मुंबई : संस्कार भारती चित्रपट विधा आयोजित ‘सिनेटॉक-सिने सृष्टि भारतीय दृष्टी’ कार्यक्रम शनिवार २६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विनोद गनात्रा दिग्दर्शित ‘पंडित रामप्रसाद बिस्मिल’ यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखवण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पंडित रामप्रसाद बिस्मिल यांचे खूप मोठे योगदान आहे. ते लोकांपर्यंत आणि विशेष करून आजच्या तरुणपिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. माहितीपट पाहून प्रेक्षक भारवून गेले आणि ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै है’ अशा घोषणा दिल्या. या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर संस्कार भारती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष अरुण शेखर यांनी विनोद गनात्रा यांचा सत्कार केला. राष्ट्रीय आणि सामाजिक संस्कार घडवणारे असे अधिकाधिक माहितीपट तयार व्हायला हवे अशी भूमिका त्यांनी मांडली. महितीपटाच्या प्रदर्शनानंतर अरुण शेखर यांनी दिग्दर्शक यांच्यासोबत या लघुपटावर चर्चा केली, प्रेक्षकांनीही या चर्चेत सहभाग घेतला.