तेलाच्या पलीकडील वाढणारे संबंध

    29-Oct-2024
Total Views |
editorial on saudi arebia and bharat oil partner


भारताचा पारंपरिक तेल पुरवठादार देश अशी सौदीची ओळख, तर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार देश, ही भारताची ओळख. भारत आणि सौदी अरेबिया आता यापलीकडे जात नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न करत आहेत. ते प्रत्यक्षात आल्यास, प्रादेशिक स्थिरतेसह जगाच्या वाढीसाठी ते मोलाचे ठरणार आहेत.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल हे दि. 29 ते दि. 30 ऑक्टोबर दरम्यान सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी मजबूत करणे आणि व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याचे नवीन मार्ग शोधले यासाठी हा दौरा असल्याचे मानले जाते. या दौर्‍यात ते रियाध येथे आठव्या ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’मध्ये सहभागी होतील. यात जागतिक नेते, गुंतवणूकदार प्रामुख्याने असतील. यातील गोयल यांचा सहभाग भारताच्या आर्थिक विकासावर प्रकाश टाकणारा ठरेल, असेही म्हणता येते. म्हणूनच, त्यांचा सौदी अरेबिया दौरा हा सौदी सोबतचे भारताचे वाढणारे आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे.

सौदी अरेबियासोबतच्या संबंधही यातून अधोरेखित होतात. जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील तो एक महत्त्वाचा देश आहे. भारताची वाढती ऊर्जेची मागणी आणि प्रमुख तेल उत्पादक म्हणून सौदी अरेबियाची भूमिका लक्षात घेता, दोन्ही देशांमधील ऊर्जा संबंध मजबूत करणे विशेष महत्त्वपूर्ण असेच आहे. भारतासाठी विश्वासार्ह आणि परवडणारा ऊर्जा पुरवठा, तसेच अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानातील संभाव्य सहयोग सुरक्षित करण्यावर या दौर्‍यात चर्चा होऊ शकते. त्याशिवाय, दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होऊ शकते.

गेली कित्येक दशके भारत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी आखाती देशांवर अवलंबून राहिला आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या पुरवठादारांमध्ये वैविध्य आणले असले, तरी आजही भारताच्या आयातीच्या एकूण गरजेपैकी मोठा हिस्सा हा आखाती देशांमधून भारतात येतो. सौदी अरेबियाबरोबरचे संबंध गेल्या काही वर्षांत वृद्धिंगत झाले असले, तरी आता ते तेलाच्या पलीकडे पोहोचणे नितांत गरजेचे आहे. सौदी अरेबिया हा प्रमुख पुरवठादार देश आणि भारत हा महत्त्वपूर्ण ग्राहक असे या दोन्ही देशांसंबंधी ढोबळमानाने म्हणता येते. तथापि, दोन्ही राष्ट्रे दीर्घकालीन समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी, विशेषतः जागतिक ऊर्जा संक्रमणाकडे वाढणारा कल आणि बिगर-ऊर्जा क्षेत्रांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या आर्थिक सहभागामध्ये विविधता आणण्याची गरज ओळखतात.

भारतासाठी, ऊर्जा सुरक्षेसाठी ऊर्जा स्त्रोतांमध्ये विविधता आणणे हे सर्वोपरी आहे. एकाच पुरवठादारावर अवलंबून राहणे, अगदी सौदी अरेबियासारख्या विश्वसनीय पुरवठादारावरही अवलंबून असणे, यात मोठी जोखीम असते. त्याशिवाय, भारताच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांसाठी संसाधने आणि गुंतवणुकीच्या संधींची विस्तृत श्रेणी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असेच. दुसरीकडे, सौदी अरेबिया, ‘व्हिजन 2030’ या राष्ट्रीय परिवर्तन योजनेद्वारे हायड्रोकार्बन महसुलावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा तसेच, अर्थव्यवस्थेत विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहे. या उपक्रमाचा उद्देश पर्यटन, तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या तेलविरहित क्षेत्रांचा विकास करणे हा असून, त्यासाठी विदेशी गुंतवणूक आणि तांत्रिक कौशल्य हे आवश्यक असेच आहे. जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा ज्या भारताचा लौकिक आहे, तो भारत, त्याच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसह, या प्रयत्नात एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे, असे नक्कीच म्हणता येते.
 
भारत आपली विशाल उत्पादन क्षमता, कुशल कामगार आणि जगातील सर्वात मोठी आणि वाढती ग्राहक बाजारपेठ सौदी अरेबियाला देऊ शकतो. याउलट, सौदी अरेबिया आपल्या पायाभूत सुविधा प्रकल्प, अक्षय ऊर्जा उपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय गुंतवणूक आकर्षित करू शकतो. औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांमध्ये संभाव्यतः तेलविरहित वस्तूंमध्ये वाढलेला द्विपक्षीय व्यापार दोन्ही देशांच्या आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देणारा ठरेल. फक्त तेलाच्या आयातीव्यतिरिक्त, भारत आणि सौदी अरेबिया सौर आणि पवन उर्जेसह अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर सहयोग करू शकतात. सौदी अरेबियाचे विस्तीर्ण वाळवंट सौरऊर्जा निर्मितीसाठी आदर्श असेच आहे. भारताला अक्षय ऊर्जा क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. या क्षेत्रातील संयुक्त उपक्रम नवीन आर्थिक संधी निर्माण करतीलच. त्याशिवाय दोन्ही राष्ट्रांना त्यांचे संबंधित हवामान उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकतात. यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण आणि ग्रिड व्यवस्थापन आणि स्टोरेज सोल्यूशन्स यासारख्या क्षेत्रांमध्ये सामायिक कौशल्य समाविष्ट असू शकते.

भारताचे वाढणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तसेच संगणक प्रणालीमधील कौशल्य सौदी अरेबियाच्या डिजिटल परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. प्रगत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये सौदी अरेबियाच्या गुंतवणुकीमुळे भारतीय संशोधक आणि उद्योजकांना सहकार्याची संधी मिळेल. या क्षेत्रातील संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रमांमुळे तांत्रिक प्रगती आणि परस्पर आर्थिक फायदा होऊ शकतो. पायाभूत सुविधांच्या बांधकामातील भारताचे कौशल्य, विशेषत: रेल्वे आणि बंदरे यांसारख्या क्षेत्रात, सौदी अरेबियाच्या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमांना समर्थन देणारे ठरेल. या सहकार्यामध्ये नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी किंवा विद्यमान सुविधा वाढविण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणामध्ये संयुक्त उपक्रमांचा समावेश असू शकतो. सौदी अरेबियातील पर्यटन क्षेत्राच्या विकासामुळे आदरातिथ्य आणि पर्यटन सेवांमध्ये विशेष असलेल्या भारतीय कंपन्यांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. उभय देशातील सांस्कृतिक देवाणघेवाण द्विपक्षीय संबंध मजबूत करणारी ठरेल. तथापि, हे साध्य करत असताना दोन्ही देशांना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. वाढता प्रादेशिक तणाव आणि जागतिक शक्ती गतिशीलता यासह भौगोलिक राजकीय घटक द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करणारे आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी आर्थिक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी, एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असेच आहे.

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात संबंध वाढीस लागणे, हे दोन्ही राष्ट्रांसाठी धोरणात्मकदृष्ट्या आवश्यक असेच आहे. पारंपरिक तेल पुरवठादार आणि जगातील सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा तेल आयातदार या ओळखी पुसून टाकत, आर्थिक संबंधांमध्ये वैविध्य आणल्याने, वाढ आणि समृद्धीच्या अमर्याद संधी खुल्या होणार आहेत. प्रादेशिक अस्थिरतेच्या सर्वात मोठ्या आव्हानासह अन्य आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तसेच उपलब्ध संधींचा फायदा घेण्यासाठी, दोन्ही देशांकडून विश्वास, पारदर्शकता आणि द्विपक्षीय आर्थिक सहभागासाठी एक मजबूत संरचना उभी करण्याची आवश्यकता आहे. या यशामुळे केवळ भारत आणि सौदी अरेबियाचाच फायदा होणार आहे, असे नाही, तर प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक आर्थिक वाढीलाही त्याचा मोठा हातभार लागणार आहे.