देवेंद्र ऐकताय ना?

30 Oct 2024 20:41:32
devendra fadnavis
 

या वयात खोटे बोलू नये म्हणाले देवेंद्र फडणवीस. बाबा, अहो बाबा, ऐकताय ना? नका बोलू काही. आपण काही बोलतो आणि मग काही काळाने त्या म्हणण्याचे उत्तर व्याजासकट आपल्याला मिळते. मी पण म्हणाले होते, अकेला देवेंद्र क्या करेगा? त्यानंतर बघताय ना बाबा? क्या से क्या हुआ? तुमचा नवा पुतण्या आणि त्याचा उजवा की डावा हात सारखे म्हणायचे ते म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणूस. वर्षोनुवर्ष हेच चालले होते. पण, देवेंद्र म्हणाले तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबईही नाही. त्यानंतर खरच तुमच्या नव्या पुतण्याला आणि त्यांच्या डाव्या उजव्या हातालाही कळून चुकले की, खरेच ते म्हणजे महाराष्ट्र नाही आणि मराठी माणूस म्हणजेही ते नाहीत. बाबा लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही आजारी पडलात म्हणजे तसे लोकांना दिसले. लोकांनी आपल्याला सहानुभूती दिली. तेव्हा कुठे आपली तुतारी वाजली बाबा. मागे पावसात भिजलात. लोक पण काय ना बाबा, हजारो छत्रीचे कारखाने विकत घेणारे किंवा लाखो लोकांना एकाच वेळी छत्री घेऊन उभे करणारे किंवा तुम्ही पावसाने भिजू नये म्हणून चांदीचेही छप्पर टाकणारी माणसे आपल्याकडे आहेत. आपणही हे सगळे करू शकत होतो म्हणा. पण, तरीही तुम्ही पावसात भिजलात आणि लोकांना पुन्हा सहानुभूती वाटली. अरेरे इतका वयोवृद्ध माणूस पावसात भिजला. दुसरीकडे तुमच्या नव्या पुतण्याने पण, मला मच्छर मारता येत नव्हते म्हणून लोकांची सहानुभूती मिळवलीच होती. सांगा ना बाबा, आता काय प्लॅन आहे? काय म्हणता? मी माझ्या मुलीला कोणतेच पद दिले नाही असे म्हणून तुम्ही सहानुभूती मिळवणार आहात? बाबा हे बेस्ट राहील. अरे पण हे कोण बोलले की, आता सहानुभूती मिळणार नाही. कारण, तुम्ही मला एकरात करोडो रूपयाची वांगी पिकवायचे सिक्रेट दिले, खासदार की दिली आणि हा पक्ष माझ्या बापाचा आहे असे बोलून कार्यकर्त्यांवर तोंडसुख घ्यायचे अधिकार पण दिले? कल्पवृक्ष कन्येसाठी तसे सत्ताकारण कन्येसाठी केले? लेकीला कोणतेच पद दिले नाही, असे तुम्ही खोटे बोलता असे लोक म्हणत आहेत. काय म्हणता बाबा? देवेंद्र यांनी कितीही म्हटले या वयात खोटे बोलू नये, तरी तुम्ही ते बोलण्याचा घेतला वसा टाकणार नाहीत? काय म्हणता बाबा आदत से मजबूर? देवेंद्र ऐकताय ना? ते आदत से मजबूर आहेत.
 

फेक नरेटिव्हची वेळ झाली


लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाबद्दल काँग्रेसने खोट्या अफवा पसरवल्या होत्या. भाजप सत्तेत आले, तर संविधान बदलणार आरक्षण हटवणार असा अपप्रचार काँग्रेसने केला होता. भोळ्या-भाबड्या लोकांनी सगळे खरे मानले आणि विझलेल्या काँग्रेसला 99 जागा जिंकता आल्या. पण, पोटातले ओठात येतेच. त्यामुळे राहुल गांधी यांनी विदेशात आरक्षण हटवण्याच्या आशयाचे विधान केलेच. त्या विधानाचे पडसाद देशात उमटले. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्या विधानावर सारवासारव केली. हे सगळे आठवण्याचे कारण विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वत:चे कर्तुत्व काय सांगणार? स्वातंत्र्यानंतर अनेक दशक राज्य करूनही गरिबी हटवता आली नाही. हे कर्तुत्व? की, काश्मीर प्रश्नाच्या पापाचा हिशोब द्यावा लागतो हे कर्तुत्व? की, चीनसह पाकिस्तानची प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट रंगवली हे कर्तृत्व? की, नेहरूनंतर त्यांची मुलगी, इंदिरानंतर राजीव आणि नंतर पत्नी सोनिया आणि आता सोनियांसोबत त्यांचा मुलगा राहुल आणि मुलगी प्रियंका हेच वंशपरंपरागत काँग्रेसचे मालक, सत्ताकेंद्री राहिले हे कर्तुत्व सांगणार? त्यांना काही लोक पप्पू म्हणतात. पण, राहुल खरे हुषार आहेत. बहुसंख्य समाज आरक्षण म्हटले संविधान म्हटले की, रस्त्यावर उतरतो हे हेरून त्यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलनारचा नरेटिव्ह पोसला. आताही ते विनासंदर्भ म्हणाले की, ’मनुस्मृती संविधानाच्या विरोधात होती.’ हे विधान त्यांनी आताच का केले? मनुस्मृतीमध्ये, संविधानामध्ये काय आहे, याचा थांगपत्ता राहुल यांना असेल का? लोकांचे म्हणणे की, ’त्यांना वाटते त्यांच्या विधानाचे समर्थन आणि विरोध करणारे गट-तट हिंदू समाजात पडणार. मग, एक समाज दुसर्‍या समाजावर मनुस्मृती लादणार आहे. या अफवा पसरवणे सोपे जाणार. मग, विभागलेल्या हिंदू मतांचा फायदा त्यांना मिळणार. आता कुणी म्हणेल की, हे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. पण, आहे हे असे आहे. असो. एक मात्र नक्की की, राहुल गांधी, शरद पवार यांनी संविधान, मनुस्मृती वगैरे म्हटले की, समजून जायचे उठा उठा आता निवडणूक आली आहे. फेक नरेटिव्ह पसरायची वेळ झाली.

9594969638
Powered By Sangraha 9.0