दिव्यांगांची बहुमोल ‘संपदा’

06 Oct 2024 22:12:19
sampada palneetkar
 
दिव्यांग बालकांचे जीवन प्रकाशमान करणार्‍या स्नेहांकित ठाणे केंद्राच्या प्रमुख संपदा पळणीटकर यांच्या करण्याचा आढावा घेणारा लेख...

“आपण मूल्यशिक्षण विषय शाळेत शिकतो. मात्र, आपण प्रत्यक्ष जीवनात मूल्यशिक्षणाचा अवलंब करण्यास विसरत चाललो आहोत,” अशी खंत स्नेहांकित ठाणे केंद्राच्या प्रमुख संपदा पळणीटकर यांनी व्यक्त केली. संपदा ताई गेली 26-27 वर्षे दिव्यांग बालकांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी काम करत आहेत.

बालपणापासून शिक्षिकाच व्हायचे हे ध्येय बाळगून, सौ. संपदा संदिप पळणीटकर यांनी आपली वाटचाल सुरु केली. पेंढारकर महाविद्यालयात मानसशास्त्र विषयात पदवी घेत असताना, या अभ्यासक्रमात ‘अतिविशेष व्यक्तींचे मानसशास्त्र’ हा विषय होता. दरम्यान विविध क्षेत्र भेटीदरम्यान ताईंना दिव्यांग आणि अतिविशेष मुलांसमोरील आव्हाने कळली. हे पाहता या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संपदा ताईंनी गतिमंद आणि अतिविशेष बालकांचे प्राध्यापक होण्यासाठी, लागणारे डीएड आणि बीएड शिक्षणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अगदी मोजक्या संस्थांमध्ये हा अभ्याक्रम शिकवला जात होता. अशातच घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, महाग शुल्क भरून हा कोर्स करणे ताईंना शक्य नव्हते. हे ओळखून संपदा ताईंनी अर्थार्जन सुरु केले. शिक्षिका होण्याचे आपले स्वप्न आता काही पूर्ण होणार नाही, असेच त्यांना वाटू लागले.

मात्र, ’इच्छा तिथे मार्ग’ असे का म्हणतात याची प्रचिती त्यांना आली. 1999 साली संपदा ताईंना मुंबईतील वरळी येथील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया’ म्हणजेच ’नॅब’ या संस्थेविषयी माहिती मिळाली. संपदा ताईंनी या संस्थेला भेट देत येथील मुलांना शिकविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यासाठीची शैक्षणिक अर्हता पूर्ण नसल्याने संस्थेने पुढील वर्षी आर्हता पूर्ण करून येण्यस सांगितले. योगायोगाने त्यावर्षी संस्थेच्या माध्यमातून कोर्स पूर्ण करणार्‍या एकही महिलेने फिरते शिक्षक म्हणून काम स्वीकारले नाही. संस्थेने पुन्हा संपदा ताईंशी संपर्क साधत, रुजू होण्याचे आवाहन केले. 16 ऑगस्ट 1999 हा ताईंचा या क्षेत्रातील कामाचा पहिला दिवस. वर्ष 1999 ते वर्ष 2017 पर्यंत नॅबमध्येच ताईंनी, शिक्षक आणि असिस्टंट मॅनेजर म्हणून तब्बल 22 वर्षे नोकरी केली. यावेळी ताई मुलांच्या घरी आणि शाळेत जात शिक्षण देत. 9 ते 10 मुले सुरुवातीला ताईंकडे देण्यात आली, ज्यांना ब्रेल लिपी येत होती. या मुलांकडूनच संपदा ताईंनी सर्व कौशल्ये आत्मसात केली. ताईंच्या बाबतीत पालकांकडूनही खूप चांगल्या प्रतिक्रिया होत्या. हे पाहता ताईंनी नॅबचा एक महिन्याचा कोर्स पूर्ण करून, पूर्णवेळ शिक्षिका म्हणून जबाबदारी घेतली.

2017ला ताईंनी नॅबची नोकरी सोडली. मात्र, एकाच महिन्यात असंख्य पालकांचे फोन येऊ लागले. संपदा ताईंकडूनच सेवा हवी असा आग्रह या पालकांचा होता. हे पाहता अंधेरीतील ‘स्नेहांकित’ या संस्थेसोबत ताईंनी आपले काम पुन्हा नव्याने सुरु केले. मंदाताई चौधरी या मैत्रिणीचे घर आणि ‘स्नेहांकित’ ही संस्था हा योग जुळून आल्याने, ताईंनी फिरते शिक्षक हे काम बंद करून डोंबिवली आणि ठाणे येथे केंद्र सुरु केले. या केंद्रात मुले शिक्षण घेण्यासाठी येऊ लागली. तेव्हापासून आजतागायत संपदा ताई ’केंद्र प्रमुख’ म्हणून कार्यरत आहेत. या केंद्रात पाच ते सहा महिन्याच्या बालकापासून ते कॉलेज पर्यंतचे विद्यार्थी येतात.

सीमा ताई म्हणतात, “आज अंध विद्यार्थ्यांसाठी मराठी शाळा आहेत. त्या शाळा निवासी ही आहेत. पालकांना आपल्या मुलांनी सोबत असावे असे वाटते. तर अनेक मुलांना इंग्लिश भाषेतून किंवा सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेण्याची इच्छा असते.” अशा मुलांना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी संपदाताई आणि त्यांचा संघ काम करतो. या संस्थेचा मुख्य हेतू अंध विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, शालेय अडचणी सोडवणे, पालकांचे प्रशिक्षण व समुपदेशन करणे, स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे आणि मदत मिळवणे आहे.

आज या संस्थेत शिक्षण घेतलेले तरुण तलाठी, उच्च पदस्थ अधिकारी, सीए यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आर्यन जोशी हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चेस चॅम्पियन आहे. केंद्र सरकरमध्ये त्याची आता ’वर्ग -अ’दर्जाच्या अधिकारी पदावर नियुक्ती होईल. सिद्धी जोशी या तरुणीने दहावीला 94 टक्के गुण मिळविले. नुपूर जोशी ही विद्यार्थिनी नोकरी करते. राजेंद्र पवार, विजय शुक्ल हे संपदा ताईंचे सहकारी म्हणून काम पाहत आहेत. संपदा ताई म्हणतात, “माझे जेव्हा यश मिळवतात तेव्हा खूप अभिमान वाटतो. त्याचा सगळा भूतकाळ डोळ्यांसमोर तरळतो. या मुलांचे बालपण खूप आव्हानांनी भरलेले होते. जेव्हा ते मुल एकेक स्किल शिकतो तेव्हा तो यशस्वी होतो.”

संपदा ताई समाजाला आवाहन करताना म्हणतात, “एकच मागणी आहे की, या मुलांना स्वीकारा. दिव्यांग मुले ही आपलाच एक भाग आहे. बर्‍याचदा या मुलांना नोकर्‍या मिळतात. मात्र, त्यांना सहकार्यच केले जात नाही. या मुलांना थोडा वेळ द्यावा लागतो, मात्र ते शिकतात. आपण त्यांना संधी देत नाही आणि दिलेल्या संधीत त्यांना सामावून घेत नाही,” अशी खंत ताई व्यक्त करतात.

आज संपदा ताईंनी 27 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक दिव्यांग बालकांचे आयुष्य त्यांना शिक्षित करून उजळवले. संपदा ताईंना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कारासोबतच अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशा दिव्यांग बालकांसाठी पणती होते त्यांचा मार्ग उजळविणार्‍या संपदाताई पळणीटकर यांना पुढील कार्यासाठी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!
 
Powered By Sangraha 9.0