बांगलादेश हिंसाचार प्रकरणी संयुक्त राष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल

31 Oct 2024 16:41:46

UN on Bangladesh Violence

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (UN on Bangladesh Violence)
बांगलादेशात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यावेळी झालेल्या आंदोलनात बांगलादेशी हिंदूंसह सुमारे ६०० लोक मारले गेले. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा भारत सुरुवातीपासून उपस्थित करत आला असला तरी आता संयुक्त राष्ट्रानेही हिंसाचारात मारल्या गेलेल्या अल्पसंख्याकांची चौकशी आणि संरक्षण करण्याची विनंती केली आहे.

हे वाचलंत का? : इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

बांगलादेशात हिंसक संघर्षांदरम्यान झालेल्या सर्व हत्या आणि इतर हक्कांच्या उल्लंघनांची सखोल चौकशी करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी केले आहे. बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान याबाबत चौकशीची मागणी करत ते म्हणाले की, सर्वसमावेशक दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी तपास महत्त्वाचा आहे, जिथे वर्ग, लिंग, जात, राजकीय विचारसरणी, ओळख किंवा धर्म यांचा विचार न करता प्रत्येक आवाज ऐकला जातो.

युनूस सरकारने हिंसाचारात झालेल्या हत्येची चौकशी करण्याची औपचारिक विनंती करण्यापूर्वीच संयुक्त राष्ट्राने एक तथ्य शोध पथक बांगलादेशला पाठवले आहे. यामध्ये शेख हसीना सरकारच्या विरोधात निदर्शकांच्या हत्या तसेच तिच्या पतनानंतर झालेल्या हिंसाचाराचा तपास समाविष्ट आहे. बांगलादेशात हजारो हिंदू त्यांच्यावरील हिंसाचार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आंदोलन करत आहेत. देशातील अल्पसंख्याक गटांवरील हल्ल्यांच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची गरज तुर्की यांनी व्यक्त केली.


Powered By Sangraha 9.0