मुंबई, दि. २ : (Nitesh Rane) “भारतात ९० टक्के हिंदू राहतात. त्यामुळे हिंदूंचे हित जपणे, हा गुन्हा होऊ शकत नाही. देशातील कट्टरपंथी, बांगलादेशी हे हिंदू सण, मिरवणुकांवर दगडफेक करतात. याविरोधात आवाज उठवल्याबद्दल गुन्हा दाखल होत असेल, तर हिंदूहितासाठी असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार आहे,” असे मत भाजप आ. नितेश राणे यांनी बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी व्यक्त केले.
मुस्लिमांविरोधातील वक्तव्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबद्दल विचारले असता नितेश राणे म्हणाले की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून आवाज उठवत आहे आणि उठवत राहणार आहे. जेथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ आहे, तेथे मी पोहोचत आहे. आम्ही सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही. जो देशभक्त मुस्लीम या देशाला आपला मानतो, तोच खरा मुस्लीम. पाकिस्तानी झेंडे फडकावल्यावर माझ्या कोकणातील मुस्लिमांनीही त्याचा निषेध केला. ते खरे देशभक्त. झाकीर नाईक आणि मुस्लीम मौलाना जे बोलतात, तेच रामगिरी महाराजांनी सांगितले. हिंदूंना त्रास द्या आणि २०४७ सालापर्यंत इस्लाम राष्ट्र निर्माण करा, ही त्यांची योजना आहे. हे होऊ नये, अशी आमची तळमळ आहे. आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही. पण, संध्याकाळच्या बिर्याणीनिमित्त आपले कर्तव्य विसरणारे काही अधिकारी आहेत. धर्म संकटात असताना हे अधिकारी त्या लोकांना मदत करतात. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होण्यापूर्वी आपण सर्व हिंदू आहोत,” असेही राणे म्हणाले.