इराणच्या प्रतिसादावर प. आशियाचे भवितव्य

29 Oct 2024 21:34:13
western asia iran conflict
 

पश्चिम आशियात केवळ बळाची भाषा कळते. इस्रायलने एक हजारांहून अधिक किलोमीटर अंतर ओलांडून इराणमध्ये हवाईहल्ले करुन आमच्या वाकड्यात शिरु नका, असा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळे आता इराणच्या प्रतिसादावर पश्चिम आशियाचे भवितव्य अवलंबून आहे.

इस्रायलवर ‘हमास’ने दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या दहशतवादी हल्यांना हिब्रू कालगणनेनुसार एक वर्षं पूर्ण होत असताना, इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले. शंभराहून अधिक लढाऊ विमाने आणि ड्रोननी या हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता. इराणची राजधानी तेहरान आणि खुजेस्तानमधील हवाई हल्ले प्रतिबंधक यंत्रणा उद्ध्वस्त करणे, हा या हल्ल्यांमागचा हेतू होता. रशियाकडून इराणला ‘एस 300’ यंत्रणा मिळाली असून, ती उद्ध्वस्त करण्यात इस्रायलला यश आले. वाटेत इस्रायली विमानांनी सीरिया आणि इराकमधील हवाई हल्ले प्रतिरोधक यंत्रणाही उद्ध्वस्त केली. त्यामुळे भविष्यात इस्रायल किंवा अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास प्रकल्पांवर विमानांद्वारे हल्ले केले, तर इराणला त्यांचा प्रतिकार करता येणार नाही.

दि. 31 जुलै 2024 रोजी ‘हमास’चा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची तेहरानमध्ये आणि दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी ‘हिजबुल्ला’चा प्रमुख हसन नसराल्लाची बैरुतमध्ये हत्या केल्यानंतर इराणने इस्रायलवर शेकडो ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. दि. 14 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे 300 ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्यात इस्रायलमधील एक लहान मुलगी क्षेपणास्त्राचा जळता तुकडा पडल्यामुळे जखमी झाली. या हल्ल्याच्या वेळेस केवळ इस्रायलच नव्हे, तर जॉर्डन आणि सौदी अरेबियानेही आपल्या हवाई हद्दीमध्ये घुसलेले इराणचे ड्रोन पाडले होते. अमेरिकेनेही या हल्ल्यांना निष्फळ ठरवण्यात मदत केली होती.

दि. 1 ऑक्टोबर रोजी इराणने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. यातील जवळपास सर्वच्या सर्व क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतल्या हवेतच नष्ट केली. इराणने आपण इस्रायलमधील कोणत्याही ठिकाणी नेमकेपणाने मारा करु शकतो, हे दाखवून दिले. एकाच वेळेस हजारो क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि त्यातील काही क्षेपणास्त्रे जरी यशस्वी झाली, तरी इस्रायलचे प्रचंड नुकसान होऊ शकते, हे इराणने दाखवायचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘हिजबुल्ला’ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या खासगी घरावरही एका ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने आपली अत्याधुनिक ‘थाड’ ही हवाई हल्ले प्रतिबंधक यंत्रणा इस्रायलमध्ये तैनात केली.

या हल्ल्यांनंतर सुरूवातीला इराणने आपले काहीच नुकसान झाले नसून, इराणच्या नागरिकांनी हे हल्ले होत असताना घरांच्या छतावर चढून एकप्रकारे इस्रायलला आव्हानच दिले. याउलट इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला असता, इस्रायली नागरिक लपून बसले, असा दावा इराणच्या माध्यमांनी केला असला, तरी त्यात काही तथ्य नव्हते. आता इराणचे झालेले नुकसान उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांद्वारे जगासमोर येत आहे. इस्रायली विमाने राजधानी तेहरानच्या परिसरात हल्ला करुन जातात आणि आपण त्यांचा प्रतिकारही करु शकत नाही, हे चित्र इराणच्या इस्लामिक व्यवस्थेसाठी फारसे चांगले नाही.

इस्लामिक क्रांतीपासून अमेरिका आणि इराणमध्ये वितुष्ट असून अमेरिकेचे कडक निर्बंध असूनही इराणच्या प्रभाव क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. 1980 सालच्या दशकात सुमारे आठ वर्षं लढल्या गेलेल्या इराण-इराक युद्धात इराणचे प्रचंड नुकसान झाले. याच काळात इराणमध्ये अंतर्गत उठावांद्वारे इस्लामिक व्यवस्था उलथवून टाकण्याचेही अनेक प्रयत्न करण्यात आले. पण, ते अयशस्वी ठरले. इराण-इराक युद्ध अनिर्णित अवस्थेत संपल्यानंतर इराणने नवीन युद्धतंत्र विकसित केले. पश्चिम आशियात ठिकठिकाणी दहशतवादी संघटनांना ताकद आणि शस्त्रास्त्रे पुरवून इराणने शत्रूच्या भूमीवर युद्ध लढण्याची रणनीती अवलंबली.

21व्या शतकाच्या सुरूवातीला अमेरिकेने इराणचे शत्रू असलेल्या तालिबान आणि इराकमधील सद्दाम हुसेनला संपवल्यानंतर इराणच्या ताकदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. गाझा पट्टीमध्ये ‘हमास’ आणि इस्लामिक जिहाद, लेबेनॉनमध्ये ‘हिजबुल्ला’, येमेनमध्ये हुती बंडखोर, सीरियामधील बशर अल असद यांचे सरकार आणि इराकमधील सरकार यांना इराण पाठिंबा देते. त्यासाठी ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड’नी इराण तसेच, जगभरातील अनेक उद्योगांमध्ये वाटा मिळवला आहे. या व्यवस्थेमुळे थेट युद्ध न लढता आखाती अरब राष्ट्रांवर वचक ठेवण्यात इराण यशस्वी झाला. वेळोवेळी इराणच्या इस्लामिक राजवटीविरुद्ध तेथील जनता रस्त्यावर उतरली असता कधी पाशवी बळाचा वापर करुन ती आंदोलने चिरडण्यात आली. आता मात्र, इराणच्या राजवटीला दोन्ही आघाड्यांवर लढावे लागणार आहे. इराणने चार दशकांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या ‘हमास’ आणि ‘हिजबुल्ला’ या संघटना अवघ्या वर्षभरात मोडकळीस आल्याने त्यांना प्रादेशिक महासत्ता होण्यासाठी नव्याने मांडणी करावी लागणार आहे.

इस्रायलच्या हल्यांना उत्तर द्यायचे का नाही, याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. इराणमधील नागरिकांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा हाती घेतला, तर त्यांना अडवणे अत्यंत कठीण जाणार आहे. अमेरिकेने चार दशकांपासून लादलेल्या निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था संकटात आहे. असे म्हणतात की, 1979 साली इस्लामिक क्रांती झाल्यावर इराणने काश्मीर, कोसोवो आणि पॅलेस्टाईनसह जगभरात इस्लामिक क्रांती पसरवण्याची घोषणा केली. त्यातून त्यांनी भारतासह अनेक देशांशी संबंध बिघडवले. हे संबंध 1980 सालापासून इराण-इराक यांच्यात आठ वर्षे चाललेल्या युद्धात आखाती अरब देशांनी इराकच्या सद्दाम हुसेनची साथ दिल्याने इस्लामिक जगातही इराण एकटा पडला. 1981 ते 1989 सालच्या या कालावधीत अली खोमेनी इराणचे अध्यक्ष होते.

 अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर ते इराणचे सर्वोच्च नेते झाले असता, त्यांनी विचारधारेपेक्षा व्यवहाराला महत्त्व दिले. त्यांनी इराणमध्ये सामाजिक सुधारणांचे वारे वाहू दिले. याच काळात हाशेम रफसंजानी आणि महंमद खतामींसारखे मवाळ नेते इराणचे अध्यक्ष झाले. 21व्या शतकाच्या सुरूवातीला सभोवतालची परिस्थिती अनुकूल आहे, हे पाहून खोमेनी यांनी पुन्हा एकदा इस्लामिक मूलतत्त्ववाद पुढे रेटण्यास सुरूवात केली. गुप्तपणे अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा विकास करताना इराणने जगाच्या पाठीवरून इस्रायलचे नामोनिशाण संपवण्याची घोषणा केली. आता इराण कोणत्या दिशेने जाणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता अली खोमेनीही 85 वर्षांचे असून, ते कोणाला आपला उत्तराधिकारी नेमतात त्यावर इराणचे भविष्य अवलंबून आहे.
 
इराणमध्ये इस्लामिक मूलतत्त्ववादी व्यवस्था असली, तरी त्यात मवाळ आणि जहाल गट आहेत. जहाल गट इस्रायलवर हल्ला करण्यासाठी किंवा मग अमेरिकेला मदत करणार्‍या आखाती देशांना या युद्धात ओढण्याचा आग्रह करत आहेत, तर मवाळपंथीय थोडे सबुरीने घ्यावे, असा सल्ला देत आहेत. अमेरिकेत पुढच्या आठवड्यात निवडणुका असून इराणचा डोनाल्ड ट्रम्पवर अजिबात विश्वास नाहीये. त्यामुळे ट्रम्प यांचे पारडे जड होताना दिसले, तर इराण-इस्रायलविरुद्ध आणखी हल्ले करु शकते. कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्ष झाल्या आणि इराणच्या अंतर्गत राजकारणात मवाळ गटांचे पारडे जड झाले, तर येणार्‍या काळात इराणमध्ये सुधारणांचे नवीन वारे वाहू लागतील. असे म्हणतात की, पश्चिम आशियात केवळ बळाची भाषा कळते. इस्रायलने एक हजारांहून अधिक किलोमीटर अंतर ओलांडून इराणमध्ये हवाईहल्ले करुन आमच्या वाकड्यात शिरु नका, असा स्पष्ट संदेश दिला आहे. इराण त्याला कसा प्रतिसाद देते, त्यावर पश्चिम आशियातील शांततेचे आणि जगातील स्थैर्याचे भवितव्य अवलंबून आहे.






Powered By Sangraha 9.0