सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा लावणार ‘गाढवाचं लग्न’

05 Oct 2024 15:33:35
 
savita malpekar
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अभिनयाने गाजलं होतं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांनी या नाटकात साकारलेली सावळा कुंभार आणि गंगी ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकताच स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित-अभिनित ‘फुलवंती’ या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना सविता मालपेकर यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आवडीचं नाटक गाढवाचं लग्न याचे प्रयोग करणार असल्याचं सांगितलं.
 
सविता मालपेकर म्हणाल्या की, “आजही प्रेक्षकांना गाढवाचं लग्न हे नाटक इतकं आवडतं की पुन्हा करा अशी मागणी ते वारंवार करत असतात. मध्यंतरीच्या काळात आम्ही पुन्हा त्या नाटकाचे प्रयोग करणार होतो पण मोहन जोशी आजारी पडल्यामुळे ते शक्य झालं नव्हतं. मात्र, आता मोहन यांनी मला सांगितलं आहे की आपण गाढवाचं लग्न हे नाटक परत करुयात; भले १० प्रयोग करु पण करणारच”, त्यामुळे पुन्हा एकदा सावळा कुंभार आणि गंगी प्रेक्षकांना तुफान हसवायला येणार यात आणि पुन्हा एकदा नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागणार यात शंकाच नाही.
 
तालीम न करताच ‘गाढवाचं लग्न’चा पहिला प्रयोग सादर केला होता...
 
दरम्यान, यावेळी गाढवाचं लग्न या नाटकाचा आणखी एक किस्सा सांगताना सविता म्हणाल्या की,”मुळात ‘गाढवाचं लग्न’ हे एक स्किट सादर करायचं होतं आणि त्यासाठी मोहन यांनी मला आपण हे स्किट करत आहोत इतकंच सांगितलं. बरं, मी कोकणातील असल्यामुळे मला भाषा, बाज काहीच माहित नव्हतं. त्यामुळे तालीम कधी करायची असं मी मोहन यांना विचारलं पण करु ग आपण इतकंच त्यांनी उत्तर दिलं. त्यावेळी मोहन फार व्यस्त होते त्यामुळे ते मला त्यांच्या शुटींगच्या ठिकाणी बोलवायचे एक कॅसेट माझ्या हातात द्यायचे आणि गाडीत बसून ऐक असं सांगायचे. मी ते ऐकायचे पण समोरासमोर तालीम आम्ही अगदी कार्यक्रम उद्यावर येऊन ठेपला तरीही केली नव्हती आणि त्यामुळे माझा पारा चढत होता. शेवटी स्किट सादर करायचा दिवस उजाडला तरीही आम्ही एकत्र तालीम केली नव्हती. त्यादिवशी मी, मोहन आणि त्यांच्या पत्नी गाडीतून एकत्र कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो आणि तेव्हा गाडीत आम्ही संवाद म्हटले.त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर मागच्या मैदानात केवळ एकदाच पात्रांची एकत्र तालीम केली आणि ते स्किट सादर केलं. त्यामुळे गाढवाचं लग्न या नाटकापुर्वी जे २० मिनिटांचं आम्ही स्किट सादर केलं होतं ते तालमीशिवाय होतं पण ते नाटक नशीब घेऊन आलं होतं म्हणून आज ते अजरामर झालं”.
Powered By Sangraha 9.0