल्या कॉप युनिवर्समध्ये पहिली लेडी सिंघम अर्थात दीपिका पडूकोण हिची या एन्ट्री झाली आहे. दरम्यान, सिंघम अगेनच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमावेळी रणवीर सिंग असं म्हणाला की, हा चित्रपट माझ्या मुलीचा पहिला चित्रपट आहे, कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती.
रणवीर सिंग म्हणाला की, "दीपिका बाळासोबत असल्यामुळे आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. माझी ड्युटी रात्रीची आहे. चित्रपटात अनेक स्टार्स आहेत आणि मी सांगू इच्छितो की, माझ्या मुलीने म्हणजेच बेबी सिंबाने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. कारण सिंघम अगेनच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती.
रणवीर पुढे म्हणाला, "लेडी सिंघम (दीपिका), सिम्बा आणि बेबी सिम्बाकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ट्रेलरचा आनंद घ्या आणि तुमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करा. आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे."
सिंघम अगेनमध्ये दीपिका या चित्रपटात शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी 'कॉप युनिव्हर्स'ची पहिली महिला आहे. या ॲक्शनपटात रणवीर पुन्हा सिंबाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्याही महत्वपुर्ण भूमिका आहेत.