छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि अभिनव युद्धतंत्राचे दर्शन घडविण्यासाठी, गुजरातमधील केवडिया येथे यंदाच्या ‘राष्ट्रीय एकता दिना’निमित्त होणार्या कार्यक्रमात नेपथ्य संकल्पना म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली आहे. नेपथ्य म्हणून रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात छत्रपती शिवबांच्या गडकिल्ल्याचा सार्थ अभिमान आहे. त्यानिमित्ताने किल्ले रायगड याविषयी अधिक जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
महाराष्ट्रातील दर्याखोर्यांमध्ये उंच उभा रायगडचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गाथा सांगतो. एकेकाळी भरभराटीला आलेल्या मराठा साम्राज्याची ही राजधानी, तिचा उंचावरील माथा, शौर्य, हुशारी, जिद्दीची गाथा सांगतो. रायगडावरची प्रत्येक शिळा छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदर्शी नेतृत्व आणि साहसाचा इतिहास कथन करते. शिवरायांच्या नेतृत्वामुळे हा किल्ला मराठ्यांच्या अभेद्य सामर्थ्याचे प्रतीक ठरला. मराठा साम्राज्याला आकार देणार्या असामान्य कर्तृत्वाची गाथा सांगणारा हा किल्ला आजही अनेक पिढयांना प्रेरणा देतो. किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेली मराठा साम्राज्याची भक्कम राजधानी जिचे वर्णन पुढीलप्रमाणे केले जाते-
दख्खनची ही पवित्र माती ।
शिवरायांच्या चरणस्पर्शाची
शान सांगते या मातीची
इथे आदरे माना झुकती
राजधानी ही स्वराज्याची
भव्य हिमालय तुमचा, आमुचा केवळ माझा सह्याद्री-कडा!!!
गौरी-शंकर उभ्या जगाचा, मनात पूजीन रायगडा!!!
मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची निवड कशी केली, याचे प्रतिबिंब ’सभासद बखर’मध्ये पाहायला मिळते. सभासद बखर म्हणते, ”छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर किंवा रायरीची ताकद, डोंगराचा खडकाळ भित्तीकडा, परिसरातील सर्व पर्वत आणि टेकड्यांमध्ये असलेली उंची लक्षात घेतली. खडकाचे अखंड आणि कणखर स्वरूप यामुळे त्याची क्षमता अजोड ठरत होती. दौलताबादचा किल्ला हादेखील एक उत्तम किल्ला आहे. तरीही त्याला रायगडाची तोड नाही. हा अधिक उंच आणि चांगला असल्यामुळे राजधानी म्हणून अधिक योग्य आहे. रायगड किल्ला, काळ आणि गांधारी नद्यांच्या दरीखोर्यांनी वेढलेला असून शेजारच्या टेकड्यांनी जोडलेला नसलेला एकाकी, भक्कम गिरिपिंड आहे. खड्या चढणी आणि १ हजार, ५०० फूट भित्तीकडा अशा भौतिक वैशिष्ट्यांमुळे त्याचे स्वरूप अभेद्य होते. अभिनव संरक्षण व्यूहरचनांनी त्याला अधिक बळकटी देण्यात आली.
मराठा काळचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार ग्रॅण्ट डफ यांनी रायगड आणि जिब्राल्टरचा खडक यात तुलना केली आहे. त्याने रायगडाला ‘पूर्वेचे जिब्राल्टर’ असे संबोधले आहे. ’भारतातील मराठा साम्राज्याची लष्करी वास्तुकला’ याअंतर्गत ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा सूचीसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ किल्ल्यांपैकी एक रायगड आहे. ‘युनेस्को’च्या सूचीसाठी नामांकन करण्यात आलेल्या १२ किल्ल्यांमध्ये रायगड हा मराठा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि गिरिदुर्ग राजधानीचे उत्तम उदाहरण आहे. डोंगराचे नैसर्गिक भक्कम स्वरूप आणि किल्ल्याच्या आतील रचना यांच्यात उत्तम मेळ इथे साधलेला दिसतो.
रायगड किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली भूतकाळाचा मूक साक्षीदार म्हणून उभा असून दुर्गराज म्हणून ओळखला जातो. ’शिवतीर्थ’ म्हणून जनमानसात त्याचे विशिष्ट स्थान आहे. समस्त मराठी जनांमध्ये पवित्र तीर्थस्थानाचा दर्जा रायगडाला प्राप्त झाला आहे. अतुलनीय पराक्रम, धैर्य, प्रशासकीय कुशाग्रता, परोपकार आणि राष्ट्रभक्ती यांचा आदर्श असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या किल्ल्याला अभिमानास्पद इतिहास तर आहेच. त्याचसोबत एक परिपूर्ण संरक्षण वास्तुकलेचा तो नमुना आहे. ऐतिहासिक दिनी हजारो लोक किल्ल्यावर गर्दी करतात. ख्रिश्चन आणि हिंदू दिनदर्शिकेच्या आधारे ‘शिवराज्याभिषेकचा वर्धापन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठी गर्दी होते. तसेच, शिवाजी महाराजांची पुण्यतिथीदेखील मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.
सतराव्या शतकात (इसवी सन १६७४) येथेच शिवाजी महाराजांनी आपली राजधानी स्थापन केली होती. शिवाजी महाराजांनी १६५६ साली चंद्रराव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला होता. यथोचित परिश्रमानंतर आणि किल्ल्याचे मोक्याचे स्थान आणि दुर्गमता याचा विचार केल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या राजधानीसाठी तोच सर्वात योग्य असल्याचे ठरले. टेकडीच्या एका बाजूनेच टेकडीच्या माथ्यावर जाता येते. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरून सहा वर्षे म्हणजेच १६८० साली मृत्यू होईपर्यंत हिंदवी स्वराज्यावर राज्य केले. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे.रायगड किल्ला भव्य दरवाजे, तटबंदी आणि भव्य स्मारकांसाठी ओळखला जातो. मात्र, अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी, नक्कर खाना, शिरकाई देवी मंदिर, भगवान शंकराला समर्पित असलेले जगदीश्वर मंदिर वगळता, दरबार (राजसदर), राजेशाही प्रासाद, राणी महाल (राणीवासा), बाजारपेठ, मनोरे, वाडेश्वर मंदिर, खुबलादा बुर्ज, मस्सीद मोर्चा, नन्ने दरवाजा या किल्ल्यावरील वास्तूंची दुरावस्था झाली आहे.
शाही परिसर : शाही परिसर ज्यामध्ये रानीवासा, राजसदर, नक्करखाना, मेणा दरवाजा आणि पालखी दरवाजा यांचा समावेश आहे, ते सुस्थितीत आहेत आणि तिथे केवळ तीन प्रवेशद्वारांमधून नक्करखाना, मेणा दरवाजा आणि पालखी दरवाजा जाता येते. हे तटबंदी संकुल बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. बालेकिल्ल्याला लागूनच तीन भव्य बुरुज आहेत. एक उत्तरेला आहे, तर इतर दोन तटबंदीच्या पूर्वेला आहेत. तीन मजली बुरुज (मनोरे) अत्यंत सुशोभित आहेत आणि त्याकाळी हे मनोरंजनाचे ठिकाण होते असे दिसून येते. जलनिस्सारणाच्या योग्य व्यवस्थेशी जोडलेले शौचालय दखल घेण्याजोगे आहे. पूर्वेला एक भूमिगत तळघर (खलबत खाना) आहे. ज्याचा उपयोग बहुधा गुप्त सभा, वैयक्तिक पूजेसाठी तसेच, खजिना ठेवण्यासाठी म्हणून केला जात असावा.
राजसदर (प्रेक्षागृह) : येथेच शिवाजी महाराज आपला दरबार भरवत आणि दैनंदिन बाबींवर न्यायनिवाडा करण्यासाठी तसेच, मान्यवर आणि दूतांना भेटण्यासाठी याचा वापर करत असत. ही पूर्वाभिमुख आयताकृती रचना आहे. नक्करखाना या नावाने ओळखल्या जाणार्या भव्य प्रवेशद्वाराने पूर्वेकडून जाता येते. प्रवेशद्वार म्हणजे शाही सिंहासनासमोर असलेली तीन मजली इमारत आहे. सर्वात वरचा मजला विटांनी बांधलेला आहे, तर खालचा मजला दगडी बांधकाम केलेला आहे. असे म्हणतात की, नक्करखाना येथे एक शाही वाद्यवृंद चालायचे. अचंबित करणार्या ध्वनिविषयक गुणधर्मांच्या संरचनेचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. नक्करखाना आणि शाही सिंहासन यामधील अंतर सुमारे ६५ मीटर आहे. तरीही दोन्ही बाजूंकडून थोडीशी कुजबुजही स्पष्टपणे ऐकू येते. राजसदर हा शिवाजी महाराजांची सुख-दु:ख, राग, विजय, प्रशासकीय कुशाग्रबुद्धी आणि प्रचंड उदारतेचा मूक साक्षीदार आहे. मुख्य परिसरात सिंहासनाच्या मूळ जागेवर उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेल्या स्थितीतील अष्टकोनी मेघडंबरी (अलंकृत छत) आहे. हिरे आणि सोन्याने जडलेले शाही सिंहासन सुमारे एक हजार किलो वजनाच्या सोन्याच्या आठ स्तंभांवर उभे होते, अशी नोंद आहे. त्यावर शिवाजी महाराजांचे राजचिन्ह ही होते. सिंहासनावरील छत्री मौल्यवान दगड आणि मोत्यांच्या तारांनी सजलेली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी : मंदिराला लागूनच जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या अगदी समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. मूळ स्वरूपातील समाधीला कमी उंचीचा अष्टकोनी चबुतरा होता. परंतु, विसाव्या शतकाच्या सुरूवातीला केवळ चबुतर्याची उंचीच वाढवली नाही, तर त्याच जागेवर छत्री देखील उभारण्यात आली. रायगडवाडी गावाजवळ डोंगराच्या पायथ्याशी चित्त दरवाजा आहे. याला स्थानिक स्तरावर जित दरवाजा म्हणूनही ओळखले जाते. सुमारे ७०-८० मीटर पायी चालल्यानंतर खूब लडा बुरूज आहे. हा एक मोक्याचा ठिकाणी बांधलेला बुरुज आहे. जिथून गडाच्या जवळ येणारा कोणीही सुरक्षा कर्मचार्यांच्या नजरेस पडू शकतो.
रायगड किल्ल्याचा इतिहास
मराठ्यांनी इ. स. १६५३ साली मोर्यांकडून रायगड (तेव्हा रायरी म्हणून ओळखला जाणारा) काबीज केला. किल्ला राजधानी होण्यास योग्य व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पुनर्बांधणीचे काम हिरोजी इंदुलकर यांच्याकडे सोपवले. त्यानंतर दि. ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि त्यांना छत्रपती उपाधी प्राप्त झाली. या किल्ल्याने मराठा साम्राज्याच्या प्रशासन आणि विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
होळीचा माळ
ही जागा नक्करखान्याच्या बाहेर आहे. हे एक विस्तीर्ण मोकळे मैदान आहे, जे बहुधा वार्षिक होळी सणासाठी वापरले जात असे. होळी माळाच्या पश्चिमेला, किल्ल्याची प्रमुख देवता शिरकाई भवानीला समर्पित एक छोटेसे मंदिर आहे. असे मानले जाते की, ही प्रमुख देवता पूर्वी होळी माळाच्या नैऋत्येस असलेल्या उंच दगडी मंडपावर वसलेली होती, जी नंतर सध्याच्या ठिकाणी हलविण्यात आली. होळीचा माळच्या उत्तरेला एक प्रशस्त आणि सुव्यवस्थित समांतर अशी संरचनांची रांग आहे, जी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या परिसरातील प्रत्येक संरचनेसमोर व्हरांडा आहे आणि मागील बाजूला एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या आहेत. चबुतरा आणि भिंती कातीव दगड आणि गोटे चुन्याचा वापर करून बांधल्या आहेत.
जगदीश्वर मंदिर
पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर आयताकृती असून, समोर मंडप आणि मागील बाजूला गर्भगृह आहे. कमी उंचीच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करता येतो. गर्भगृहात एक शिवलिंग आहे, जे आजही पुजले जाते. मंदिराच्या आतील भिंतींवर कोणतेही कोरीव काम नाही. मात्र मंदिराच्या वरील भागात सुरेख कोरीव काम आहे.