मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत चोरट्यांची 'हातसफाई'

29 Oct 2024 21:43:33
cm eknath shinde rally thieves
 

ठाणे :    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये चोरटयांनी चांगलीच हातसफाई केली. रॅलीत सहभागी झालेल्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे सोने आणि रोख रक्कम असे मिळून एकूण सहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला आहे. यासंदर्भात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता सीसीटीव्ही आधार घेत या पाकिटमारांचा शोध सुरु केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी - पाचपाखाडी मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. राज्यभरातून तसेच जिल्हाभरातून कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हातसफाई करून पोबारा केला. वागळे इस्टेट येथील आयटीआय निवडणुक कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांना आपले खिसे कापल्याचे लक्षात आले.दरम्यान, प्रत्येकजण आपले खिसे तपासू लागल्यानंतर माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे जवळपास साडेसहा लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लांबवल्याचे उघड झाले.

गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी १२ आणि ६ तोळ्यांच्या सोनसाखळ्या आणि दोन जणांची प्रत्येकी ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची तक्रारी पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम श्रीनगर पोलीस ठाण्यात सुरु होते. दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांचे खिसे कापल्याच्या तक्रारी श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलीस पाकिटमारांचा शोध घेणार आहेत.या प्रकरणी मिरवणूक मार्गाचे सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.






Powered By Sangraha 9.0