मुंबई : २००७ साली आलेल्या 'भूल भूलैय्या' या चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. पहिल्या भागाला आलेल्या यशानंतर 'भूल भूलैय्या २' आला ज्यात कार्तिक आर्यनने एन्ट्री घेतली. आता १ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळीच्या निमित्ताने 'भूल भूलैय्या ३' प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या भागात पुन्हा एकदा ओरीजनल मंजुलिका अर्थात अभिनेत्री विद्या बालन दिसणार असून तिचा सामना माधुरी दीक्षितशी होणार आहे. याशिवाय चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला 'अॅनिमल' चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर एकामागून एक मोठे चित्रपट तिच्या वाटेला आले. भूल भूलैय्या ३ मध्येही ती दिसणार आहे. मात्र, या चित्रपटात तीची निवड पहिली करण्यात आली नव्हती.
'भूल भुलैया ३' चित्रपटाचे दिग्दर्शक अनीज बज्मी यांनी न्यूज १८ शोमध्ये संवाद साधताना सांगितले की, या चित्रपटासाठी तृप्ती कधीच पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शकाच्या मनात तृप्तीला या चित्रपटात कास्ट करण्याचा कोणताही विचार नव्हता, पण गेल्या वर्षी तिला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर अनीस बज्मी यांनी तिला 'भूल भुलैया ३'मध्ये कास्ट करण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं..
'ॲनिमल'मधील अभिनेत्रीच्या अभिनयाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, “तृप्ती डिमरीला रातोरात स्टारडम मिळाले असे मला वाटत नाही. आज तिला जी प्रसिद्धी मिळत आहे ती तिच्या इतक्या वर्षांची मेहनत आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीत आहे आणि तिला एका दिवसात यश मिळालेले नाही. दिग्दर्शक नव्या चेहऱ्याच्या शोधात होते 'भूल भुलैया ३' मध्ये तृप्ती डिमरीला कास्ट करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला या चित्रपटासाठी नवीन चेहरा हवा होता. मी अशा अभिनेत्रीच्या शोधात होतो जिने कार्तिक आर्यनसोबत कधीही काम केले नाही.”.
दरम्यान, भूल भूलैय्या ३ या चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन, तृप्ती डिमरी, राजपाल यादव आणि बरेच कलाकार दिसणार आहेत. १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची टक्कर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटासोबत होणार आहे.