शहरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन

29 Oct 2024 19:14:17
mumbai fire brigade diwali


मुंबई :    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आग दुर्घटनांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घेण्यासोबतच रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादा ठेवावी असे सांगताना आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ क्रमांक १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.
 
दरम्यान, दिपावली सणाच्या मंगलमयी वातावरणात दीपोत्सव साजरा करीत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबाबत अग्निशमन दलाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या काळात फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. काही वेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे या सूचनांचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे, तसेच कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.
 

फटाके फोडताना घ्यावयाची काळजी

१. फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
२. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडतांना मोठ्या व्यक्तिंनी सोबत रहावे.
३. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.
४. फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
५. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा.
 
 
फटाके फोडताना पुढील बाबी टाळाव्यात

१. इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.
२. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.
३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
५. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्‍या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
६. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोशणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार (ओव्हरलोड) होणार नाही, याची काळजी घ्यावी.



 
Powered By Sangraha 9.0