लेखमालेच्या मागील भागात स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास आपण सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्यांची अर्ध स्थिती आपण पाहिली, आज पूर्ण स्थितींचा अभ्यास करु.
चार आसनांची अर्ध कृती आपण बघितली. नवशिक्याने १५ दिवस अभ्यास करूनच खालील पूर्ण आसनांचा अभ्यास करावा.
शवासन-२:
कृती
अ) पूर्वीप्रमाणे घेऊन. मन सुक्ष्म झालेल्या नाभीचे हालचालींवर एकाग्र करून तेथून निर्माण होणार्या सूक्ष्म कंपनांचा शरीरातील ठराविक भागात पाच-सात मिनिटे अनुभव घ्यावा.
ब) मुख्यत्वे पोटर्या, मांड्या, छाती व भुवया. शरीर श्वास सोडते तेव्हा ही कंपने प्रकर्षाने जाणवतात.
फायदे :
१) ज्यामुळे आपले मन आनंदी होईल व शरीर हलके वाटेल.
२) द्विपाद् उत्तानासन : शवासन सोडताना पाय जोडून हात जवळ घ्या. तळहात जमिनीकडे व मान सरळ करा.
कृती
अ) पावले खाली दाबा, गुडघे खाली दाबा, डोळे उघडून डोक न उचलता खाली बघत राहा.
ब) दोन्ही पाय मांडीपासून सरळ उचलून पायांच्या अंगठ्याचे टोक बघा.
क) डोळे बंद करून ताण अनुभव करा.
ड) ताण नको असतील तेव्हा हळूच पाय खाली आणून सैल सोडा, ताण नाहीसे होईपर्यंत थांबा.
ई) परत अ ते ड पर्यंत पुनश्च करा.
इ) अशी तीन ते दहा आवर्तने करून, शवासनात विश्राम करा.
फायदे :
१) पायांचे आरोग्य उत्तम राहते.
२) हृदयापर्यंत रक्ताभिसरण होते.
३) पोट व वजन कमी होण्यास मदत.
४) पाय खाली हळू आणल्याने मेंदूपर्यंत आयाम मिळतात.
पवन मुक्तासन
शवासन सोडताना पाय जोडून हात जवळ घ्या. तळहात जमिनीकडे व मान सरळ करा.
कृती
अ) पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्या आणि दोन्ही हातांनी गुडघे धरा.
ब) भरपूर श्वास घेऊन आंर्तकुंभक करा.
क) श्वास सोडताना मांड्या हळूवारपणे पोटावर दाबा.
ड) डोके वर उचलून हनुवटी गुडघ्यात लावण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास करु नका. त्यावेळी श्वास बाहेर ठेवून बाह्य-कुंभक करा.
ई) श्वास घेत डोके खाली आणा, गुडघे मागे न्या, सोडून नका.
इ) हीच कृती तीन वेळा करा.
फायदे :
१) संपूर्ण पोटाला एकाच वेळी दाब मिळतो.
२) पोटातील अतिरिक्त वायू कमी होऊन पचनक्रिया सुधारते.
३) पोटावरील चरबीचे प्रमाण कमी होऊन पोटाचा घेरा कमी होतो.
४) अन्नपचन व्यवस्थित होऊन शौचास साफ होते.
५) आसन काळात बाह्य कुंभक केल्याने हृदयास भरपूर आयाम मिळतो.
वामकुक्षी
विश्रामाचे आसन : कृती-
१) डाव्या कुशीवर पडून, डावा हात डोक्याचे वर जमिनीवर पसरवा.
२) डोक्याचा डावा भाग डाव्या दंडावर ठेवा. उजवा हात छाती पुढे जमिनीवर ठेवून, उजवा गुडघा ओटी पोटाचे खाली जमिनीवर ठेवा.
३) उजवे पाऊल डाव्या गुडघ्यावर ठेवा.
४) डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करून थांबा.
फायदे :
१) हृदयाला रक्तपुरवठा होतो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.
२) थकवा कमी होतो.
शलभासन:
कृती
अ) पोटावर झोपा.
ब) दोन्ही हातात अनघ मुद्रा लावून हात अशा रीतीने जांघांच्या खाली घाला की, दोन्ही जांघा मुठींवर घट्ट दाबता याव्यात.
क) हनुवटी जमिनीवर ठेवून डोळे बंद करा.
ड) दोन्ही जांघा हातांचे मुठींवर घट्ट दाबून, दोन्ही पाय खेचून मांडीपासून सरळ वर नऊ ते बारा इंच उचला.
ई) ताण फक्त कमरेत अनुभवा. हे ताण पाठीत जायला नको.
इ) ताण सहन होईपर्यंत थांबा.
प) ताण नको असतील तेव्हा हळूच पाय खाली आणा. थोडे थांबून हीच कृती तीन वेळा करा.
नंतर मकरासनात आराम करा.
फायदे :
१) पायाच्या संधी, स्नायू उत्तम राहतील.
२) पायात वाम येणे, गोळे येणे थांबते
३) कंबर दुखी, पाठ दुखी थांबण्यास मदत होते.
४) किडनी स्वस्थ राहण्यासाठी मदत होऊन रक्त शुद्धी होईल.
५) गळ्यातील ग्रंथी उत्तम राहून चयापचय सुधारेल.
भुजंगासन
कृती
अ) पोटावर झोपून दोन्ही हात छातीचे बाजूला जमिनीवर ठेवा.
ब) कपाळ जमिनीला लावा.
क) श्वास खेचत हातांचे लांबीपर्यंत शरीर वर उचला, श्वास सूक्ष्म ठेवा.
ड) दोन्ही हात कोपरात ताठ ठेवा, डोळे उघडे ठेऊन समोर बघा
इ) दोन्ही पाय जोडून ठेवण्याचा प्रयत्न करा.
ई) शरीर जांघातून जमिनीवर दाबत राहा.
प) खाली येवून थोडे थांबून,हीच कृती तीन वेळा करा.
फायदे :
१) ओटीपोटावरील चरबी पातळ होते.
२) पाठीचा कणा सम राहून कंबर, पाठ दुखी थांबते.
३) छाती आणि पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
४) जठराग्नी प्रदिप्त होऊन भूक चांगली लागते.
५) स्मृती वाढते.
शशांकासन
कृती
अ) वज्रासनात बसा.
ब) हात पुढे जमिनीवर पसरवत कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करुन ईश्वरप्रणिधान करा.
फायदे :
१) पोट पातळ होते.
२) शारीरिक व मानसिक ताण कमी होतात.
३) नम्रता येते. (क्रमशः)
(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५