सूरज चव्हाण हक्काच्या घराला नाव देणार 'बिग बॉस'

07 Oct 2024 10:19:37

suraj chavan  
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपला. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या शोचा महाअंतिम सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांनी अखेरपर्यंत बिग बॉसच्या घरात आपलं स्थान टिकवून ठेवलं. आणि शेवटी या शर्यतीत सूरज चव्हाण विजय ठरला. सूरज चव्हाणने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचं मन जिंकत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सूरज घरात नेहमी ‘आपला पॅटर्न वेगळाय, ही ट्रॉफी मी जिंकणार, मला माझ्या चाहत्यांवर पूर्ण विश्वास आहे’ असं म्हणायचा. अखेर त्याचे हे शब्द खरे ठरले आहेत.
 
दरम्यान, बिग बॉसची ट्रॉफी हातात घेतल्यावर सूरज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार…ते आज खरं झालं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!”
 
“जिंकलेल्या धनराशीचं काय करणार?” या प्रश्नावर सूरज चव्हाण म्हणाला, “मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. त्या घराला म्हणजेच घर बांधून झाल्यावर मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे.”
Powered By Sangraha 9.0