डिजिटल क्रांतीचा विस्तार

30 Oct 2024 21:55:56
editorial on digital revolutionary expansion


देशातील हायस्पीड इंटरनेट आणि डेटा चलित सेवांच्या वाढत्या मागणीमुळे, ब्रॉॅडबॅण्ड बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे. येत्या काही वर्षांत तिची वाढ नऊ ते दहा टक्के चक्रवाढ दराने होईल, असा अंदाज आहे. बीएसएनएलने ही संधी साधत विस्ताराच्या नवनव्या संधी साधत आहे. या क्षेत्राचा होणारा विस्तार बीएसएनएलला बळ देणारा ठरत आहे.

हायस्पीड इंटरनेट आणि डेटा चलित सेवांच्या वाढत्या मागणीमुळे देशातील ब्रॉडबॅण्ड बाजारपेठेत, येत्या काही वर्षांत नऊ ते दहा टक्के चक्रवाढ दराने वाढ होईल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील ब्रॉडबॅण्ड वापरकर्ते केवळ 13 टक्के इतकेच आहेत. ब्रॉडबॅण्ड सेवांच्या विस्तारामुळे, कनेक्टिव्हिटी वाढत आहेच. त्याशिवाय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रोजगारही वाढत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. ब्रॉडबॅण्ड सेवेचा विस्तार होत असतानाच, या क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची गरज वाढत आहे. ब्रॉडबॅण्ड सेवेचा विस्तार देशातील सर्वच भागात होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ब्रॉडबॅण्ड सेवेचा विस्तार हा केवळ इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी नाही; ही सेवा आपल्या काम करण्याच्या पद्धतीत, जगण्याच्या तसेच, जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणत आहे, याची विशेषत्वाने नोंद करायला हवी.
 
भारतात केवळ 13 टक्के इतकाच वापर असला, तरी ‘5जी’ सेवेचा होत असलेला विस्तार तसेच, उपग्रहावर आधारित सेवांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, दूरसंचार क्षेत्रातच आमुलाग्र बदल घडून येणार आहेत. हे बदल डेटा चालित सेवांच्या क्षेत्रात होत असलेली वाढ विकासाची नवी क्रांती देशात घडवून आणेल, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. ‘5-जी’ आधारित वायरलेस ब्रॉडबॅण्ड सेवांचा विस्तार देशात यापूर्वीच सुरू झाला आहे. त्याला एअर फायबर असेही संबोधले जाते. तो वेगवान इंटरनेटची गरज तर पूर्ण करतोच, त्याशिवाय तो अखंडित सेवेची सुनिश्चिती करतो. हायस्पीड डेटाची वाढती आवश्यकता पूर्ण होते. ज्या शहरात प्रायोगिक तत्त्वांवर, ‘5-जी’ सेवा सुरू करण्यात आली, त्या शहरांत एअर फायबरची सुविधा ग्राहकांना मिळत आहे. येणार्‍या काळात उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा प्रत्यक्षात आल्यानंतर, देशातील दुर्गम भागात इंटरनेट वापरात क्रांती घडून येणार आहे. त्यावेळी ब्रॉडबॅण्ड सेवांचा विस्तार झपाट्याने होताना दिसून येईल. या क्षेत्रात रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होत असून, त्यांच्या वेतनातही वाढ झालेली दिसते.

पायाभूत सुविधांच्या विकासापलीकडे, ब्रॉडबॅण्ड क्षेत्राचा विस्तार, दूरसंचार उद्योगात नवनिर्मितीला चालना देत आहे. वेगवान इंटरनेट ही आज डिजिटल युगाची आवश्यकता आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग, एज कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज,सोल्यूशन्स आणि प्रगत नेटवर्क व्यवस्थापन प्रणाली, यांसारखी नवीन उत्पादने आणि सेवांची निर्मिती यांच्यासाठी इंटरनेट सेवा अत्यंत आवश्यक. त्याचवेळी ती वेगवान असणे ही प्राथमिक गरज. या नवोपक्रमामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रात गुंतवणूक, विस्तार आणि रोजगार निर्मितीला अधिक चालना मिळते आहे. देशातील माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगाचा वाढता विस्तार, ब्रॉडबॅण्ड सेवेच्या वापराला बळ देणारा ठरत आहे. त्याशिवाय अन्य क्षेत्रांमध्ये आर्थिक वाढीसाठी तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सुधारित इंटरनेट प्रवेशामुळे, विविध उद्योगांमध्ये उत्पादकता वाढीस चालना मिळाली आहे. विशेषत: सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, नवनव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेट हे साधन आहे. ही वाढलेली उत्पादकता एकूण आर्थिक वाढीस हातभार लावणारी ठरत आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होताना दिसून येते. विशेषतः ई-कॉमर्स, ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल मार्केटिंगचा उदय हे ब्रॉडबॅण्ड सेवेच्या विस्ताराचे प्रतीक ठरावेत. लॉजिस्टिक, ग्राहक सेवा आणि डिजिटल मार्केटिंगसारख्या संबंधित क्षेत्रांमध्ये, हे क्षेत्र रोजगार निर्मिती करत आहे, याचे हे प्रमुख उदाहरण.

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनल ही भारतातील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक. आज ती बाजारपेठेतील आपली उपस्थिती वाढविण्यासाठी तसेच, सेवा वितरण सुधारण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्नांत आहे. बीएसएनएल तिच्या दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये, सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. यामध्ये फायबर ऑप्टिक नेटवर्कचा विस्तार करणे याचा समावेश आहे. हायस्पीड ब्रॉडबॅण्ड सेवा प्रदान करण्यासाठी, ते अत्यंत आवश्यक असेच. सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाने या प्रयत्नांना बळ दिले आहे, असे नक्कीच म्हणता येईल. बीएसएनएलने कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी,विशेष प्रयत्न चालवले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात ती कार्यरत होताना दिसून येते. त्याचवेळी ती भारत फायबर सारख्या उपक्रमांद्वारे, ब्रॉडबॅण्ड सेवांचा विस्तार करण्यावर भर देताना दिसून येते. या सेवा स्पर्धात्मक दरांवर हायस्पीड इंटरनेट देण्यासाठी विशेषत्वाने आखल्या आहेत.

दूरसंचार क्षेत्राची गरज लक्षात घेता, बीएसएनएल ‘5-जी’ सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनी त्यासाठीच्या चाचण्या घेत असून, आवश्यक त्या पायाभूत सुविधांवर काम करत आहे. त्यानंतर एअरटेल, जीओ यांच्यानंतर देशात ‘5-जी’ सेवा देणारी ती तिसरी मोठी कंपनी ठरले. एअरटेल आणि जीओ यांनी विशेषत्वाने शहरी भागात ही सेवा देण्याचे धोरण अवलंबलेले दिसून येते. मात्र, बीएसएनएल संपूर्ण देशात विशेषतः ग्रामीण भागात कार्यरत आहे, हेच तिचे बलस्थान ठरावे. ‘नॅशनल ब्रॉडबॅण्ड मिशन’ सारख्या विविध सरकारी कार्यक्रमांशी ती संलग्न असल्याने, आपली सेवा क्षमता वाढवण्यासाठी आर्थिक संसाधने, तंत्रज्ञान आणि कौशल्याचा लाभ तिला मिळू शकतो.
 
बीएसएनएल हा पांढरा हत्ती असल्याचे म्हणत , काँग्रेसच्या कार्यकाळात तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. एअर इंडियासारखेच काँग्रेसने एका चांगल्या संस्थेचे जास्तीतजास्त नुकसान केलेले दिसून येते. काँग्रेसी नाकर्तेपणाचा ठपका म्हणूनच बीएसएनएलवरही बसला. मात्र, गेल्या काही वर्षांत ती निश्चितपणे आपल्या सेवांमध्ये सुधारण करत, अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येईल, यासाठी प्रयत्नात आहे. ग्राहक सेवा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी ती डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये गुंतवणूक करत आहे. अधिक चांगला ग्राहक अनुभव ग्राहकांचा विश्वास वाढवणारा ठरेल तसेच, तो नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करेल, असे म्हणता येईल. एकूणच, ब्रॉडबॅण्ड सेवांचा होत असलेला विस्तार हा, देशातील डिजिटल क्रांतीला पोषक असाच आहे, हे नक्की.


 
Powered By Sangraha 9.0