समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमुळे जीडीपीत वाढ

30 Oct 2024 12:24:16

dfc
मुंबई,दि.३० : ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात, भारतातील समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर देशाच्या जीडीपीमध्ये १६,००० कोटी रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे मालवाहतूक खर्च आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे वस्तूंच्या किंमती ०.५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
याशिवाय हा अहवाल हे दर्शवितो की, २०१८-१९आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये भारतीय रेल्वेने मिळवलेल्या महसूल वाढीमध्ये मर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचे योगदान २.९४ टक्के इतके आहे. भारताच्या १० टक्क्यांहून अधिक रेल्वे मालवाहतूक आता या समर्पित मार्गांद्वारे व्यवस्थापित केली जाते. हे नेटवर्क २,८४३ किलोमीटर आणि सात राज्यांमधील ५६ जिल्ह्यांतून जाणारे आहे. ऑक्टोबर २०२४ पर्यंत ९६.४ टक्के इतकी या मार्गाची प्रगती आहे.
लुधियाना ते सोनानगर १,३३७ किलोमीटरचा विस्तारित ईस्टर्न डीएफसी (ईडीएफसी) पूर्णतः कार्यरत आहे, तर दादरी ते मुंबई १,५०६ किलोमीटरचा डब्ल्यूडीएफसी ९३.२ टक्के पूर्ण झाला आहे. हा कॉरिडॉर कोळशाच्या खाणी, थर्मल पॉवर प्लांट, सिमेंट कारखाने आणि मुंद्रा, कांडला, पिपावाव आणि हजीरा सारख्या मोठ्या बंदरांसह प्रमुख औद्योगिक केंद्रांना जोडतात. या समर्पित ट्रॅकचा वापर करणाऱ्या गाड्यांनी ५० ते ६० किमी प्रतितास या प्रभावशाली सरासरी वेगाचे प्रदर्शन केले आहे, ज्यामध्ये हा वेग पुढे ताशी १०० किमीपर्यंत आहे. सामान्यतः २० ते २५ किमी प्रति तास या पारंपारिक ट्रॅकवरील मालगाड्यांच्या सरासरी वेगाच्या तुलनेत हे लक्षणीय सुधारणा दर्शवते. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे की, सध्या, डीएफसी वर दररोज सरासरी ३२५ ट्रेन चालवल्या जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ ही भारताच्या लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी पायाभूत सुविधांमध्ये कॉरिडॉरचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारी आहे.
Powered By Sangraha 9.0