‘विजयी’ गोंधळ

29 Oct 2024 21:25:53
actor joseph vijay chandrasekhar joins politics


तामिळनाडूत परवा आणखीन एका सिनेनायकाने मोठ्या पडद्यावरुन द्रविडी राजकारणात सीमोल्लंघन केले. तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असलेल्या 50 वर्षीय सी. जोसेफ विजयच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाचा पहिलाच भव्य मेळावा विक्रवंडी येथे शक्तिप्रदर्शनासह पार पडला. खरे तर ‘थलपति’ म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्याकडून तामिळनाडूच्या द्विपक्षीय राजकारणाला कंटाळलेल्या जनतेच्याही बरेच अपेक्षा होत्या. परंतु, विजय यांनी त्याच्या भाषणात मांडलेल्या विविध मुद्द्यांवर नजर टाकली असता, ‘जुन्या बाटलीत नवीन दारु’ असाच हा सगळा प्रकार असल्याचे लक्षात यावे. कारण, राज्यातील द्रमुक, अण्णाद्रमुक आणि अन्य द्रविडी पक्षांप्रमाणेच तामिळ अस्मिता, हिंदीविरोध, सर्वधर्मसमभाव या जुन्याच मुद्द्यांचे चर्वितचर्वण करुन विजय यांनीही पक्षाची आगामी दिशा स्पष्ट केली. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठीच्या निवडणुका 2026 साली पार पडतील. म्हणजेच विजय यांच्या हाती पक्ष तळागाळात रुजवण्यासाठी तसा बराच अवधी आहे. यादरम्यान विजय यांनी पाच मुद्द्यांवर काम करणार असल्याचे जनतेला आश्वस्त केले. 1) राज्यपाल पद हटविणे 2) राज्यातील न्यायालयांमध्ये तामिळ ही प्रशासकीय भाषा म्हणून लागू करणे 3) महिलांना समान संधी 4) जातीय जनगणना 5) शिक्षण हा विषय केंद्रीय सूचीतून राज्याच्या सूचीत समाविष्ट करणे. मुळात यापैकी विजय यांची पहिलीच मागणी ही असंविधानिक आणि केंद्र-राज्य संबंधांवर घाला घालणारी म्हणावी लागेल. कारण, राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तसेच, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देणे, विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे यांसारखे अनेक विशेषाधिकार राज्यपालांना आहेत. पण, विजय यांना राज्यपाल हे पदच मुळी अमान्य. पण, दुसरीकडे देशातील संघराज्य पद्धतीला विरोध नाही, असेही त्यांचे म्हणणे. म्हणजे, केंद्राशी संबंध हवे, मदतही हवी, पण, राष्ट्रपतींतर्फे नेमणूक करण्यात आलेले राज्यपाल नको, असे हे दुटप्पी धोरण. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श असल्याचेही विजय यांनी अभिमानाने जाहीर केले. पण, त्याच बाबासाहेबांच्या संविधानातील राज्यपाल पद मात्र त्यांना अमान्य. असा हा ‘विजयी’ गोंधळ कार्यकर्त्यांसह जनतेलाही संभ्रमित करणारा!


‘विजयी’ भ्रम


खरे तर तामिळनाडूचे राजकीय अवकाश इतक्या छोट्या-मोठ्या पक्षांनी पूर्णत: व्यापलेले असताना, विजय यांचे वेगळेपण ते काय, असा प्रश्न पडणे साहजिकच. त्याचे उत्तर त्यांच्या भव्य राजकीय मेळाव्यात मिळेल, अशी जनतेचेही अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. कारण, जे जे मुद्दे विजय यांनी मांडले, ते आधीच अन्य पक्षांच्या अजेंड्यावर वर्षानुवर्षे आहेत. मात्र, तरीही ‘शिळ्या कढीला ऊत’ या उक्तीप्रमाणे, विजय यांनी ओढूनताणून आपल्या पक्षाचा वेगळेपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. पण, हे करताना त्यांचा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक गोंधळ मात्र अजिबात लपून राहिला नाही. आधी म्हटल्याप्रमाणे, राज्यपालपदालाही विजय यांनी अनाठायी विरोध दर्शविला. पण, यदाकदाचित बहुमताने त्यांच्या पक्षाचे सरकार निवडून आलेच, तर मुख्यमंत्रिपदाची शपथही देणारे हेच राज्यपाल महोदय असतील, याचा त्यांना सपशेल विसर पडलेला दिसतो. एवढेच नाही, तर पेरियार यांचा आदर्शही प्रत्यक्षात उतरविणार असल्याची घोषणा विजय यांनी केली. पण, केवळ पेरियार यांची सामाजिक न्यायाची तत्त्वे मान्य असून, त्यांचा निधर्मीपणा तेवढा अमान्य असल्याचे विजय यांचे म्हणणे. थोडक्यात काय, पेरियार असो, आंबेडकर अथवा साक्षात संविधान, त्यातील सोयीस्कर ते स्वीकारायचे आणि अडचणीचे ते त्यागायचे, अशी ही अजब भूमिका. पण, एकूणच तामिळनाडूचे राजकारण हे अशा लोकप्रिय, वलयांकित अभिनेत्यांच्या आणि त्यांच्या झगमगाटाच्या गर्दीत पुरते हरवलेले. एमजीआर, जयललिता यांच्यापासून ते कॅप्टन विजयकांत, कमल हसन अशा मूळच्या कलाकारांनी तामिळनाडूच्या राजकारणात आपले नशीब आजमावले. पण, एमजीआर, जयललिता यांच्या वाट्याला आलेले अभूतपूर्व राजकीय यश नंतरच्या पिढीतील कलाकारांच्या वाट्याला आले नाही, हे वास्तव. विजयकांत असो वा कमल हसन यांनीही द्रमुक-अण्णाद्रमुकच्या द्विपक्षीय राजकारणाला एक सक्षम पर्याय उभे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, ते सपशेल अपयशी ठरले. विजय यांच्या सभांना लाखोंची गर्दी जमेलही, पण त्याचे मतांमध्ये कितपत रुपांतर होईल, हे आताच सांगणे अवघड. त्यामुळे तामिळनाडूतील हे सगळेच ‘नटसम्राट’ ‘सत्तासम्राट’ होतीलच, हा ‘विजयी’ भ्रमच ठरावा.

Powered By Sangraha 9.0