मुंबई : देशातील युवा पिढीला रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत इंटर्नशिपसाठी नियुक्त झालेल्या तरुणांना मासिक ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. केंद्राकडून प्रायोगिक तत्त्वावर चालू आर्थिक वर्षात १.२५ लाख इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना असून ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की सरकार इंटर्नशिप प्रदान करण्यासाठी एक व्यापक योजना सुरू करेल. याअंतर्गत पाच वर्षांत एक कोटी तरुणांना ५०० आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. या माध्यमातून व्यावसायिक वातावरण शिकण्याची, विविध व्यवसाय क्षेत्रात १२ महिने काम करण्याची आणि रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत.
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत पात्र उमेदवार पोर्टलवर नोंदणी करू शकतात. नोंदणीमार्फत तपशील ‘बायोडेटा’ तयार करण्यासाठी वापरला जाईल. इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल. तरुणांचा हप्ता सरकार भरणार असून याव्यतिरिक्त कंपन्या निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमादेखील देऊ शकतात.