पिंपरी : (Constituent Building)जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती व्हावी, याकरिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुमारे १२० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली असून, निविदा प्रसिद्ध केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून संबंधित जागा महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
दरम्यान, महानगरपालिका अंदाजपत्रक समितीच्या माध्यमातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्याची ई-निविदा दोन कोटी ५३ लाख २५ हजार ४०७ आणि दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ११७ कोटी अशी एकूण ११९ कोटी ७१ लाख ३५ हजार ३२६ रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे
.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, "२०१९ मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर ‘पीसीएनटीडीए’चे विलिनीकरण पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणामध्ये करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदर प्रकल्प लांबणीवर पडला. महायुतीची सत्ता आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा या कामाला गती देण्यात आली. प्रस्तावित जागा ‘पीएमआरडीए’कडून महानरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. आता संविधान भवन उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे."
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत होवून शहरात संविधान तथा राज्य घटनेचा प्रचार, प्रसार व्हावा. यासह जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा, असा संकल्प आहे. संविधान जागृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली होती. संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये साकारले जात आहे, ही आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.