‘गांधी’ मधील कस्तुरबांच्या भूमिकेसाठी स्मिता पाटीलही आल्या होत्या, पण..”, रोहिणी हट्टंगडींनी सांगितला 'तो' किस्सा

30 Oct 2024 17:22:06
 
Rohini hattangadi
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : 'दै. मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याशी सुसंवाद साधताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. गांधी या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेमुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली. पण या भूमिकेसाठी मुंबईहून रोहिणी हट्टंगडी तर स्क्रिन टेस्टसाठी गेल्या होत्याच पण त्यांच्याशिवाय अभिनेत्री स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे देखील त्याच भूमिकेसाठी इंग्लंडला पोहोचल्या होत्या. तो किस्सा काय होता हे रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितला.
 
रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या की, “माझं ‘रथचक्र’ या मराठी नाटकाचे प्रयोग सुरु होते. त्यावेळी मी वडाळ्याला राहायला होते. तर त्या रथचक्र नाटकाच्या दौऱ्यावरुन मी घरी आले आणि माझ्या सासूबाईंनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी माझे पती जयदेव यांनी माझ्यासाठी लिहून ठेवली होती. त्यात असं लिहिलं होतं की संध्याकाळी काही काम घेऊ नकोस आपल्याला सर रिचन अटनबर्ग यांना भेटायला जायचं आहे. त्यानुसार मी संध्याकाळी रिचन अटनबर्ग यांना भेटायला जायची तयारी करत असताना जयदेव यांनी मला कॉटनची साडी नेसायला सांगितली. सांगितल्याप्रमाणे मी तयार झाले आणि आम्ही ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी रिचन अटनबर्ग यांना जाऊन भेटलो. आमच्यासोबत एन.एस.डी मधील माझे मित्र देखील होते. तर आमच्या रिचन अटनबर्ग यांच्यासोबत एन.एस.डीच्या गप्पा रंगल्या आणि मग त्यातच अटनबर्ग यांनी मला विचारलं की आत्तापर्यंत काय कामं केली आहेत. मी सांगितलं विविध नाटकांमध्ये कामं केली आहेत आणि एक, दोन चित्रपटांमध्ये मी कामं केली होती तर असा माझ्या आत्तापर्यंत कामांचा आढावा मी त्यांना सांगितला. अटनबर्ग यांच्यासोबतची ती छान भेट झाली आणि त्यानंतर पुन्हा मी नाटकांकडे वळले. त्यावेळी माझं होरी हे हिंदी नाटक सुरु होतं. लगेचच दुसऱ्यादिवशी आमच्याघरी फोन नसल्यामुळे टेलिग्राम आला आणि तातडीने डॉली या व्यक्तीला फोन करायचा होता. धावत मी आणि जयदेव वाण्याच्या दुकानात गेलो आणि डॉलीला फोन केला. त्यावर ती म्हणाली की रोहिणी तुला रिचन अटनबर्ग यांनी इंग्लंडला बोलावलं आहे स्क्रिन टेस्टसाठी. ते ऐकून मला काही कळतंच नव्हतं. कारण, एकतर कोणत्या भूमिकेसाठी थेट इंग्लंडला बोलावणं आलं आहे ते माहित नव्हतं"
 
"माझ्याकडे पासपोर्ट देखील नव्हता त्यामुळे इंग्लडला जायचं कसं हा देखील मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा होता. जयदेव यांनी पासपोर्टची सत्य परिस्थीती डॉलीला सांगितली आणि आठ दिवसांत कसा पासपोर्ट मिळेल आम्हाला माहित नाही ही अडचण देखील पुढे केली. ते ऐकून डॉलीने दुसऱ्यादिवशी आम्हाला तिच्या घरी बोलावलं. आणि मला थेट पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन गेली ती थेट पासपोर्ट ऑफिसमधील डायरेक्टरच्या कॅबिनमध्येच. आणि तिने त्यांना सांगितलं ही दोन दिवसांत हिला पासपोर्ट बनवून द्या तिला अत्यंत महत्वाच्या कामासाठी इंग्लंडला जायचं आहे. त्यानुसार त्यांनी मला मदत करण्यास सुरुवात केली. एकीकडे पासपोर्टची तयारी सुरु होतीच तर दुसरीकडे मला माझी बॅग भरायची होती. त्यात मला विशेष करुन खादीची साडी आणायला सांगितली होती. आता जायला केवळ ३-४ दिवस उरले होते त्यात तशी साडी कुठे शोधायची आणि ब्लाऊज कसा शिवून घ्यायचा हे आणखी एक संकट समोर होतं. यावेळी माझ्या मदतीला धावून आलं एनएसडी आणि माझे वडिल. कारण, प्रवासाचा आणि राहण्याचा सर्व खर्च ते करणार होतेच पण माझ्या खिशात काहीतरी पैसे हवे होते. मग मी वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की काही कामासाठी मला इंग्लंडला जायचं आहे तर कमीत कमी १०० डॉलर्ससाठी जितके पैसे लागतील ते उसने द्या. मग माझे वडिल पुण्याहून मुंबईला मला पैसे द्यायला आले आणि पैशांची एक मोठी अडचण मार्गी लागली”.
 
 पुढे त्यांनी सांगितलं की,”आता त्यानंतर प्रश्न होता साडी-ब्लाऊजचा. शांतपणे विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की ‘रथचक्र’ या नाटकात मी थोरली ही भूमिका साकारत होती तर त्या पात्राचा पांढरा ब्लाऊज घेतला, त्याच नाटकात मी कृष्णाबाईची देखील दुहेरी भूमिका करत होते तर त्या पात्राचा बांगड्या आणि मंगळसुत्र घेतलं. आणि त्यानंतर साडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी वडिलांसोबत खादी भांडारमध्ये गेले आणि तिथे साडीचा शोध सुरु झाला. आणि अखेर तिथे त्यांना अपेक्षित होती तशी ८० रुपयांची साडी अखेर मिळाली आणि शेवटी सगळी जमवाजमवं करुन इंग्लडला मी पोहोचले. बरं विमानतळावर जाण्याआधी मी ‘रथचक्र’ आणि ‘उध्वस्त धर्मशाळा’ या माझ्या नाटकांचा प्रयोग केला आणि त्यानंतर अखेर इंग्लडचं विमान पकडलं. इंग्लंडला पोहोचल्यावर मग तयारी सुरु झाली कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेची. पण इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे तिथे परदेशात प्रत्येक कलाकाराबद्दल माहिती देणारी डिक्शनरी आहे. ज्यात कलाकाराचं नाव, आत्तापर्यंत केलेली कामं अशी सगळी सविस्तर माहिती फोटोसहित लिहिलेली असते. तर ती डिक्शनरी रिचर्ड चाळत होते आणि मला पाहून त्यांनी ते माझ्या हातात दिलं आणि बेन किंग्सलीचा फोटो दाखवत म्हणाले की तु आज याच्यासोबत स्क्रिन टेस्ट करणार आहेस. मग माझी धाकधूक सुरु झाली; कारण, नवा देश, नवी माणसं आणि या सगळ्यात मी एकटी होते. पण ज्यावेळी स्क्रिन टेस्टला जाण्यापुर्वी तयार होण्यासाठी माझ्या खोलीच्या बाहेर रोहिणी हट्टंगडी ही नावाची पाटी पाहिली त्यावेळी एक वेगळाच हुरुप आला आणि हायसं वाटलं. बरं, भूमिका माहित नव्हती पण गुजरातीपद्धतीची साडी नेसण्यास सांगितली होती आणि ती मला माझ्या गुजराती नाटकांमध्ये काम केलेल्या अनुभवावरुन येत होती. तयार झाले आणि खाली आले तर समोर रिचर्ड होते. ते मला पाहताक्षणी म्हणाले की “यु आर लुकींग लाईक कस्तुरबा”. मला त्यावेळीही समजलं नाही की मी कोणती भूमिका नेमकी साकारणार आहे. त्यावेळी मात्र मी सगले डोक्यातील विचार बाजूला सारले आणि माझी स्क्रिनटेस्ट दिली. माझं सगळं हे आटोपल्यावर त्या सर्व अनोळखी चेहऱ्यांमध्ये मला अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि भक्ती बर्वे दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. आणि आम्ही गळाभेट घेतली. त्याचवेळी बेन महात्मा गांधीच्या वेषातून तिथून गेला आणि नसीर म्हणाले की अरे हुबेहुब ‘गांधी’ दिसत आहे. तोपर्यंतही मला अंदाज बांधला येत नव्हता की मी काय करतेय मग नेमकी? पण पुन्हा विचार सोडून दिला आणि आमच्या गप्पा रंगल्या. तर ज्या भूमिकेसाठी मला बोलावलं होतं त्यासाठी भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील यांनाही बोलावलं होतं. आणि गांधींच्या भूमिकेसाठी नसीरुद्दीन शाह यांना बोलावलं होतं. माझ्या स्क्रिनटेस्टनंतर त्यांचा नंबर होता”.
 
“माझी स्क्रिन टेस्ट झाल्यानंतर रिचर्ड म्हणत होते की खुप सुंदर काम केलं आहेस. आणि शेवटी न राहावून मी रिचर्ड यांना विचारलं की मी माझी स्क्रिनटेस्ट बघू शकते का? आणि त्यांचा होकार मिळल्यावर मी स्वत:ला त्या भूमिकेत पाहिलं आणि नाटकाची सवय असल्यामुळे काही जागी थोडा अधिक अभिनय झाला आहे असं जाणवलं पण तरीही रिचर्ड यांनी माझ्या कामाचं केलेलं कौतुक माझ्या लक्षात राहिलं. स्क्रिनटेस्ट झाल्यावर मी भारतात परत आले आणि त्यानंतर जवळपास महिनाभर मला काही उत्तरच आलं नाही. शेवटी न राहावून डॉलीला विचारलं आणि तिच्याकडून रिचर्ड यांनी उत्तर पाठवलं की तुम्ही गांधी या चित्रपटात कस्तुरबा ही भूमिका साकारत आहात, आम्ही लवकरच अधिकृतरित्या ते जाहिर करु. आणि ते ऐकताच अखेर माझी इंग्लडवारी सफल झाली आणि माझा पहिला इंग्रजी चित्रपट ‘गांधी’ मला मिळाला आणि त्यातील कस्तुरबा ही भूमिका घडली”, असा ‘गांधी’ चित्रपटाबद्दलचा अनुभव त्यांनी सांगितला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0