मुंबई : 'भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही', असा पुनरुच्चार मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिकांना दिलेल्या उमेदवारीबाबत माध्यमांनी विचारले असता आमदार शेलार म्हणाले, 'भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे.
महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही', असे आशिष शेलार म्हणाले.
सना मलिकांचे काय?
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, त्यांचा दाऊद किंवा त्यासंदर्भातील प्रकरणांशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही.