भगवान धन्वंतरींच्या कृपेने ‘आरोग्य भारती’ची वाटचाल

29 Oct 2024 10:57:56

arogya bharti 
 
आज धनत्रयोदशी. दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. निरोगी राहाण्यास आयुर्वेदाचे महत्त्वपूर्ण योगदान ओळखून या दिवसाला भारतात ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणूनही साजरे केले जाते. या दिवशी आयुर्वेदाचे अभ्यासक, वैद्यकीय व्यावसायिक व समाज, चांगले आरोग्य, उपचार आणि दीर्घायुष्यासाठी त्यांची पूजा करतात. ‘आरोग्य भारती’ची स्थापना याच शुभ दिनी २००२ साली झाली. त्यानिमित्ताने भगवान धन्वंतरीची महती आणि ‘आरोग्य भारती’चे कार्य यांविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
 
हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान धन्वंतरी हे औषधाचे देव आणि सर्व समाजाचे वैद्य म्हणून पूजनीय आहेत. ते भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. पौराणिक मान्यतांनुसार, देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. समुद्र मंथनाबाबतचे उल्लेख श्रीमद्भागवत पुराण, महाभारत, विष्णु पुराण, अग्निपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथात आढळून येतात. भगवान धन्वंतरीचे स्वरूप स्वास्थ्य रक्षण आणि व्याधी परिमोक्षणाची सुरूवात दर्शवते. भगवान धन्वंतरींना ‘आयुर्वेदाचे जनक’ मानले जाते. पृथ्वीतलावरील प्रथम १४ रत्नांपैकी एक, पहिले चिकित्सक मनुष्याच्या शरीर मनाला त्रास देणार्‍या व्याधींचा नाश करण्यासाठी धन्वंतरी प्रकट झाले, असे सांगितले जाते. प्राचीन भारतीय वैद्यक प्रणाली आणि त्यांचा वारसा जगभरातील वैद्यकीय चिकित्सक आणि उपचार करणार्‍यांना प्रेरणा देत आहे.
 
धन्वंतरी हे पारंपरिक भारतीय वैद्यकीय प्रणाली आयुर्वेदाचे प्रवर्तक मानले जातात. प्राचीन ग्रंथ आयुर्वेदाच्या ज्ञानाचे श्रेय त्यांना देतात. विशेषत: आयुर्वेदिक औषधाच्या मूलभूत ग्रंथांपैकी एक सुश्रुत संहितेत, धन्वंतरीने आपल्या शिष्य सुश्रुताला शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय पद्धतींचे ज्ञान दिल्याचे म्हटले आहे. सुश्रुताचार्य हे शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात. आयुर्वेदाचे धन्वंतरींकडून मिळालेले ज्ञान चरकाचार्यांनी वृद्धिंगत केले. आयुर्वेद भगवान धन्वंतरींकडून गुरू-शिष्य परंपरेने प्रसारित झाला. ही आयुर्वेदाची परंपरा आजही भारतात दिसून येते.
 
उपचारासोबत भगवान धन्वंतरींचा संबंध आयुर्वेदाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाला देखील सूचित करतो. त्याप्रमाणे रोग बरे करण्यापलीकडे निरोगी आणि संतुलित जीवनशैलीला चालना देणारे असे त्यांचे रूप आहे. भगवान धन्वंतरीचे स्वरूप दैवी, तेजस्वी आहे. जे जीवन देणार्‍या आणि जीवन-पुनर्स्थापना करणार्‍या शक्तींचे प्रतीक आहे. आपल्या चार हातांत अवघ्या भूतलावरील प्राण्यांचे आरोग्य भगवान धन्वंतरींनी सामावले आहे.
 
पहिले अमृत कलश मृत्यूच्या अंतिम उपचाराचे प्रतीक आणि आरोग्य व चैतन्य यांचे प्रतीक आहे. दुसरे जळू उपचारात्मक हेतूंसाठी वापरल्या जाणार्‍या प्राचीन वैद्यकीय पद्धती, विशेषत: रक्तमोक्षण सूचित करते. तिसरे शंख ध्वनी, जीवन आणि ज्ञानाच्या प्रसाराचे प्रतीक व चौथे औषधी वनस्पती निसर्गाच्या उपचार शक्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तोच आयुर्वेदिक औषधांचा पाया आहे.
 
धन्वंतरी जयंती दिवाळीच्या दोन दिवस आधी अश्विन कृष्ण त्रयोदशीला साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. या दिवसाचा नगदी धनाशी काहीही संबंध नाही. निरोगी राहाण्यास आयुर्वेदाचे महत्त्वपूर्ण योगदान ओळखून या दिवसाला भारतात ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ असेही साजरे करतात. या दिवशी आयुर्वेदाचे अभ्यासक, वैद्यकीय व्यावसायिक व समाज, चांगले आरोग्य, उपचार आणि दीर्घायुष्यासाठी त्यांची पूजा करतात. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता आहे. सर्व मानव जातीने ही प्रार्थना करावी, अशी अपेक्षा आहे.
 
आपल्या सनातन अशा अनेक वर्षांपासून चालत आलेल्या संस्कृतीचे पाईक आहोत. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले हे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. जो आयुष्याचा वेद आहे. म्हणून ‘आरोग्य भारती’ची स्थापना याच शुभ दिनी २००२ साली झाली. ‘स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ परिवार, स्वस्थ ग्राम ते स्वस्थ राष्ट्र’ ही वाटचाल भगवान धन्वंतरीच्या आशीर्वादानेच शक्य आहे. त्यामुळे धन्वंतरी जयंती ‘आरोग्य भारती’च्या दोन अनिवार्य कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. या दिशेने सर्वांना स्वास्थ्याकडे वाटचाल करण्यास मार्गदर्शन करणारी ‘आरोग्य भारती’ ही राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. भारतीय संस्कृती आणि ज्ञानाचे भंडार आपल्या स्वास्थ्य रक्षणास समर्थ आहे व ते आईवडिलांकडून, गुरूंकडून, मित्रपरिवाराकडून आपणास शिकायला मिळते.
 
कुणीच प्राणी स्वास्थ्य गमावू इच्छित नाही. मग ते झाड, प्राणी, मानव कुणीही असो. ‘आरोग्य भारती’च्या राष्ट्रीय स्वस्थ विद्यालय प्रमुख भोलानाथजींच्या सफाळे येथील प्रवासात दि. २५ ऑक्टोबर रोजी शिलटे गावातील शाळेतील चिमुकल्यांनी सुद्धा याची ग्वाही दिली. भारतीय संस्कृतीच्या ठोस आधारावर विज्ञानाचा भर टाकून त्याचे महत्त्व निदर्शनास आणून देणे, हे ‘आरोग्य भारती’चे कार्य आहे. त्यासाठी भारतीय स्वास्थ्य चिंतनाचे मूळ स्रोत कार्यरत आहे. त्यावर स्वास्थ्य परीक्षण, चिकित्सक संमेलन, परंपरागत संमेलन आयोजित करून समसामयिक कार्य केले जाते. भगवान धन्वंतरी जयंती व ‘विश्व योग दिवस’ हे दोन ‘आरोग्य भारती’चे मुख्य उत्सव आहेत.
 
स्वस्थ कसे राहावे, हे शिकवणारा व्यक्ती म्हणजेच डॉक्टर अशी या शब्दाची व्युत्पत्ति आहे. मात्र, व्यक्ती आजारी झाल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही, हे एक उघड सत्य आहे. बाळाच्या जन्मापूर्वीपासून या धरणीवरील जीवनाच्या शेवटपर्यंत विविध अवस्थेमध्ये स्वास्थ्य जपणे कठीण होत चालले आहे. काळाच्या ओघात मानव अधिकाधिक व्यस्त होत गेला व स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करत चालला आहे. आजकालच्या व्यस्त आणि एकलकोंड्या जीवनशैलीमुळे स्वस्थ राहाण्यासाठी अनौपचारिक शिक्षण मात्र कमी होत चालले आहे. एकीकडे परंपरेनुसार चालत आलेल्या स्वास्थ्यवर्धक माहितीवर कमी होत चाललेला विश्वास आहे, तर दुसरीकडे खोट्या मार्केटिंगच्या दबावात येऊन विज्ञानाची कस न लावता हानिकारक आहार-विहार वाढत चाललाय. अशा कचाट्यात सापडलेल्या माणसाला स्वतःचे शरीर, मन व आत्म्याचे स्वास्थ्य टिकविणे कठीण होत चालले आहे. या कठीण परिस्थितीच्या निवारणार्थ स्वास्थ जीवनशैली, सूर्यनमस्कार व योग, वनौषधीचा प्रचार-प्रसार, प्रथमोपचार, घरेलू उपचार, व मधुमेह योग प्रबंधन असे प्रशिक्षणात्मक कार्य ‘आरोग्य भारती’द्वारे केले जातात. या प्रमाणे स्वास्थ्यपूर्ण जीवनाचा अंगीकार करण्यास लोकांमध्ये त्याची माहिती पसरविणे ‘आरोग्य भारती’चे प्रमुख कार्य होय.
 
‘आरोग्य भारती’ मानवासोबतच त्याच्या जड व चेतन वातावरणाची निगा राखण्यासाठी पण सज्ज आहे. पर्यावरण, सुपोषण, व्यसनमुक्ती, एनीमिया, थायरॉईड, थॅलेसीमिया इत्यादी विषयांवर ‘आरोग्य भारती’कडून जागरण गतिविधि सतत चालू असतात. या सर्व गतिविधिंसाठी ‘आरोग्य भारती’ विविध योजनात्मक आयामांवर कार्य करते. ते आहेत ‘आरोग्य मित्र प्रशिक्षण’, ‘विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम’, ‘महिला कार्य’, ‘स्वास्थ्य ग्रामयोजना’, ‘चिकित्सा विद्यार्थी कार्य व प्रकाशन.’
 
‘आयुर्वेदापासून नवौषधीपर्यंत’ (AYUSH Modern Medicine) सर्व ज्ञानाचा उचित सार घेऊन प्रत्येक व्यक्तीला सहज समजेल अशा तर्‍हेने स्वस्थ राहाण्यास ‘आरोग्य भारती’ मार्गदर्शन करते. सोशल मीडियाद्वारे पण, ‘आरोग्य भारती’ जनसामान्यांसाठी विविध माहिती उपलब्ध करत असते. ‘आरोग्य भारती’कडे योग शिक्षकांपासून विशेषज्ज्ञ चिकित्साकांपर्यंत हजारो कार्यकर्त्यांचा ताफा भारतभर उभा आहे.
 
धर्म, अर्थ, काम व मोक्षाचे प्रधान कारण आरोग्यच आहे. या भावनेने ‘आरोग्य भारती’ कार्य करीत आहे. स्वास्थ्यसेवेशी निगडित व्यक्तींसह स्वस्थ राहण्यास स्फूर्ती देणारे कुणीही ‘आरोग्य भारती’मध्ये सामील होऊ शकतात. arogyabharti.org या संकेतस्थळावर याची अधिक माहिती आहे. ‘आरोग्य संपदा’ नामक मासिकाचे वर्गणीदार झाल्यास स्वस्थ राहाणीबद्दल शाश्वत माहिती मिळते. आपणही त्याचा लाभ घ्यावा व आपले, परिवाराचे, शेजार्‍यांचे व राष्ट्राचे स्वास्थ्य जपण्यास हातभार लावावा. सर्वांना स्वस्थ, सुखी, आनंदी राहावे व कुणालाही दुःखाचा भागी व्हावयास लागू नये, ही भगवान धन्वंतरीकडे प्रार्थना आहे.
 
(लेखक - डॉ. हेमंत पराडकर व डॉ. गणेश मुक्ता अरुण जोशी, दिंडोशी भाग, गोरेगांव विभाग, कोंकण प्रांत, पश्चिम क्षेत्र, आरोग्य भारती)
Powered By Sangraha 9.0