भारत जगाच्या वाढीचा चालक

    30-Oct-2024
Total Views |
bharat economy growth festival season
 
 
भारतातील सणवार वाढीला चालना देतात, हे पुन्हा एकदा समोर आले असून, दिवाळीच्या हंगामात आजपर्यंत 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. भारत 7.5 टक्के दराने वाढत असताना, जगाच्या विकासात त्याचे योगदान तब्बल 16 टक्के इतके राहिले आहे. म्हणजेच, भारत जगाच्या वाढीचा चालकही ठरला आहे.

भारतातील दिवाळी सण बाजारपेठेला चालना देत असून, ग्राहकांचा वाढता खर्च तसेच, ‘ई-कॉमर्स’चा देशभरात झालेला विस्तार देशाच्या आर्थिक वाढीत भर घालेल, असा अंदाज आहे. भारताची वाढ 7.5 टक्के दराने होईल, असा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज असून, त्याला पूरक अशी उलाढाल भारतीय बाजारपेठेत होताना दिसून येत आहे. एका अहवालानुसार, दिवाळीत 60 हजार कोटींची उलाढाल झाली आहे. त्याशिवाय येत्या दोन दिवसांत ती विक्रमी होईल, असाही अंदाज. रिटेल, ऑटोमोटिव्ह आणि कन्झ्युमर गुड्ससारख्या क्षेत्रांना अच्छे दिन आले असून, भारतीय बाजारपेठेत झालेली वाढ जगाच्या आर्थिक परिस्थितीशी विपरित वाढीचा दर नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे, हे नक्की. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा झालेला भारताचा लौकिक, भारताच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला असेल आणि 2047 सालापर्यंत विकसित राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी भारत ठोस उपाययोजना करत आहे.
 
2023 सालच्या या वर्षात जागतिक विकासात भारताचे योगदान 16 टक्के इतके राहिले आहे. म्हणजेच भारत केवळ स्वतःचा विकास करत नाही, तर भारत मोठा होतो, तेव्हा संपूर्ण जगाच्या वाढीला तो हातभार लावतो, असे नक्कीच म्हणता येईल. जगासाठी विकासाचे इंजिन म्हणून आज भारत काम करतो आहे. जागतिक वाढीचा वेग 3.2 टक्के इतकाच असताना, भारताची 7.5 टक्के दराने होत असलेली वाढ ही म्हणूनच महत्त्वाची आहे. भारतात पायाभूत सुविधांसाठी होत असलेला विक्रमी खर्च तसेच, बंदरांच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेला सागरमाला हा प्रकल्प आणि स्मार्ट सिटी मिशन यासारख्या योजना पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. आर्थिक विकासात म्हणूनच त्यांचे अनोन्य असे योगदान आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी भारताने ‘आधार’चा पुरेपूर वापर करत, बायोमेट्रिक ओळख प्रभावीपणे करत, डिजिटल अर्थव्यवस्थेचा जो भक्कम पाया रचला, त्याची गोमटी फळे आज मिळत आहेत. भारत आपल्या वाढत्या तंत्रज्ञान उद्योगासह, नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान सेवांचे एक प्रमुख केंद्र म्हणून जागतिक पातळीवर उदयास आला आहे. आर्थिक विकासाला या सुविधा चालना देत असून, डिजिटल अर्थव्यवस्थेचे भविष्य घडविण्यात भारताला एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून स्थान देत आहे. गेल्या वर्षी भारताचे संरक्षण उत्पादन एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले असून, निर्यात 16 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. 2024 सालच्या या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता असून, ते 1.75 लाख कोटी रुपयांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. संरक्षण सामग्रीचा सर्वात मोठा आयातदार ते प्रमुख निर्यातदार अशी भारताची ओळख गेल्या काही वर्षांत प्रस्थापित झाली आहे.

मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या 100 दिवसांत सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दहा वर्षे धोरणांची दिशा, गती आणि अचूकता कायम राखली असून, पहिल्या 100 दिवसांत तीन लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. मुंबईजवळील वाढवण येथे 76 हजार कोटी रुपये खर्चाच्या बंदराच्या उभारणीमुळे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये त्याचा समावेश होणार आहे. एकूणच, देशभरात पायाभूत सुविधांसाठी ज्या तरतुदी केल्या जात आहेत, त्याचा परिणाम म्हणून देशाच्या विकासाला बळ मिळते आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीसारख्या सणासुदीत बाजारपेठेत झालेली 60 हजार कोटींची उलाढाल ही महत्त्वाची ठरते. तसेच, हा तर अंदाज अजून, दिवाळी साजरी झाल्यानंतरच, नेमकी उलाढाल समजू शकणार आहे. ती एक लाख कोटी रुपये इतकी अफाट असू शकते. भारताची झालेली वाढ ही निरोगी आणि विस्तारणार्‍या अर्थव्यवस्थेचे प्रतिक मानता येईल.
 
देशाच्या एकूण विकासात दिवाळीसारख्या सणांचे मोठे योगदान आहे. दिवाळी किरकोळ विक्रीला चालना देते. त्यामुळे उत्पादन, रोजगार आणि एकूणच आर्थिक क्रियाकलाप वाढतात. सण आणि आर्थिक वाढ यांच्यातील परस्परसंबंध देखील आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करतात. दिवाळी दरम्यान स्मार्टफोन विक्रीत 25-25 टक्के वाढ होण्याचा अंदाज भारतातील सर्वात मोठ्या सणादरम्यान या फोनच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ दर्शवणारा आहे. भारतात ‘5जी’ तंत्रज्ञान आले असले, तरी अद्याप संपूर्ण देशभरात ते पूर्णपणे कार्यरत झालेले नाही. मात्र, काही शहरांमध्ये ते उपलब्ध असल्यामुळे ‘5जी’ स्मार्टफोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

देशाची लोकसंख्या 140 कोटींच्याही पुढे असल्यामुळे ‘5जी’ फोनची बाजारपेठ किती अफाट आहे, हे समजून येईल. ग्रामीण भारतातील स्मार्टफोनचा वाढणारा वापर, त्यांच्या विक्रीला चालना देत आहे. दिवाळी दरम्यान त्यांच्या विक्रीत जो वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तो प्रामुख्याने सणासुदीचा हंगाम डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आला आहे. गेल्या वर्षी भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेचे मूल्य 38 अब्ज डॉलर्स इतके होते, असे एका अहवालात म्हटले आहे. त्यात 10 ते 12 टक्के चक्रवाढ दराने वाढ होईल, असे मानले जाते. 2022 सालामध्ये भारतात 168 दशलक्ष स्मार्टफोन विकले गेले. म्हणूनच, जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असे तिला संबोधले गेले. 2023 सालामध्ये ती 200 दशलक्ष युनिटपर्यंत पोहोचली. भारतीय बाजारात 10 ते 15 हजारांपासून ते 15 ते 30 हजारांपर्यंत चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन उपलब्ध होत आहेत.

2022-23 सालच्या या आर्थिक वर्षात भारताने अंदाजे दहा अब्ज डॉलर्स इतक्या मूल्यांचे स्मार्टफोन निर्यात केले. जगातील प्रमुख कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्र स्थापन केल्यामुळे स्मार्टफोनच्या निर्यातीत लक्षणीय वाढ होत आहे. तसेच, ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सरकार अशा प्रकल्पांना बळ देत आहे. याच वर्षात भारताने 30 दशलक्ष स्मार्टफोन्सची निर्यात केली. भारत आता स्मार्टफोनचा प्रमुख निर्यातदार म्हणूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जात आहे. मध्य पूर्व, युरोप तसेच, आग्नेय आशियामधील देश भारतामधून फोन आयात करत आहेत. सॅमसंग बरोबरच अ‍ॅपल या कंपनीचे फोन ‘मेड इन इंडिया’च्या लेबलसह जगभरात निर्यात होत आहेत, ही सुखावणारी बाब. 2025-26 सालापर्यंत ही निर्यात 50 अब्ज डॉलर इतकी झालेली असेल, असा अंदाज आहे. देशांतर्गत उत्पादन वाढ, सरकारी उपक्रम आणि दिग्गज कंपन्या यांच्या समन्वयातून भारत स्मार्टफोनच्या बाजारातही आपले स्थान बळकट करताना दिसून येतो. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था एकटीच वाढत नसून, ती संपूर्ण जगाच्या वाढीला हातभार लावत आहे, हे नक्कीच सुखावणारे चित्र आहे.
 

संजीव ओक