Mahayuti CM formula महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचा चेहरा आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत जो काही निर्णय होईल, तो निकालानंतर होईल. ‘रोटेशनल’ मुख्यमंत्री, अशी कोणतीही अट एकनाथ शिंदे यांनी ठेवलेली नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘ नी एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या, तर उद्धव ठाकरे की, शरद पवारांसाठी दरवाजे उघडणार, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “कुणाचीच गरज लागणार नाही, आम्ही तिघेच पुरेसे आहोत, तशी परिस्थिती येणारच नाही.” 23 नोव्हेंबर रोजी वाट बघा, असेही त्यांनी सूचित केले. लोकसभेत महाविकास आघाडीने नव्हे, तर फेक नॅरेटीव्हने आम्हाला हरवले. तीन पक्ष आम्हाला हरवूच शकले नसते. फेक नॅरेटीव्ह कंट्रोल करण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून आम्हाला चांगला अनुभव मिळाला आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, असे विधान ‘उबाठा’ गटाचे आ. आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्याविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी कधीच हरवले आहे. आदित्य यांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. कारण, त्यांना शिकवण्यासाठी अबू आझमी आहेत. बाळासाहेबांना जनाब म्हटले जाते. जे हिंदुत्व बाळासाहेबांचे होते, शिवसेनेचे होते ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी संपवले,” असा टोला फडणवीसांनी लगावला. तसेच “ना मला ठाकरे संपवू शकत, ना मी त्यांना संपवू शकत, कोणाला संपवायचे, हे जनताच ठरवते,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मनसुख हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहित होते?
100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जर तुम्ही न्यायालायाचा निर्णय वाचला, तर त्यात सगळेच स्पष्ट होईल, अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे आयुक्त होते. त्याची दखल मुख्य न्यायाधीशांनी घेतली. त्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सांगितले, की पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. हे सगळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घडले. आता माझा अनिल देशमुखांना एकच प्रश्न आहे, मनसुख हिरेनची हत्या होणार, हे त्यांना माहिती होते की नव्हते? मी सदनात याची माहिती दिली होती. मनसुख हिरेनला गायब करण्यात आले असून त्याची हत्या होऊ शकते, असा संशय मी व्यक्त केला होता. त्यानंतर त्याची हत्या झाल्याचे समजले,” याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.
नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही.
अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, हे आम्ही अजित पवारांना सांगितले होते. मात्र अजित पवारांनी त्यांना ‘एबी फॉर्म’ दिला. अजित पवारांनी असे का केले, हे तेच सांगू शकतात, त्यांना विचारा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.