संरक्षण क्षेत्रातील नवी भरारी

29 Oct 2024 09:50:43

airbus
 
मोदी सरकारने भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले असून, त्याच अंतर्गत स्पेन आणि अमेरिकेसोबतही नुकतेच दोन करार करण्यात आले. पहिला म्हणजे, स्पेनच्या सहकार्याने एअरबस निर्मिती प्रकल्प आणि दुसरा भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला ‘एमक्यू-९बी’ ड्रोन खरेदी करार. त्याविषयी सविस्तर...
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी सोमवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे ‘टाटा-एअरबस ‘सी-२९५’ विमान प्रकल्पाचे उद्घाटन केले. तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर असलेले स्पेनचे पंतप्रधान सोमवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे दाखल झाले. भारताच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी संरक्षण प्रकल्पांपैकी एक, ‘टाटा प्रगत प्रणाली’ अर्थात ‘टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड’ (टीएएसएल) कॅम्पसमध्ये एअरबस स्पेनच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे. ‘सी-२९५’ कार्यक्रमांतर्गत एकूण ५६ विमाने आहेत. त्यापैकी १६ विमाने स्पेनमधून थेट ‘एअरबस’द्वारे वितरित केली जात आहेत आणि उर्वरित ४० भारतात तयार केली जाणार आहेत. यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने प्रकल्पाच्या प्रारंभिक मसुद्याला मंजुरी दिली होती, ज्यामध्ये आणखी १५ ‘सी-२९५’ विमानांचा प्रस्ताव आहे. त्यातील नऊ विमाने नौदलासाठी आणि सहा तटरक्षक दलासाठी राखून ठेवण्यात आली आहेत. यामुळे भारताच्या संरक्षण सज्जतेस बळ मिळणार आहे.
 
वडोदरा येथे पंतप्रधान मोदी आणि स्पॅनिश पंतप्रधान सांचेझ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या नवीन उत्पादन सुविधेमुळे भारताच्या संरक्षण क्षमतांना मोठा ‘बूस्ट’ मिळेल. या प्रकल्पामध्ये उत्पादनापासून ते असेम्ब्ली चाचणी आणि पात्रता, विमानाच्या संपूर्ण जीवनचक्राची डिलिव्हरी आणि देखभाल करण्यापर्यंत संपूर्ण परिसंस्थेचा विकास समाविष्ट आहे. ‘सी-२९५’ विमान भारतीय वायुसेनेच्या ‘एचएस-७४८’ फ्लीटची जागा घेणार आहे. अशाप्रकारे भारतात लष्करी विमान बनवण्याची खासगी क्षेत्रातील ही पहिलीच घटना आहे. ‘टाटा’ व्यतिरिक्त ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ आणि ‘भारत डायनॅमिक्स लि.’ सारख्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कंपन्या, खासगी एमएसएमईसह, भारतात लष्करी विमानांच्या उत्पादनासाठी एक व्यापक परिसंस्था निर्माण करण्यात योगदान देतील, ज्यामुळे भारताला संरक्षम उत्पादनांचे केंद्रस्थान बनवण्याच्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षेला हातभार लागेल. या प्रकल्पामुळे देशात संरक्षण उत्पादनाची परिसंस्था अधिक बळकट होणार आहे. मोदी सरकारने यापूर्वी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये ‘डिफेन्स कॉरिडोर’ची उभाऱणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत संरक्षण उत्पादनात मोठी झेप घेणार, यात कोणतीही शंका नाही.
 
भारत आणि अमेरिका यांच्यातील अलीकडील ‘एमक्यू-९बी’ ड्रोन खरेदी करारामुळे केवळ भारताच्या ‘आयएसआर’ क्षमतेत म्हणजेच गुप्तचर माहिती गोळा करणे, पाळत ठेवणे वाढणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य देखील मजबूत होईल. या ड्रोन खरेदी करारांतर्गत अमेरिका केवळ भारताला तंत्रज्ञान हस्तांतरित करणार नाही, तर ‘युएव्ही’ विकसित करण्यातही मदत करणार आहे. या करारावर २०२३ साली दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती आणि त्याला नुकतीच सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने मान्यता दिली आहे. मूल्याच्या दृष्टीने पाहिले, तर भारत आणि अमेरिका यांच्यात आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या संरक्षण करारांपैकी हा एक करार आहे. करारानुसार, भारतात या ड्रोनची देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती सुविधा (एमआरओ) स्थापित करणे देखील समाविष्ट आहे.
 
याशिवाय अमेरिकी ड्रोन निर्माता जनरल टॉमिक्स भारतीय कंपनी ‘भारत फोर्ज’सोबत भागीदारी करेल आणि ड्रोनचे घटक आणि इतर घटक भारतात तयार करेल आणि भारताला जागतिक ड्रोन उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यात मदत करेल. याव्यतिरिक्त, अमेरिकन आणि भारतीय कंपन्यांमधील या भागीदारीमुळे अमेरिकेला भारतात पुढील पिढीतील लढाऊ ड्रोनच्या निर्मितीमध्ये सल्लामसलत प्रदान करण्याचा मार्ग मोकळा होईल. साहजिकच, लढाऊ ड्रोनची निर्मिती हे भारत-अमेरिका संयुक्त संरक्षण तंत्रज्ञानामध्ये वेगाने विकसित होत असलेले क्षेत्र आहे. युरोप आणि मध्य-पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धांमध्ये लढाऊ ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे आणि आता त्यांची मागणी वाढत आहे, हे उल्लेखनीय आहे.
 
अमेरिकन कंपनीला हे ड्रोन भारताला पुरवण्यासाठी किमान चार ते सहा वर्षे लागतील. तसेच, भविष्यात या ड्रोनच्या लॉजिस्टिकशी संबंधित निर्णय त्यांच्या वापर आणि कार्यक्षमतेनुसार लागू केले जातील. उल्लेखनीय आहे की, हे प्रगत ड्रोन देशाच्या सशस्त्र दलांना त्यांच्या क्षमतेने बळकट करू शकतील. अशा क्षेत्रात भारताला येत्या काही दशकांमध्ये मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अर्थात, अलीकडेच भारत संयुक्त सागरी दलाचा (सीएमएफ) सदस्य झाला आहे.
 
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ४५ देशांचे संयुक्त सागरी दल सध्या फारशा मजबूत स्थितीत नाही. पाहिल्यास, हे संयुक्त सागरी दल पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षा सहकार्यासारखे आहे, जे या सागरी क्षेत्रातील सदस्य देशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कार्य करते. ‘एमक्यू-९बी’ ड्रोनच्या तैनातीद्वारे भारत हिंदी महासागर क्षेत्रात (आयओआर) शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘क्वाड’ देश आणि विविध लोकशाही राष्ट्रांशी हातमिळवणी करू शकतो.
 
 
Powered By Sangraha 9.0